Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ डिसेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
देशात
१ ऑगस्ट २०२३ पासून औषधांवर बारकोड लावणं अनिवार्य.
·
हिंदुहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून
पाहणी; नागपूर ते शिर्डी अंतर सुमारे सव्वा चार तासात पूर्ण.
·
यवतमाळजवळ
बस आणि कार अपघातात चार जण ठार.
·
लव्ह
जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा देशात लागू करण्याच्या मागण्यांसाठी वसमत इथं हिंदू
समाजाचा मूक मोर्चा.
आणि
·
बांगलादेशसोबत
सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत.
****
देशात पुढील वर्षी १ ऑगस्ट २०२३ पासून औषधांवर बारकोड
लावणं अनिवार्य होणार आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती
केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयाला ‘औषधांचा आधारकार्ड’ असं म्हटलं
जाणार आहे. या बारकोड मध्ये उत्पादनाचा ओळख क्रमांक, औषधाचं नाव आणि जेनेरिक नाव, ब्रॅण्डचे
नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, औषधाची मुदत, उत्पादकाचा
परवाना क्रमांक यासारखी माहिती मिळणार आहे. या निर्णयामुळे बनावट औषधांना आळा बसणार
असल्याचं म्हटलं आहे. अॅलेग्रा, डोलो, ऑगमेंटिन, सॅरिडॉन, कॅल्पोल आणि थायरोनॉर्म यांसारख्या
मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या औषधांसह तीनशे औषधे बारकोडसह बाजारात दाखल होणार आहेत.
त्यानंतर डिसेंबर २०२३ पर्यंत इतर सर्व औषधांवर बारकोड असणार आहे.
****
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर - मुंबई समृद्धी
महामार्गामुळे कृषी आणि उद्योग क्षेत्रात समृद्धी येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी व्यक्त केला आहे. समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी नागपूर इथं आले
असता मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.
एकूण सातशे किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या नागपूर
ते शिर्डी या ५३० किलोमीटरच्या टप्प्याची मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्यासह पाहणी केली. रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम
मोपलवार यांच्यासह इतर अधिकारीही या पाहणी दौऱ्यात हजर होते. उपमुख्यमंत्र्यांनी स्वत:
या वाहनाचं सारथ्य केलं. दहा जिल्ह्यांच्या २६ तालुक्यांतल्या ३९२ गावातून हा महामार्ग
जात आहे. वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना तसंच औरंगाबाद या प्रत्येक जिल्ह्यात
काही मिनिटांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लोकप्रतिनिधी तसंच अधिकाऱ्यांनी
स्वागत केलं. औरंगाबाद इथं पालकमंत्री संदिपान भुमरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ
बागडे यांनी, तर शिर्डी इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील
यांनी त्यांचं स्वागत केलं.
मुख्यमंत्र्यांच्या वाहनाने या मार्गावरून दीडशे ते १६०
किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास केला. दुपारी बारा वाजून ४५ मिनिटांनी नागपूरहून या
प्रवासाला प्रारंभ झाला, सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्याचा ताफा शिर्डीत दाखल झाला.
नागपूर ते शिर्डी हे अंतर त्यांनी सुमारे सव्वा चार तासात पार केल्याचं, आमच्या वार्ताहरांनी
कळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ तारखेला या समृद्धी महामार्गाचं
लोकार्पण होणार आहे.
****
नैसर्गिक शेती हा कृषी शिक्षणाचा भाग असेल, आगामी काळात
कृषी शिक्षण अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती पद्धतींचा समावेश करण्याच्या दिशेनं केंद्र
सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं
आहे. ते ग्वाल्हेर इथं नैसर्गिक शेतीविषयक कार्यशाळेला संबोधित करत होते. सकस आहार,
आणि निरोगी शेती आणि सुदृढ मानवजाती या तत्वांचे पालन करण्याची गरज आहे. आणि यासाठीच
आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला हवं असं तोमर यांनी पमूद केलं. किमान आधारभूत किमतींमध्ये
सुमारे दीडपट वाढ तसंच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, आदी उपाययोजनांद्वारे केंद्र
सरकार शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नरत असल्याचं कृषीमंत्री तोमर यांनी सांगितलं.
****
देशातील युवा उद्योजक भारताला जगातली तिसऱ्या क्रमांकाची
आर्थिक महासत्ता बनवतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.
औरंगाबादचे लेखक दत्ता जोशी यांच्या ‘मूव्हिंग ऍस्पिरेशन्स’ या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचं
प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यातल्या २५ कौटुंबिक युवा उद्योजकांच्या व्यवसाय यशोगाथा या पुस्तकामध्ये देण्यात
आल्या आहेत.
****
यवतमाळच्या नेर जवळ बस आणि कार मध्ये धडक होऊन झालेल्या
अपघातात कार मधील चार जण ठार तर बस मधील तेरा प्रवासी जखमी झाले आहे. कार मधील प्रवासी
नांदगाव इथून यवतमाळकडे जात असताना लोणी वटफळी जवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं कार
अमरावती कडे जाणाऱ्या एसटी बसला धडकली. कार मधील राधेश्याम आणि रजनी इंगोले, वैष्णवी
गावंडे आणि सारिका चौधरी यांचा मृत्यू झाला आणि अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. तर, बस
मधले १३ प्रवासी जखमी झाले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये ९ डिसेंबरपर्यंत
समता सप्ताह राबवण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहे. यात विशेष गरजा असणारी
मुले आणि पालकांशी संवाद, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धात्मक कार्यक्रम,
दिव्यांग गुणवंत विद्यार्थ्यांच्या मुलाखती असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या सप्ताहात लोकसहभागातून वर्गणी गोळा करून, दानशूर व्यक्तींचा सहभाग नोंदवून प्रभावीपणे
उपक्रम राबवण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहे.
****
नौसेना दिनाचा मुख्य कार्यक्रम आज विशाखापट्टणम इथं राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू आणि ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत साजरा झाला. १९७१ साली पाकिस्तानशी
झालेल्या युद्धात भारतीय नौसेनेनं बजावलेल्या महत्वपूर्ण कामगिरीचा सन्मान आणि आठवण
करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
भारतीय नौदलातील जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
महिलांसाठी “गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवक” या अभ्यासक्रमाला
आज राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या
हस्ते सुरवात करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र आणि रेवती रॉय फाउंडेशन यांच्यामार्फत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात
आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ७ दिवसांत १०० महिला लाभार्थींना प्रशिक्षण
देण्यात येणार असून संस्थेमार्फत ९० दिवसांचे रोजगार प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना मासिक १२ ते १५ हजार रुपये वेतनावर भारत
सरकारच्या अखत्यारीतील पेट्रोलियम कंपन्यांच्या गॅस स्टेशन, पेट्रोल पंप येथे नियुक्त
करण्यात येणार आहे.
****
लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा देशात लागू करण्यात
यावा या मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं आज हिंदू सकल समाज बांधवांच्या
वतीनं उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या मोर्चाला सुरूवात करण्यात आली. उपविभागीय
अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांना यावेळी विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या मोर्चाच्या
पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच शहरासह तालुक्यातील व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
या मोर्चात कुरुंदा, हट्टा, आंबाचोंडी, पळसगाव, हायतनगर, असेगाव, पांगरा शिंदे, आरळ
यासह इतर तालुक्यांतल्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला
****
क्रिकेट
बांगलादेशसोबत सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट
सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत आहे. आज बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा
निर्णय घेतला. यजमान संघाच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहू शकले
नाहीत. यष्टीरक्षक के एल राहुलच्या ७१ धावा वगळता, भारताचा अन्य एकही फलंदाज समाधानकारक
कामगिरी करू शकला नाही. अवघ्या ४१ षटकं आणि दोन चेंडूत भारतीय संघ १८६ धावांवर तंबूत
परतला. बांगलादेशचा सलामीवीर नजमुल हुसैन हा पहिल्याच षटकांत दीपक चहरच्या गोलंदाजीवर
बाद झाला. मात्र फलंदाजांपाठोपाठ भारतीय गोलंदाजांची कामगिरीही फारशी समाधानकारक झाली
नाही. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या ३८ व्या षटकांत सहा बाद १३३ धावा
झाल्या होत्या. बांगलादेशला जिंकण्यासाठी ७७ चेंडूत ५४ धावांची आवश्यकता आहे, तर भारताला
जिंकण्यासाठी आणखी चार फलंदाज बाद करायचे आहेत.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या
क्रीडा महोत्सवात आज महिला तसंच पुरुष गटात बास्केट बॉलचे सामने झाले.
****
No comments:
Post a Comment