Thursday, 1 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती चौकशी करणार

·      हिंदुह्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन

·      राज्यातल्या गड किल्ल्यांच्या विकासासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार, प्रतापगडच्या विकासासाठी २५ कोटी रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले याचं निधन

·      मंदिरांच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

आणि

·      भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द, मालिका न्यूझीलंडनं एक- शून्यनं जिंकली.

****

वेदांता फॉक्सकॉन, टाटा एयरबस यासारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यासंदर्भात सविस्तर चौकशी करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थान करणार असल्याचं त्यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. प्रकल्प राज्याबाहेर का गेले याची कारणे शोधून ही समिती दोषारोप सिद्ध करेल. समिती स्थापन झाल्यापासून ६० दिवसात अहवाल सादर करेल, असं सामंत यांनी सांगितलं.

****

हिंदुह्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गामधल्या नागपूर - ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन येत्या ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर इथं होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी ही माहिती दिली. यावेळी नागपूर मेट्रोच्या दोन मार्गांचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

****

किल्ले प्रतापगडच्या विकासासाठी २५ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काल ३३६व्या शिवप्रताप दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातल्या किल्ले प्रतापगड इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातल्या गड किल्ल्यांच्या विकासासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी प्रतापगडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. शिवप्रतापदिनानिमित्त प्रतापगड फुलांच्या तोरणासह विद्युत रोषणाईनं सजवण्यात आला आहे.

दरम्यान, यावेळी पर्यटन मंत्री लोढा यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांची शिवाजी महाराज्यांच्या आग्र्याहून सुटकेच्या घटनेशी तुलना केल्याच्या कथित आरोपांवरुन काल विरोधी पक्षांनी त्यांच्याविरुद्ध जोरदार टीका केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांनी वाचाळविरांना आवरावे, असे सांगत शिवाजी महाराजांची कोणाशीच तुलना होऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे.

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या लोढा यांच्या या वकत्व्यावर टीका केली. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं आदित्य ठाकरे यांना म्हटलं आहे.

या वकत्व्यावर मंत्री लोढा यांनी आपली बाजू स्पष्ट करताना आपण शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही केली नाही, शिवाजी महाराज सूर्य होते, त्यांची तुलना कोणाशी करण्याचा प्रश्नच नसल्याचं सांगत आपल्या वकत्व्याचं राजकारण केलं जात असल्याचं सांगितलं.

****

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, असं भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते काल सातारा इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यपालांना पदावरुन काढून टाकण्यात येईल याची आपल्याला खात्री असून, त्यासंबंधीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असं ते म्हणाले.

****

ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले याचं काल पुण्यात अल्पशा आजाराने निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. गेल्या वर्षी कर्करोगाचं निदान झालेले कोत्तापल्ले यांच्यावर विषाणू संसर्ग झाल्यामुळे पंधरा दिवसांपासून पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अतिदक्षता विभागात त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवलं होतं. उपचारादरम्यान, त्यांचं काल दुपारी निधन झालं. कोत्तापल्ले यांच्या कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा...

‘‘२९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यात मुखेड इथं जन्मलेले कोत्तापल्ले यांनी देगलूर इथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. पदवी तसंच पदव्युत्तर पदवीत त्यांनी कुलपतींचं सुवर्णपदक पटकावलं होतं. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर १९८० साली त्यांनी पीएच. डी. पदवी मिळवली. बीड इथं मराठीचे अधिव्याख्याता, त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अधिव्याख्याता आणि प्रपाठक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिल्यावर २००५ साली ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले.

 

राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. श्रीगोंदा इथं १९९९ साली झालेलं ग्रामीण साहित्य संमेलन तसंच २००५ साली जालना इथं झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चिपळूण इथं २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.

 

कोत्तापल्ले यांची विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. ‘मूड्स’ कृष्णमेघ हे कवितासंग्रह, ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’, ‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ आदी कथासंग्रह, ‘राजधानी’ हा दीर्घकथा संग्रह, ‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’ या कादंबऱ्या, ‘पापुद्रे’, ‘साहित्याचा अवकाश’ ‘मराठी कविता: एक दृष्टिक्षेप’, आदी समीक्षात्मक ग्रंथ, ‘जोतीपर्व’ हे अनुवादित पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांच्या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.’’

कोत्तापल्ले हे स्वतंत्र प्रतिभेचे, समाजजीवनाशी एकरूप कृतीशील साहित्यिक होते, त्यांच्या निधनाने व्यासंगी आणि कृतीशील साहित्यिकाची उणीव भासत राहील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर, आसाराम लोमटे, दासू वैद्य, यांच्यासह समाजाच्या सर्वच स्तरातून अनेकांनी कोत्तापल्ले यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

नागपूर इथं येत्या १९ डिसेंबरपासून सुरु होणार्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांची काल मुंबईत बैठक झाली. अवकाळी पाऊस, कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करुन सर्वसामान्यांना भेडसावणारी महागाई, बरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नावर अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी केली असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. हे अधिवेशन किमान तीन आठवडे चाललं पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं पवार म्हणाले.

****

मंदिरांच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी भारतीच जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान मंदिरांच्या जमिनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणी नियुक्त विशेष तपास पथकाने आपला अहवाल दिल्यानंतरही काहीही कारवाई झाली नसल्यानं, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती. खंडपीठाने धस यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते, त्याला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाचा निर्णय कायम ठेवल्यानं, धस आणि त्यांच्या पत्नी यांच्यासह सात जणांविरोधात आठ मंदिरांची जमीन ताब्यात घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

****

जागतिक एड्स दिन आज पाळला जात आहे. ‘आपली एकता, आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्याकरीता’ ही यंदाच्या एड्स दिनाची संकल्पना आहे.

यानिमित्त औरंगाबाद जिल्हा एड्स प्रतिबंध, नियंत्रण पथक आणि जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं आज जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते सकाळी साडे आठ वाजता क्रांती चौकातून या फेरीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात येईल.

लातूर जिल्ह्यात १२ एकात्मिक समुपदेशन तसंच तपासणी केंद्रामार्फत आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत एचआयव्ही, एड्सबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. आज सकाळी नऊ वाजता श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालयातून जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तीन ते सात डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राज्य क्रीडा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर ते औरंगाबाद या दरम्यान ’मशाल रॅली’चं आयोजन करण्यात आलं आहे. काल तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून क्रीडा महोत्सवाची ज्योत प्रज्वलित करून या मशाल रॅलीस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. २५ किलोमीटरचं अंतर पूर्ण करून मशाल रॅली सकाळी उस्मानाबाद शहरात दाखल झाली.  विविध महाविद्यालयातले विद्यार्थी तसंच खेळाडूंनी ढोल ताशांच्या गजरात या रॅलीचं स्वागत केलं. ही रॅली बीड, गेवराई, शहागड, अंबड, जालना, बदनापूर मार्गे उद्या औरंगाबादेत पोहचणार आहे.

****

राज्यातल्या गड किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. सांस्कृति कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन या समितीत संजय केळेकर, पांडुरंग बलकवडे, प्र के घाणेकर. ॠषिकेश यादव, पुष्कर सोहोनी, सचिन जोशी, अतुल गुरु, गिरीष टकले, संकेत कुलकर्णी, मुकुंद गोरक्षकर हे सदस्य आहेत. याशिवाय विभागीय समित्यांची देखील स्थापना करण्यात आली आहे. औरंगाबाद आणि नांदेड विभागीय समितीत राजेश नेलगे, प्रमोद बोराडे, सतिश अक्कलकोट, तेजस्विनी आफळे, आणि शैलेश वरखडे यांचा समावेश आहे.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा निवडणुकीच्या खुल्या गटाचे निकाल काल घोषित करण्यात आले. यामध्ये पहिल्या पसंतीच्या फेरीत दोन हजार ७४६ हा विजयासाठीचा आवश्यक टप्पा डॉ.नरेंद्र काळे आणि जहुर शेख खालेद यांनी पार करत विजय मिळवला. उर्वरित उमेदवारांनी मतदानाचा हा टप्पा पार केला नाही. त्यामुळे  भारत खैरनार, योगिता होके, आणि हरिदास सोमवंशी या तीन पहिल्या क्रमांकाच्या उमेदवारांना २४ व्या फेरीनंतर विजयी घोषित करण्यात आलं. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. खुल्या गटातून सूर्यकांत जोगदंड, डॉ. अशोक मोटे, विजय भोपळे, ए टी शिंदे, विष्णु पवार यांची निवड झाली आहे. महिला प्रवर्गातून डॉ. करुणा देशमुख, अनुसूचित जाती प्रवर्गातून डी ए पाईकराव, अनुसूचित जमाती प्रवर्गातून डॉ. अशोक टिपसे, इतर मागास प्रवर्गातून महेश बेंबडे, तर विमुक्त आणि भटक्या जमाती प्रवर्गातून डॉ. संतराम मुंढे विजयी झाले.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका न्यूझीलंडने एक शून्यने जिंकली आहे. मालिकेत कालचा तिसरा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. भारतानं प्रथम फलंदाजी करत, सर्वबाद २१९ धावा केल्या. न्यूझीलंड संघाने १८ षटकांत एक बाद १०४ धावा केलेल्या असताना, पावसामुळे खेळ थांबवावा लागला, तो पुन्हा सुरू होऊ शकला नाही. डकवर्थ लुईस नियमानुसार किमान २० षटकांचा खेळ झालेला नसल्याने, सामना अनिर्णित राहिला. टॉम लॅथम मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काल उस्मानाबाद इथं जनसुनावणी घेतली. यावेळी दाखल ४८ तक्रारीपैकी ४३ प्रकरणांची सुनावणी करण्यात आल्याचं त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. जिल्हा प्रशासनानं सुरू केलेली 'खुशखबर' ही योजना बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. ज्या गावात बालविवाह झाल्याचं निदर्शनास येईल त्या गावातल्या लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळाला स्थगिती देण्याची मागणी राज्य महिला आयोगाने केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, चाकणकर आज लातूर दौऱ्यावर आल्या आहेत. आज सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक होईल.

****

औरंगाबाद शहरातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ भवान महाजन ह्यांच्या 'रस्ता शोधताना' या आत्मकथनाचं काल प्रकाशन झालं. सुप्रसिद्ध बालशल्यचिकित्सक डॉ संजय ओक, प्रसिद्ध साहित्यिक डॉ सतीश बडवे आणि लोकवाङ्मयगृहाचे डॉ भालचंद्र कांगो यावेळी उपस्थित होते.

****

औरंगाबाद शहरातल्या रिक्षा चालकांनी आजपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. रिक्षा चालकांच्या विविध मागण्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे हे बेमुदत संप आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती रिक्षा चालक मालक कृती समितीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

****

No comments:

Post a Comment