Saturday, 3 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  03 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ डिसेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      दिव्यांगांना स्वावलंबी जीवन जगून प्रगती साध्य करता यावी, यासाठी समाजातल्या सर्व वर्गांनी प्रोत्साहन द्यावं - राष्ट्रपतींचं आवाहन.

·      स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा; विविध कार्यक्रमांनी दिव्यांग दिन साजरा.

·      प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून जी ट्वेंटी परिषद यशस्वी करण्याचं केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचं आवाहन.

आणि

·      २४ व्या राज्य क्रीडा महोत्सवाला औरंगाबाद इथं जल्लोषात प्रारंभ.

****

दिव्यांगांना स्वावलंबी जीवन जगून प्रगती साध्य करता यावी, यासाठी समाजातल्या सर्व वर्गांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते आज नवी दिल्लीत २०२१ आणि २०२२ या दोन वर्षाचे राष्ट्रीय पुरस्कार वितरीत करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमात वर्ष २०२१ साठी २५ व्यक्ती, संस्था आणि संघटनांना तर वर्ष २०२२ साठी २९ व्यक्ती, संस्था आणि संघटनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. दिव्यांगांचं सर्वेक्षण करून दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत देशात सर्वोत्तम जिल्हा ठरण्याचा मान अकोला जिल्हा परिषदेनं पटकावला. राष्ट्रपतींच्या हस्ते अकोला जिल्हा परिषदेला ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार-२०२१’नं गौरवण्यात आलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महाराष्ट्रातील महात्मा गांधी सेवा संघ या संस्थेला दिव्यांग क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आलं, संस्थेचे प्रतिनिधी विजय कान्हेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

****

आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग बंधू आणि भगिनींचे उत्तुंग मनोधैर्य आणि त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. दिव्यांगांना समान संधी मिळाव्यात यावर केंद्र सरकारचा भर असून सर्व महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये आणि दीर्घकालीन पायाभूत सेवा सुविधांच्या निर्मितीमध्ये याचं प्रतिबिंब दिसून येतं, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे

****

राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घोषणा केली. आज दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले –

आपल्या राज्यामध्ये देखील तीन टक्के लोक दिव्यांग बांधव भगिनी आहेत. आणि म्हणून आम्ही ठरवलं, की स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय आपण सुरू करू या. आणि आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय याची मी घोषणा आज या ठिकाणी करू इच्छितो. आता हा विभाग जो आहे, सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येत होता. आता याचं स्वतंत्र मंत्रालय होणार. नव्या विभागांसाठी स्वतंत्र सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी त्याला मिळेल. जवळपास दोन हजार त्रेसष्ठ पदं निर्माण होतील. आणि गोरगरीब, दुर्बल, कष्टकरी, या सर्व दिव्यांग बांधव-भगिनींसाठी एक वरदान म्हणून हा निर्णय ठरेल.

 

दिव्यांग दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. लातूर इथं जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं प्रभात फेरी काढण्यात आली. शहरातल्या १२ विशेष शाळांमधील विद्यार्थी या प्रभात फेरीत सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जिल्हा परिषद इमारतीच्या प्रांगणात या प्रभात फेरीचा समारोप झाला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं.

****

औरंगाबाद इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, घाटीत द हाऊस ऑफ होप या स्वयंसेवी संस्थेनं विविध कार्यक्रमांतून दिव्यांग दिन साजरा केला रक्तदान शिबीर, दिव्यांगांना गरजेचं साहित्य वाटप, सर्वांसाठी मोफत रुग्णवाहिका लोकार्पण आणि घाटीतल्या रक्तपेढीला खाटा देणं या उपक्रमांचा यात समावेश आहे.

****

नांदेड इथं यशवंतराव चव्हाण सभागृहात दिव्यांगाकरीता न्यायालयीन तरतुदी, निदान आणि उपचार या विषयांवर परिसंवाद घेण्यात आला.जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजितकौर यांनी न्यायालयीन तरतुदींविषयी तर डॉ.लक्ष्मीकांत बजाज यांनी दिव्यांगत्व निर्मूलनासाठी शीघ्र निदान आणि उपचार या विषयांवर मार्गदर्शन केलं.

 

उस्मानाबाद इथं दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, चाकाच्या खुर्चीची स्पर्धा यासारख्या विविध १३ क्रीडा प्रकारांमध्ये जिल्ह्यातील जवळपास तीनशे दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले. चित्रकला स्पर्धा ही आज घेण्यात आली. दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या विविध वस्तूंचं प्रदर्शन ही आज भरवण्यात आलं होतं.

****

प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून औरंगाबाद इथं नियोजित जी ट्वेंटी परिषद यशस्वी करण्याचं आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केलं आहे. आज औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात जी-20 शिखर परिषद नियोजनाच्या आढावा बैठकीत डॉ.कराड बोलत होते. येत्या १३ आणि १४ फेब्रुवारीला औरंगाबाद इथं होणारी ही परिषद महिला आणि बालकल्याण या विषयावर असणार आहे. या परिषदेत विविध २० मुद्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये आठ विषय हे अर्थ विषयक तर इतर १२ मुद्यांमध्ये उद्योग, व्यापार, पर्यटन, आदी विषयांचा समावेश आहे. परिषदेचे प्रतिनिधी वेरूळ, अजिंठा, दौलताबाद इथं पर्यटन तसंच औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीचीही पाहणी करणार आहेत. त्या अनुषगाने अजिंठा पर्यंतच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना डॉ कराड यांनी केली. वेरुळ-अजिंठा इथल्या सोयीसुविधा, रस्त्यांची देखभाल दुरूस्ती, रस्त्यांवरील सूचना फलक, पाणी पुरवठा, आदी व्यवस्थेचाही डॉ कराड यांनी आढावा घेतला.

****

कोणत्याही खेळात विजेतेपट पटकावयाचे असेल तर खेळाडूकडे ‘पॅशन, डेडीकेशन आणि हार्डवर्क’ या त्रिसुत्रीची आवश्यकता असल्याचं, प्रख्यात हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित २४ व्या राज्य क्रीडा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला, या महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्यात धनराज पिल्ले बोलत होते. तुळजापूरहून औरंगाबादला आलेल्या क्रीडा ज्योतीने केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाची मशाल प्रज्वलित करून या महोत्सवाचं उद्घाटन झालं. क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन, कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्र-कुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या महोत्सवात खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, अ‍ॅथलेटिक्स या पाच प्रकारात होणाऱ्या स्पर्धांसाठी राज्यातल्या २२ विद्यापीठांचे २ हजार १२० खेळाडू सहभागी झाले आहेत. या सर्व खेळाडूंनी पथसंचलन केलं. या उद्‌घाटन सोहळ्यात धर्मवीर विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

मराठवाड्यातील पहिल्या सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन डॉ. कराड यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. तब्बल ११ कोटी ७५ लाख रुपये खर्चून १० लेनच्या ४०० मीटर लांबीचा सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात येणार आहे.

****

सत्य बोलणारं साहित्य हे समाजाचं दर्पण असतं, प्रगतीशील साहित्य हे जुन्या कटू घटनांना विसरुन वैज्ञानिक दृष्टिकोनातून उद्याचं भविष्य नव्या पद्धतीने दाखवत असल्याचं मत ज्येष्ठ शायर, गीतकार हसन कमाल यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं प्रगतिशील लेखक संघाच्या ११व्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात हसन कमाल बोलत होते. प्रगतीशील लेखक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुखदेवसिंग सिरसा यांनी अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हिंदीमध्ये अनुवादीत व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. या संमेलनात आज परिसंवादासह निमंत्रिताचं कवी संमेलन झालं. तर सायंकाळी ‘कामगार चौक’ ही एकांकिका आणि त्यानंतर शाहिरी जलसा होणार आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या २६६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काल शेवटच्या दिवसापर्यंत सरपंच पदाच्या २६६ जागेसाठी १ हजार चारशे ६ उमेदवारांनी तर सदस्यांच्या २ हजार १७८ जागेसाठी ६ हजार ३३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येत्या पाच डिसेंबर रोजी जिल्ह्यातल्या आठही तहसील कार्यालयात प्राप्त अर्जांची छाननी केली जाणार आहे. येत्या सात डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

****

धुळे जिल्ह्यातल्या आर्वी ते शिरूड चौफुली रस्त्यावरच्या मोघण गावाजवळ एका बेवारस स्थितीत आढळलेल्या कार मधून धुळे पोलिसांनी १६ लाख ९२ हजार ४५० रूपये किंमतीची अफूची बोंडे हस्तगत केली आहेत.

****

No comments:

Post a Comment