Sunday, 4 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी नागपूर ते शिर्डी या हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी सुरु केली आहे. या मार्गावरुन दोघांनी एकत्रित प्रवास सुरु केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या महामार्गाचं काम सुरु झालं असून या महामार्गामुळे नागपूर ते मुंबईचं जवळपास १६ ते १८ तासांचं अंतर केवळ सहा ते सात तासात पार करणं शक्य होणार असल्याचं  मुख्यमंत्री शिंदे यांनी नागपूरमध्ये वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या महामार्गाच्या माध्यमातून १० जिल्हे प्रत्यक्ष आणि १४ जिल्हे अप्रत्यक्षरित्या जोडले जाणार असून या संपूर्ण भागात कृषी, उद्योग समृद्धी येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दिल्लीतल्या अडीचशे प्रभागांसाठी १३ हजार ६०० केंद्रांवर हे मतदान होत असून यातले १०४ प्रभाग महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. या निवडणुकीसाठी १ हजार ३४९ उमेदवार रिंगणात असून यात ७०९ महिलांचा समावेश आहे. सर्व २५० जागांवर भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत असून ३ नामनिर्देशनपत्र रद्द झाल्यानं कॉंग्रेस २४७ जागांवर निवडणुक लढवत आहे. दिल्लीतले १ कोटी ४६ लाख मतदार मतदानासाठी पात्र आहेत. मतमोजणी उद्या होणार आहे.

****

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या होत असलेली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी गुजरात प्रशासनानं आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. उद्या मध्य गुजरातच्या १४ जिल्ह्यांच्या ९३ जागांसाठी २६ हजार केंद्रांवर मतदान होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते चालेल. गुजरातमधल्या ८३३ उमेदवारांचं भवितव्य उद्या २ कोटी ५१ लाख मतदार निश्चित करतील. पहिल्या टप्प्यात गेल्या १ तारखेला मतदान झालं, येत्या ८ तारखेला मतमोजणी होणार आहे.

****

आज नौसेना दिवस साजरा होत आहे. नौसेना दिनाचा मुख्य कार्यक्रम आज विशाखापट्टणम इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

१९७१ साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धात भारतीय नौसेनेनं बजावलेल्या महत्वपूर्ण कामगिरीचा सन्मान आणि आठवण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मजबूत करण्याच्या उद्देशानं भारतानं, भारतात तयार केलेल्या आणि भारताच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुनिश्चित करणं हे भारतीय नौसेनेचं लक्ष्य असल्याचं नौसेना अध्यक्ष एडमिरल आर. हरि कुमार यांनी काल नौसेना दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सांगितलं.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज औरंगाबादमध्ये सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घराबाहेर मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी मंत्री सावे यांनी आंदोलकांची भेट घेतली, संच आंदोलकांना त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याची हमी दिली. राजकीय नेत्यांच्या घरासमोर आठवडाभर ढोल बजाव आंदोलन करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चानं काल केली, त्यानुसार आज मंत्री सावे यांच्या घरासमोर ढोल वाजवून हे आंदोलन करण्यात आलं.

****

भारत आणि बांगलादेशमधल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं १ षटकात तीन गडी गमावत ९ धावा केल्या होत्या. भारताचे आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा २७ धावांवर, तर शिखर धवन सात आणि विराट कोहली केवळ नऊ धावांवर बाद झाले. सध्या श्रेयस अय्यर आणि के एल राहूल हे फलंदाजी करत आहे.

****

नवी दिल्लीत उद्या भरडधान्य-पोषक आहार संमेलन होत असून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. २०२३ या आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या शुभारंभापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचा, भरडधान्याच्या निर्यातीला चालना देणं हा उद्देश आहे. या विशेष संमेलनात भरडधान्याच्या ३० संभाव्य आयातदार देशांबद्दल तसंच भरडधान्याचं उत्पादन करणाऱ्या भारतातल्या २१ राज्यांबद्दल माहिती देणाऱ्या ई पुस्तिकेचं अनावरण करण्यात येणार आहे. 

****

नंदुरबार तालुका पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ४२ लाख रुपयांचा दारुसाठा जप्त केला आहे. कोपर्ली गावात हा विनापरवाना दारुसाठा करण्यात आला होता. जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी मध्यरात्री तालुका पोलीस स्थानकाच्या मदतीनं कोपर्ली गावात एका वस्तीत धाड टाकुन हा मद्य साठा जप्त केला आहे.

//**********//

No comments:

Post a Comment