Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२
डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचा
विचार केला जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल
बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित वैद्यकीय सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,
मंत्री उदय सामंत, दिपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, रविंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते. जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी
उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्याचा विचार केला जाईल, तसंच
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणखी सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील,
असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. या सोहळ्यात मुख्यमंत्री
वैद्यकीय सहाय्यता निधीच्या बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि टोल
फ्री क्रमांकाचं अनावरण करण्यात आलं.
****
राज्यातल्या वाळू लिलाव
प्रक्रियेचं नवीन धोरण लवकरच अमलात आणलं जाणार असल्याचं, महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं बोलत होते. वाळू लिलाव धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी
स्तरावर समिती नियुक्ती करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अनाधिकृत दगडखणी बंद करून दंडात्मक कारवाई
करावी, इटीएस मशीनद्वारे सर्व दगडखाणींची मोजणी करून अहवाल तयार
करावा, तसंच अनधिकृत गौण खनिजाच्या वाहतुकीस आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार
करण्याच्या सूचना विखे-पाटील यांनी यावेळी केल्या.
****
अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने यंदा खरिपाचं मोठं नुकसान
केलं आहे. तर राज्यात दमदार
पावसामुळे रब्बी हंगामातील पेरा यंदा वाढला आहे. नोव्हेंबरअखेर ४० लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, डिसेंबरअखेपर्यंत
रब्बीचं क्षेत्र ६५ लाख हेक्टरवर जाईल,
अशी माहिती, कृषी विभागाने दिली आहे. नोव्हेंबरअखेर राज्यात ३९ लाख २९ हजार ७९२ हेक्टरवर
पेरणी झाली असल्याची माहिती विकास आणि विस्तार विभागाचे संचालक विकास पाटील यांनी
दिली.
****
राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं कुख्यात दहशतवादी हरप्रीत सिंह याला दिल्लीच्या
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली. हरप्रीत सिंह हा लुधियाना इथल्या
न्यायालयावर बॉम्बहल्ला करण्यामध्ये मुख्य आरोपी आहे. तो पाकिस्तानातल्या आयएसवायएफ
या संघटनेचा प्रमुख लखबीर सिंह रोडे यांचा सहकारी असून, त्याने पाकिस्तानातून आणलेली
शस्त्रास्त्रं भारतात आपल्या सहकार्यांपर्यंत पोहोचवली होती, असं एनआयएनं सांगितलं.
****
देशातल्या एफएम वाहिन्यांनी मद्यपान, अंमली पदार्थ, शस्त्र, गुंडगिरीचं उदात्तीकरण
करणारी गाणी किंवा मजकूर प्रसारित करु नये, असे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं
दिले आहेत. अशा मजकुरांमुळे वाढत्या वयातल्या मुलांवर वाईट परिणाम होतो, गुंडगिरीला
प्रोत्साहन मिळतं, अशी गाणी किंवा मजकूर प्रसारित करणं हे आकाशवाणी कार्यक्रमांचं उल्लंघन
आहे, असं झाल्यास संबंधित वाहिन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्रालयानं
दिला आहे.
****
जल जीवन सर्वेक्षण २०२३ अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात स्वच्छ जल से सुरक्षा अभियानास कालपासून
सुरुवात झाली. ३१ डिसेंबर पर्यंत चालणार्या या अभियानात जिल्ह्यातल्या सर्व पिण्याच्या पाण्याच्या
स्त्रोतांची जैविक आणि रासायनिक तपासणी करण्यात येणार असून, त्याचे अहवाल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसंच जिल्ह्यातल्या जलस्त्रोतांचं
जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. महसूल गावनिहाय पाच महिलांना प्रशिक्षित करण्यात आलं
असून, त्यांच्या माध्यमांतून
पिण्याच्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाने या अभियानात सहभाग
घेऊन अभियान यशस्वी करावं, असं आवाहन त्यांनी
केलं आहे.
****
औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालय, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं आज संत एकनाथ रंग मंदिरात
‘विद्यार्थ्यांची सुरक्षा - शाळा, महाविद्यालय, प्रशासनाची जबाबदारी’ या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद
शहरातले प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यपक, कनिष्ठ महाविद्यालयांचे
प्राचार्य यांना या चर्चासत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे.
****
कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय वेळेनुसात संध्याकाळी
साडे आठ वाजता दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, आणि घाना विरुद्ध उरुग्वे हे सामने,
तर रात्री साडे बारा वाजता सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड आणि ब्राझिल विरुद्ध कॅमेरुन
हे सामने होणार आहेत.
****
थायलंड इथं सुरु असलेल्या आशिया कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या १७ वर्षांखालील
गटात भारताच्या उन्नति हुडानं उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तीनं थायलंडच्या
खेळाडुचा २१ - ११, २१ - १९ असा पराभव केला.
//**********//
No comments:
Post a Comment