Friday, 2 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात येत्या एक एप्रिल २०२३ पासून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये, ई-ऑफिसप्रणाली सुरु करण्यात येणार

·      राज्यात काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना विम्याचे दावे कमी प्रमाणात मिळत असल्याच्या माध्यमांमधल्या वृत्ताचं, केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून खंडन

·      गोवर साथ प्रतिबंधासाठी ११ सदस्यांचं राज्य स्तरीय कृती दल स्थापन

·      ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा

·      प्लास्टीक बंदीच्या आदेशातून, ६० जी एस एम पेक्षा अधिक जाडीच्या बॅग्ज, पेपर कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्रॉ, प्लेटसला वगळलं

·      बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघां जणांना औरंगाबादमध्ये अटक

आणि

·      सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या १११ उमेदवारांना, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या प्रवर्गातून नियुक्ती पत्र देण्यास, मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

****

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात येत्या एक एप्रिल २०२३ पासून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये, ई-ऑफिसप्रणाली सुरु करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. यामुळे राज्यातलं प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत होईल. सर्व कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरु झाल्यानंतर मोबाईलवर देखील कामकाजाच्या संचिका, कागदपत्रे पाहता येतील, तसंच त्याला मान्यता देता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सध्या मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी येणारी संचिका आठ विविध स्तरांमधून येते, त्यामुळे या संचिकेवर निर्णय होण्यास विलंब लागतो, म्हणून गतिमान कारभारासाठी फक्त चार स्तरांवरुनच ही संचिका पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

****

महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना विम्याचे दावे कमी प्रमाणात मिळत असल्याच्या माध्यमांमधल्या वृत्ताचं, केंद्रीय कृषी मंत्रालयानं खंडन केलं आहे. अशी तक्रार असलेले बहुतांशी दावे अर्धवट आहेत, त्यामुळे या दाव्यांची शेतकऱ्यांना वास्तविक रक्कम मिळालेली नाही, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत न टाळता येण्याजोग्या नैसर्गिक संकटांशी संबंधित पीक नुकसानीला, सर्वसमावेशक विमा संरक्षण देण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार काल सरकारच्यावतीनं करण्यात आला. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या दाव्यांच्या भरपाईसाठी एक लाख २५ हजार ६६२ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली असल्याचा कृषी मंत्रालयानं सांगितलं.

****

राज्यातल्या गोवर साथ प्रतिबंधासाठी माजी आरोग्य संचालक डॉक्टर सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांचं राज्य स्तरीय कृती दल स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. गोवर साथीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यातल्या साथ असलेल्या भागात नऊ महिने ते पाच वर्षांच्या आतील बालकांना गोवरची तातडीने लस देण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.

दरम्यान, राज्यात गोवरबाधित रुग्णांची संख्या ७४५ झाली आहे, तर या आजारानं आतापयर्यंरत १८ मुलांचा मृत्यू झाला आहे.

****

राज्यात विविध जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, ऑफलाईन म्हणजेच पारंपारिक पद्धतीनंही उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा, राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. तसंच, अर्ज सादर करण्याची मुदत आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती, राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगानं नऊ नोव्हेंबर रोजी राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती.

****

राज्य सरकारनं एकवेळ वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीक बंदीच्या आदेशातून, ६० ग्रम प्रतिचौरस मीटर- जी एस एम पेक्षा अधिक जाडीच्या बॅग्ज, पेपर कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्रॉ, प्लेटस या वस्तूंना वगळलं आहे, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही माहीती दिली. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागानं २०१८ मध्ये बंदी घातलेल्या या आदेशाची २०२२ पासून कडक अंमलबजावणी सुरू केली होती. यांसंदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं जुलैमध्ये औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय परिषदेत याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लक्ष वेधलं होतं. त्यावेळी त्यांनी अधिसूचनेत आवश्यक ती दुरूस्ती करण्याची ग्वाही दिली होती.

****

बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयाचा इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवत सरकारी फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना वस्तू आणि सेवा कर विभागाच्या औरंगाबाद शाखेनं ताब्यात घेतलं. फरहत इंटरप्राईजेस या कंपनीनं अस्तित्वात नसलेल्या ३५ हून अधिक आस्थापनांच्या नावाने ५०० कोटीहून अधिक रकमेची बनावट देयके सादर करुन त्याद्वारे इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवत असल्याची माहिती जीएसटी पथकाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. फजल अब्दुल गफ्फार मेवावाला आणि मोहम्मद अजीज मोहम्मद फकीर अशी त्यांची नावं असून, या आरोपींकडून बनावट पॅन कार्ड, आधार यासह इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

****

राज्यातल्या १७ लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभा प्रवास योजनेला कालपासून सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान होईल. मराठवाड्यातल्या लातूर, परभणी या लोकसभा मतदार संघासह अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, ठाणे, उत्तर पश्चिम मुंबई, सांगली, मावळ, धुळे, नाशिक, रावेर आणि सोलापूरमध्ये हे अभियान होत आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री महिन्यातून एक दिवस या मतदारसंघात प्रवास करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या १११ उमेदवारांना, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या प्रवर्गातून नियुक्ती पत्र देण्यास, मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिलं जाणार होती. मात्र, नियुक्ती पत्र देण्याविरोधात आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या तीन उमेदवारांनी न्यायालयात तातडीची याचिका दाखल केली. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठानं काल तातडीची सुनावणी घेऊन या नियुक्ती देण्यास स्थगिती दिली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात सात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पंधरा कोटी रूपये मंजुर करण्यात आले असल्याची, माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली. उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला, त्यानंतर त्या काल पत्रकारांशी बोलत होत्या. उस्मानाबाद जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आल्याच्या घोषणेचा त्यांनी पुनरुच्चार केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कुलदीप मिटकरी, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

****

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरी कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासोबत काल झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे उपस्थित होते. ही योजना राबवताना तिथं उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचाही विचार करण्यात यावा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.

****

समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. मात्र, समान नागरी कायदा हा केंद्राचा अधिकार आहे, एक कोणतंही राज्य यावर निर्णय घेऊ शकत नाही, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान कुडाळ इथं पत्रकार परिषदेत यावर मत मांडलं. राज्यात आज जे जातीपातीचं राजकारण सुरु आहे, त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे झाली असल्याच्या टीकेचा पुनरुच्चार त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी कुडाळमध्ये येऊन राज ठाकरे यांची यावेळी भेट घेतली. 

****

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काल आठ ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं. गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री, पैठण, करमाड इथं हे आंदोलन झालं. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी औरंगाबाद - पुणे महामार्गावर गंगापूर इथल्या इसारवाडी फाटा इथं आंदोलन केलं. यावेळी ते म्हणाले,

‘‘वीज बिलाची सक्ती सरकार करतंय. एकीकडे अस्मानी संकटानं शेतकऱ्याला त्रासलेलं आहे. दुसरीकडे सुल्तानी संकट, या राज्यकर्त्यांचं संकट या शेतकऱ्यांवर एकीकडे दबाव टाकत आहे. शेतकऱ्यांचं वीज बील कट केले जातात. पर्सनल नव्हे तर डीपीहून सगळ्या शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केले जातात हे अतिशय चुकीचं आहे. विमा कंपन्या विमा, सरकार आणि शेतकऱ्यांचा वाटा असतांनाही शेतकऱ्यांना देत नाही. पन्नास-पन्नास रुपयांचं चेक विमा कंपन्या देत आहे.’’

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वैजापूर तालुक्यात शिवूर बंगला इथं चक्का जाम आंदोलन केलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसानीच्या प्रमाणात अत्यल्प विमा मिळालेल्या शेतकऱ्यांनी पंचनाम्याच्या प्रमाणीत प्रती काढून घ्याव्यात, असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. खरीप हंगाम २०२२ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी भारतीय कृषी विमा कंपनीनं पहिल्या टप्प्यात २५४ कोटी रूपये नुकसान भरपाईचं वाटप केलं आहे. मात्र नुकसान भरपाईच्या रकमेतील तफावतीबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. क्षेत्र आणि नुकसानीची टक्केवारी एकसारखीच असतानाही बाधित क्षेत्र कमी जास्त दाखवल्यामुळे नुकसान भरपाईच्या रकमेतील तफावतीची प्रकरणं समोर आली असल्याचं पाटील यांनी सांगितलं. लवकरात लवकर ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले.

****

कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा संघ कोस्टारिकाचा चार - दोन असा पराभव करुनही अंतिम १६ मध्ये स्थान मिळवू शकला नाही. अन्य सामन्यात स्पेनला दोन - एक असं पराभूत करत जपान पुढच्या फेरीत दाखल झाला. मोरोक्को आणि क्रोएशियानं देखील अंतिम १६ मध्ये स्थान मिळवलं, तर बेल्जियम आणि कॅनडाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.

****

उस्मानाबाद जिल्हा वसंतराव नाईक मागास समाजसेवा मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सोबा राठोड यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. राठोड यांनी बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष, आश्रम शाळा स्वयंसेवी संस्था संघटनेचे प्रांताध्यक्ष, तसंच भाजप उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस म्हणूनही अनेक वर्ष काम केलं. बावी इथल्या बंजारा समाजातल्या मुला मुलींसाठी त्यांनी शिक्षण संकुल उभारलं आहे.

****

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी सुरू होणाऱ्या राज्य क्रीडा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर ते औरंगाबाद दरम्यान सुरू असलेल्या मशाल फेरीचं काल बीड शहरात आगमन झालं. या फेरीचं छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं.

****

जालना जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत स्वच्छ जल से सुरक्षाया अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी केलं आहे. बदनापूर पंचायत समितीमध्ये या उपक्रमाचं काल द्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. प्रत्येक कुटुंबाला नियमित स्वच्छ पाणी मिळावं याकरता जिल्ह्यातल्या जलस्त्रोतांची तपासणी करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असल्याचं मीना यांनी यावेळी सांगितलं.

नांदेड जिल्ह्यात स्वच्छ जल से सुरक्षाअभियानाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते काल सुरूवात झाली. या अभियानांतर्गत जिल्ह्यातल्या सर्व पाणी स्त्रोतांचं पाणी प्रयोगशाळेत तपासले जाऊन सर्व नागरीकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं त्यानीं सांगितलं.

****

जागतिक एड्स दिनानिमित्त काल औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड इथं जनजागृती फेरी काढण्यात आली.

उस्मानाबाद जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती पवार यांच्या हस्ते जनजागृती फेरीचं उद्घाटन झालं.

****

औरंगाबाद शहरातला रिक्षाचालकांचा संप काल दुपारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला. नवीन दरानुसार मीटरमध्ये बदल करण्यासंदर्भातली मुदत वाढवून देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी हा संप होता. या मागणीसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेण्याचं आश्वासन पांडेय यांनी  दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला.

****

लातूर जिल्ह्यात महिलांसाठी विविध क्षेत्रात केलेलं काम तसंच आरोग्य विभागानं महिलांसाठी राबवलेली कर्करोग निदानासाठी विशेष मोहीम कौतुकास्पद असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. राज्य महिला आयोगातर्फे सुरू करण्यात आलेल्या आयोग आपल्या दारीया अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. महिलांसाठीचे कायदे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लातूर जिल्ह्यातून महिलांवरील अत्याचार, अन्याय याच्या सर्वात कमी तक्रारी येतात. जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या संजीवनी अभियान’, ‘सोशल मिडिया वॉचर’, महिलांसाठी मोफत बससेवा, यासारख्या उपक्रमाचंही चाकणकर यांनी कौतुक केलं.

****

No comments:

Post a Comment