Saturday, 17 December 2022

Audio - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरण स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      महाविकास आघाडीचा आज मुंबईत महामोर्चा तर भाजपचं माफी मागा आंदोलन

·      राजकीय विचार पुढे रेटण्यासाठी साहित्य क्षेत्र खराब करू नये-समरसता साहित्य परिषदेचं आवाहन

·      गुंठेवारीची बनावट प्रमाणपत्रं तयार करणाऱ्या पाच जणांविरुद्ध नांदेड इथं गुन्हा दाखल

·      बहुप्रतिक्षित वेरुळ महोत्सवाचं येत्या २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान औरंगाबाद इथं आयोजन 

आणि

·      बांगलादेशविरोधातल्या पहिल्या कसोटीत भारत ४७१ धावांनी आघाडीवर तर एफ आय एच महिला हॉकी नेशन्स स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक

****

कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काल रत्नागिरी इथं जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला, त्यानंतर ते बोलत होते. कोकणाच्या विकासाचा मोठा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन आणि विकास करण्याचं काम हे प्राधिकरण करेल, असं त्यांनी सांगितलं. तामिळनाडू आणि गुजरातच्या मत्स्य व्यवसाय धोरणाचा अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, रत्नागिरी इथं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि त्यांच्या शिक्षणाचा योग्य सन्मान झाला पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं, ते यावेळी म्हणाले. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राज्यात उद्योग वाढीला चालना देण्याचं धोरण सरकारनं स्वीकारलं असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

**** 

महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईत महामोर्चा काढला जाणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपच्या अन्य नेत्यांकडून महापुरुषांबद्दल कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जात आहे.

महाविकास आघाडीचा हा महामोर्चा सरकारला धडकी बसवेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही, सरकारला कसली भीती आहे, असा प्रश्नही पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून आज मुंबईत "माफी मागा" आंदोलन केलं जाणार आहे. भाजप नेते विधीज्ञ आशिष शेलार यांनी काल ही माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाबाबत केलेलं विधान, उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवदेवता तसंच संतांबाबत केलेली विधानं, याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे का बोलत नाहीत, असं शेलार यांनी विचारलं आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याविरोधात माफी मागा आंदोलन करत असल्याचं शेलार यांनी सांगितलं.

****

संत महात्म्यांच्या संदर्भात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात काल नाशिकमध्ये वारकऱ्यांनी निषेध दिंडी काढली. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा इथून काढण्यात आलेली दिंडी, पंचवटी परिसरातून विविध भागातून नेण्यात आली आणि रामकुंडावर तिचा समारोप करण्यात आला. सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला वारकरी मतदान करणार नाही अशी शपथ उपस्थित वारकऱ्यांनी यावेळी घेतली. 

****

एक देश एक मतदार यादी या संदर्भात विविध घटकांशी विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल, असं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं आहे. ते काल लोकसभेत बोलत होते. मतदार ओळखपत्राचं आधार कार्डशी संलग्नीकरण हे ऐच्छिक असून, ज्या नागरिकांनी आपली आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र परस्परांशी जोडलेली नाहीत, त्यांची नावं मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अनिवासी भारतीयांसाठी प्रॉक्सी अर्थात प्रतिनिधीतर्फे मतदानाची सुविधा देण्याबाबत कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असंही रिजीजू यांनी काल लोकसभेत सांगितलं.

****

संशयास्पद चीनी अॅप्सना नागरिक बळी पडू नयेत यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. त्या काल राज्यसभेत शून्य काळात बोलत होत्या. गेल्या सात महिन्यांत रिझर्व्ह बँक, मंत्रालयाचे अधिकारी आणि इतर विभागांशी या धोक्याचा सामना करण्यासाठी बैठका घेतल्या असून, काही ॲप्सवर कारवाईही करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे खासदार नदीमुल हक यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

****

औषध निर्मिती क्षेत्राला कच्चा माल पुरवठ्यासाठी केंद्र सरकार देशात तीन औषध पार्क स्थापन करणार आहे. खतं आणि रसायन मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली. आंध्रप्रदेश, हिमाचलप्रदेश, आणि गुजरातमध्ये हे औषध पार्क विकसित केले जाणार असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं.

****

तृतीयपंथियांच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर नोंदणी केलेली व्यक्ती आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय सुविधा घेऊ शकतात, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली.

****

राजकीय विचार पुढे रेटण्यासाठी पुरस्कार परत करणाऱ्या बुद्धीजीवींनी साहित्यासारखे निर्मळ क्षेत्र खराब करू नये, असं आवाहन, समरसता साहित्य परिषदेनं केलं आहे. कोबाड गांधी लिखित फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार शासनाने परत घेतला, त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर समरसता परिषदेनं ही भूमिका व्यक्त केली. या पुस्तकाला तसंच पुरस्काराला समर्थन देणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा, असं आवाहन परिषदेनं केलं आहे. नक्षलवाद- माओवाद आणि दहशतवाद हे भारताचे शत्रू असून संवैधानिक मार्गाऐवजी हिंसेचा अवलंब करणारे मार्ग आहेत. त्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुरस्कार करणारे मग ते साहित्यिक असोत वा अन्य कुणीही; त्यांचा निषेधच व्हायला हवा, असं परिषदेनं म्हटलं आहे.

****

जी २० परिषदेसाठी मुंबईत आलेल्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी बोरीवलीजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या साष्टी बेटाच्या अरण्यात असलेल्या कान्हेरी लेण्यांना भेट देवून, या स्थळांची माहिती आणि इतिहास जाणून घेतला. केंद्रीय पर्यटन विभागाच्या वतीनं यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला. बासरी, तबला, आणि पखवाज वादन, तसंच शास्त्रीय संगीताचा आस्वाद जी २० च्या प्रतिनिधींनी यावेळी घेतला.

****

१९७१ मध्ये भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या युद्ध विजयाच्या स्मरणार्थ काल देशभरात सर्वत्र विजय दिन साजरा झाला. मुंबईत कुलाबा इथं, या युद्धातील सर्व शूरवीरांना समर्पित विजय उद्यान उभारण्यात आलं आहे. परमवीर चक्र प्राप्त हुतात्मा मेजर होशियार सिंग दहिया यांच्या पत्नी धनो देवी यांच्या हस्ते या विजय उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं.

****

अमरावती इथले वैद्यकीय व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने काल ११ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं. ५४ वर्षीय कोल्हे यांची सामाजिक माध्यमावरील एका पोस्टवरून २१ जून रोजी हत्या झाली होती. अमरावती पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर हे प्रकरण दोन जुलै रोजी एनआयएकडे वर्ग करण्यात आलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात जून २०१३ मध्ये झालेल्या बिपीन गुलाबाचंद बाफना हत्या प्रकरणी नाशिकच्या सत्र न्यायालयानं पाच संशयित आरोपींपैकी दोघांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर, इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. बाफना यांचा एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी संशयित आरोपी चेतन पगारे, अमन जट, अक्षय सुळे, संजय पवार, पम्मी चौधरी आदींवर अपहरण करून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं चेतन पगारे आणि अमन जट या दोघांना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.

****

खोटी स्वाक्षरी करून गुंठेवारीची बनावट प्रमाणपत्रं तयार करणाऱ्या पाच जणांविरुद्ध नांदेड इथं वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या गुंठेवारी विभागातील अभियंता विजय दवणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये महापालिकेचे गुंठेवारी विभागातील प्रभारी लिपिक गंगाधर जाधव यांचाही समावेश आहे. जाधव या प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातला बहुप्रतिक्षित वेरुळ महोत्सव येत्या २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. महोत्सवाच्या नियोजानसंदर्भात काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत बैठक झाली. दोन दिवस विद्यापीठातल्या सोनेरी महल इथं, तर एक दिवस वेरुळ लेणी परिसरात हा महोत्सव होणार असल्याची माहिती, जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिली. गेल्या सात वर्षांपासून हा महोत्सव झाला नाही. महोत्सवातले कलाकार ठरवण्यासाठी समिती गठित करण्यात आली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

****

महात्मा गांधी अभिमत विद्यापीठाच्या महागामी गुरूकुलाच्या यंदाच्या ऑरा औरंगाबाद या महोत्सवाचा आज आणि उद्या अशा दोन दिवसीय सोहळ्यात समारोप होत आहे. या महोत्सवांतर्गत गेल्या महिन्यात १९ नोव्हेंबरला औरंगाबाद लेणीत पहिला कार्यक्रम सादर झाला. त्यानंतर देवगिरी किल्ला, सोनेरी महल, बिबी का मकबरा आदी ठिकाणी झालेल्या सांगितिक कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. समारोप सोहळ्यात आज सायंकाळी मौलाना आझाद महाविद्यालय परिसरात पीर इस्माईल मकबरा इथं सुफी कव्वाली तसंच महागामीच्या गुरु पार्वती दत्ता यांचं कथक तर उद्या रविवारी सायंकाळी भोकरदन तालुक्यात अन्वा इथल्या मंदिरात महागामीच्या शिष्यांचं ओडिसी नृत्य आणि निरंजन भालेराव यांचं बासरी सादरीकरण होणार आहे.

****

बांगलादेशविरोधात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ ४७१ धावांनी आघाडीवर आहे. काल सकाळी तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा बांगलादेशाचा पहिला डाव १५० धावांवर संपुष्टात, भारतीय संघाने दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या ११० तर चेतेश्वर पुजाराच्या १०२ धावांच्या बळावर २५८ धावा करून दुसरा डाव घोषित केला. काल तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशाच्या दुसऱ्या डावात बिन बाद ४२ धावा झाल्या असून, भारत सध्या ४७१ धावांनी आघाडीवर आहे.

****

स्पेनमध्ये सुरु असलेल्या एफ आय एच महिला हॉकी नेशन्स चषक स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय संघानं आयर्लंडचा पेनल्टी शुटआऊटमध्ये दोन - एक असा पराभव केला. अंतिम फेरीत भारताचा सामना आज स्पेन बरोबर होणार आहे.

****

औरंगाबाद शहरात विमानतळाच्या धर्तीवर बस पोर्ट उभारण्यास सिडकोकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे शहरातल्या सिडको बसस्थानक परिसरात हे बसपोर्ट उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, पुढील प्रक्रिया होऊन बसपोर्टचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती महामंडळचे कार्यकारी अभियंता गणेश राजगिरे यांनी दिली. सिडको बसस्थानकाच्या जागी होणाऱ्या या बसपोर्टसह मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामाचं २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झालं आहे.

****

ग्रामपंचायत निवडणुकासाठी उद्या होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी काल जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. मतदान प्रक्रिया भयमुक्त आणि खुल्या वातावरणात व्हावी यासाठी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं. जिल्ह्यातल्या १९७ ग्रामपंचायती करिता ६३९ केंद्रावर मतदान होणार आहे.

****

११ वं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन परभणी इथं होणार आहे. काल चंद्राबाई वारकरी शिक्षण संस्थेत या संमेलनाच्या नियोजनाची बैठक घेण्यात आली. वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार संजय जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

****

दरम्यान, गोंधळ महर्षी राजारामबापू कदम यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त परभणीत उद्या राज्यस्तरीय गोंधळ लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आयएमए सभागृहात होणाऱ्या या महोत्सवाचा नव्या पिढीने या व्यासपीठाचा लाभ घ्यावा, असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे.

****

केंद्र सरकारच्या सेवापूर्तीची आठ वर्ष झाल्याबद्दल दक्षिण मध्य रेल्वे आणि जालना जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं आजपासून जालना रेल्वे स्थानकावर ‘शासकीय जनकल्याण योजना’ आणि ‘गतिशक्ती’ विषयावर बहु-माध्यम चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन २१ तारखेपर्यंत सुरु राहणार असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे.

****

राज्य परिवहन महामंडळाची नागपूर - शिर्डी बससेवेला परवापासूप प्रारंभ झाला. परवा रात्री ९ वाजता नागपूरहून निघून ही बस काल पहाटे साडे पाच वाजता शिर्डीला पोहचली. या बसमधून ७५ वर्षे वयाच्या ६ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवास केल्याचं महामंडळाकडून सांगण्यात आलं.

****

गर्भवती आणि स्तन्यदा मातांसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या जीवनरेखा कक्षाचं काल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. गर्भवतींना शासकीय यंत्रणेकडून आवश्यक सेवा, सुविधा योग्यप्रकारे मिळण्यासाठी जीवनरेखा कक्षामार्फत समन्वय ठेवला जावा. तसंच प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय गर्भवतींची यादी तयार करून त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती संकलित करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

****

औरंगाबाद इथले पत्रकार दत्ता सांगळे यांचं काल अल्पशा आजाराने निधन झालं, ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर सिल्लोड तालुक्यात पिंपळगाव पेठ या त्यांच्या मूळ गावी काल अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

बीड आगारातील वाहतूक नियंत्रक किशोर जगदाळे याला ३० हजार रुपये लाच घेताना काल रंगेहाथ पकडण्यात आलं. याच आगारात कार्यरत तक्रारदार महिलेला बडतर्फ न करण्यासाठी आणि कर्तव्यावर परत येण्यास मदत करण्यासाठी जगदाळे यानं १ लाख २० हजार रुपये लाच मागितली होती, त्यापैकी पहिला हप्ता घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जगदाळेला रंगेहाथ पकडल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment