Thursday, 1 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  01 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ डिसेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      कोळसा क्षेत्र लिलावातून कोळशा उत्पादनात वाढ होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास.

·      रिझर्व बँकेच्या डिजीटल चलनाला प्रायोगिक तत्वावर सुरुवात.

·      उस्मानाबाद जिल्ह्यात सात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पंधरा कोटी रूपयांचा निधी.

आणि

·      शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर औरंगाबाद जिल्ह्यात आठ ठिकाणी आंदोलन.

****

कोळसा क्षेत्रांच्या लिलावातून कोळशाच्या उत्पादनात वाढ होईल तसंच त्याचा उपयोग राज्याच्या विकासाकरता होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या गुंतवणूक परिषदेत बोलत होते. या लिलावामुळं कोळसा क्षेत्राचा विकास, औद्योगिक वाढ, ऊर्जा निर्मिती बरोबरच राज्याला महसूलही मिळेल, असं त्यांनी नमूद केलं. सध्या कोळशाची मागणी खूप वाढली आहे. येत्या ३०-४० वर्षात ही मागणी वाढतच राहणार आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारनं लिलावासाठी अठरा कोळसा क्षेत्रांची विस्तृत माहिती केंद्र सरकारला दिली आहे. त्यापैकी १० खनन क्षेत्र खाजगी उद्योगांना दिली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. त्यासाठी आवश्यक असलेल्या जमीन अधीग्रहण आणि भरपाई बाबत राज्य सरकारचं काम चांगलं आहे. या क्षेत्रांमधल्या गुंतवणुकीमुळे ऊर्जा क्षेत्रालाही चालना मिळेल, वीज निर्मिती वाढेल. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागातल्या ऊर्जेची गरज भागेल. वीज कपात कमी होईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

****

भारतीय रिझर्व बॅंकेनं आजपासून प्रायोगिक तत्वावर डिजिटल चलन सुरू केलं आहे. हा डिजीटल रुपया टोकनच्या रुपात असून त्याला कायदेशीर मान्यता आहे. काही ठराविक जागांवर हे चलन ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना मर्यादित वापरकर्त्यांच्या गटात उपलब्ध झालं आहे. या चलनाचं मूल्य कागदी आणि नाण्यांच्या मूल्यांइतकच राहणार आहे. याद्वारे मध्यस्थी बॅंका आणि कर्ज देणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येणार आहे. यासाठी आठ बॅंका निश्चित करण्यात आल्या आहेत. या चलनाची सुरवात पहिल्या टप्प्यात मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू आणि भुवनेश्वरमध्ये करण्यात आली आहे. वापरकर्त्याच्या मोबाईल फोनवर बॅंकेनं उपलब्ध करुन दिलेल्या डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून या डिजिटल पैशांची देवाणघेवाण करता येणार आहे. डिजिटल चलन हे रिझर्व बँकेच्या रोख रुपयांचं डिजिटल रुप असून संपर्करहीत व्यवहारांमध्ये याचा वापर करता येईल.

****

राज्यात विविध जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑफलाईन अर्थात पारंपारिक पद्धतीनेही उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. तसंच, अर्ज सादर करण्याची मुदत उद्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली. राज्य निवडणूक आयोगानं नऊ नोव्हेंबर रोजी राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात सात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पंधरा कोटी रूपये मंजुर करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली आहे. त्यांनी आज उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला, त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. उस्मानाबाद जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी देण्यात आल्याच्या घोषणेचा त्यांनी पुनरूच्चार केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कुलदीप मिटकरी, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

****

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरी कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्यासोबत आज झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे उपस्थित होते. ही योजना राबवताना तिथं उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचाही विचार करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

****

नाशिकच्या लढाऊ वैमानिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेले ३२ लढाऊ वैमानिक आज देशसेवेत दाखल झाले. शहरातल्या गांधीनगर इथं आज सकाळी त्यांचा दीक्षांत समारंभ झाला. यावेळी २२ आठवड्यांचं खडतर वैमानिक प्रशिक्षण आणि २३ आठवड्यांचं प्राथमिक प्रशिक्षण घेतलेल्या अशा ५७ अधिकाऱ्यांनी शिस्तबद्ध संचलन केलं.

****

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ५८ टक्के मतदान झालं. या टप्प्यात राज्यातल्या १९ जिल्ह्यांतील ८९ जागांवर मतदान झालं. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी येत्या पाच तारखेला मतदान होणार आहे. मतमोजणी आठ डिसेंबरला होणार आहे.

****

राज्यात आज जे जातीपातीच राजकारण सुरु आहे, त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळं झाली असल्याची टीका महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी आज सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत ही टीका केली. समान नागरी कायदा झाला पाहिजे. मात्र, समान नागरी कायदा हा केंद्राचा अधिकार आहे, एक कोणतंही राज्य यावर निर्णय घेऊ शकत नाही असं ठाकरे यावेळी म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी कुडाळमध्ये येऊन राज ठाकरे यांची यावेळी भेट घेतली.

****

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज आठ ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं. गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री, पैठण, करमाड इथं हे आंदोलन झालं. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी औरंगाबाद - पुणे महामार्गावर गंगापूर इथल्या इसारवाडी फाटा इथं आंदोलन केलं. यावेळी दानवे म्हणाले –

वीज बिलाची सक्ती सरकार करतंय. एकीकडे अस्मानी संकटानं शेतकऱ्याला त्रासलेलं आहे. दुसरीकडे सुल्तानी संकट, या राज्यकर्त्यांचं संकट या शेतकऱ्यांवर एकीकडे दबाव टाकत आहे. शेतकऱ्यांचं वीज बील कट केले जातात. पर्सनल नव्हे तर डीपीहून सगळ्या शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केले जातात हे अतिशय चुकीचं आहे. विमा कंपन्या विमा, सरकार आणि शेतकऱ्यांचा वाटा असतांनाही शेतकऱ्यांना देत नाही. पन्नास-पन्नास रुपयांचं चेक विमा कंपन्या देत आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वैजापूर तालुक्यात शिवूर बंगला इथं चक्का जाम आंदोलन केलं. या आंदोलनामुळे औरंगाबाद - पुणे - मुंबई महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी यावेळी दानवे आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आजचे आंदोलन हे एक प्रकारे नाटक असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. या सरकारनं कोणत्याही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत न करता मुबलक वीज देण्याचे आदेश महावितरणला दिले असल्याचं त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनामध्ये नमुद केलं आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी सुरू होणाऱ्या राज्य क्रीडा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर ते औरंगाबाद दरम्यान सुरू असलेल्या ‘मशाल फेरी’चं आज बीड शहरात आगमन झालं. या फेरीचं छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. काल तुळजाभवानी मंदिरातून या फेरीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या क्रीडा महोत्सवासाठी सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे संघ आज रवाना झाले. विविध क्रीडा प्रकारांसाठीच्या दहा संघांचा यात समावेश आहे. खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि ॲथलेटिक्स या पाच क्रीडा प्रकारांत या स्पर्धा होणार आहेत.

****

जालना जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ या अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी केलं आहे. आज बदनापूर पंचायत समितीमध्ये या उपक्रमाचं उद्‌घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रत्येक कुटुंबाला नियमित स्वच्छ पाणी मिळावे याकरिता जिल्ह्यातील जलस्त्रोतांची तपासणी करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असल्याचं वर्षा मीना यांनी यावेळी सांगितलं.

****

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं आज जागतिक एड्स दिनानिमित्त जालना शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयापासून काढण्यात आलेल्या या फेरीचा समारोप चमन चौकात झाला. हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या एड्स नियंत्रण कक्षाच्या वतीनंही जागतिक एड्स दिनानिमित्त आज जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी एड्स नियंत्रण कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली.

****

No comments:

Post a Comment