Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 05 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५
डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
येत्या बुधवारपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या हिवाळी
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय
बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे
पार पडावं या दृष्टीनं या बैठकीत चर्चा केली जाईल. २९ डिसेंबरपर्यंत
हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशना दरम्यान विधायक आणि अर्थपूर्ण चर्चा
होईल अशी अपेक्षा संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली आहे.
***
जी - 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांची देशभरातील सर्व महत्वाच्या नेत्यांसोबत नवी दिल्लीत बैठक सुरु
आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या बैठकीत सहभागी झाले आहेत. दरम्यान,
अध्यक्षपदासाठी भारताला समर्थन दिल्याबद्दल पंतप्रधान
मोदी यांनी जगभरातल्या नेत्यांचे आभार मानले आहेत.
***
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान होत आहे.
सकाळी ११ वाजेपर्यंत १९ पूर्णांक १७ शतांश टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये साबरमती इथं तर, केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक नारणापूर इथं मतदान केलं. मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल,
भारतीय जनता पक्षाचे नेते हार्दीक पटेल यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.
उत्तर प्रदेश, ओडिसा, राजस्थान,
बिहार आणि छत्तीसगडमध्येही आज काही ठिकाणी पोटनिवडणुकीचं मतदान
होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये मैनपुरी इथं लोकसभेच्या
जागेसाठी तर रामपूर आणि खतौली इथं विधानसभेच्या जागेसाठी मतदान होत आहे. ओडिशामध्ये
पदमपूर, राजस्थानमध्ये सरदारशहर, बिहारमध्ये
कुढनी तर छत्तीसगडमध्ये भानुप्रतापनगर इथं विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या सर्व
ठिकाणची मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.
***
महाराष्ट्र
आणि कर्नाटक सीमावादाचा निर्णय न्यायालयात होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे. दोन्ही राज्य न्यायालयापुढे
आपल्या भूमिका मांडत आहेत.
दरम्यान,
राज्य सरकारनं समन्वयासाठी नियुक्त केलेल्या दोन मंत्र्यांचा उद्याचा बेळगाव दौरा रद्द
करण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई हे उद्या बेळगावला जाणार
होते. कर्नाटकात आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
***
अंधांसाठीची तिसरी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आजपासून गुरुग्राम इथं सुरु होत आहे.
यजमान भारतासह सात देश आणि दिडशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. देशभरातल्या ९ शहरांमध्ये या स्पर्धेसाठीचे सामने
होणार आहेत.
***
कतार मध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज उप उपांत्य फेरीचा
सामना जपान आणि क्रोएशिया यांच्यात रात्री साडे आठ वाजता तर ब्राजील आणि दक्षिण कोरिया
यांच्यातला सामना रात्री साडे बारा वाजता होणार आहे. काल झालेल्या सामन्यांमध्ये इंग्लंड आणि फ्रांस उपांत्य फेरीत पोहचले आहेत.
***
मीटरमध्ये फेरफार करणं, तसंच आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या औरंगाबाद
शहरातल्या पाच वीज चोरांवर महावितरणनं सिडको पोलिस स्थानकात गुन्हे
दाखल केले आहेत. वेगवेगळ्या भागातले रहिवासी असलेल्या या ग्राहकांनी जवळपास १ लाख ४०
हजार रुपयांची वीज चोरी केली असल्याचं माहावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
***
पुणे-अमरावती ही जलदगती रेल्वे येत्या १६ डिसेंबरपासून पुन्हा सुरु होत आहे. कोरोना
साथीच्या काळामध्ये ही गाडी बंद करण्यात आली होती. शुक्रवार
१६ डिसेंबरला ही गाडी रात्री दहा वाजून पन्नास
मिनिटांनी पुण्याहून सुटेल, ती परळी, परभणी,
पूर्णा, हिंगोली, अकोला मार्गे
अमरावतीला पोहचेल. आठवड्यातून दोन दिवस शुक्रवार आणि रविवारी
ही गाडी धावेल. परतीच्या प्रवासात ती रविवारी
आणि मंगळवारी अमरावतीहून त्याच मार्गे पुण्याला जाईल, अशी माहिती
रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
***
औरंगाबाद शहरात आज गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीरं घेण्यात येत असल्याची माहिती
महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांनी दिली आहे. गोवर साथीला
नियंत्रणात आणण्यासाठी चिकलठाणा, नेहरूनगर, विजयनगर, नक्षत्रवाडी या भागात प्रत्येकी दोन,
तर भवानीनगरात एक याप्रमाणे ही लसीकरण शिबिरं घेतली जात असल्याचं मंडलेचा
यांनी सांगितलं.
***
औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातील बोरगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत ‘विद्यार्थी बचत बँक’ सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे
विद्यार्थी बँकेचे व्यवहार स्वतः करू लागले आहेत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून
पैशांची बचत आणि बँकेचे व्यवहार समजावेत यासाठी ही विद्यार्थी बचत बँक सुरू केली असल्याची
माहिती मुख्याध्यापक एन. डी. अहीरे यांनी दिली आहे.
//**********//
No comments:
Post a Comment