Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ डिसेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यासह देशभरातून मुंबईत
चैत्यभूमीवर अनुयायी दाखल.
·
मुख्यमंत्री
आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात कोणत्याही निवडणुकीस सज्ज-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे.
·
छत्रपती
शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भाजपमध्ये चढाओढ-काँग्रेसचा आरोप.
आणि
·
एसटी
बसेसच्या स्वच्छतेबाबत पंचसुत्रीचा अवलंब करण्याचे निर्देश.
****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण
दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातून मुंबईत चैत्यभूमीवर अनुयायी दाखल
झाले आहेत. चैत्यभूमीवर आज सकाळपासून मोठी रांग लागली आहे. मुंबई महानगरपालिकेनं शौचालयं,
स्नानगृहं, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, मोबाईल चार्जिंग इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करून
देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी ही माहिती
दिली. चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दादर
परिसरातील महानगरपालिकेच्या सहा शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था आहे. महापरिनिर्वाण
दिनानिमित्त अतिरिक्त उपनगरी रेल्वेसह लांब पल्ल्याच्या १४ विशेष गाड्या चालवल्या जाणार
आहेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या
वतीनं विशेष माहिती पुस्तिकेचं आज प्रकाशन करण्यात आलं. बाबासाहेबांच्या प्रेरणादायी
कार्याची, तसंच महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीबाबत माहिती देणारी ही पुस्तिका महानगरपालिकेच्या
जनसंपर्क विभागानं संकलित केली आहे. या सचित्र माहिती पुस्तिकेचं प्रकाशन अतिरिक्त
महानगरपालिका आयुक्त आशिष शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं. या पुस्तिकेचे विनामूल्य
वितरण अनुयायांना करण्यात येते. बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी दिशादर्शक फुगाही आकाशात
सोडण्यात आला. महानगरपालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या भोजन वितरणालाही मान्यवरांच्या
हस्ते सुरुवात करण्यात आली. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही या पुस्तिकेची ई प्रत
उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, उद्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील शासकीय
मानवंदना तसंच हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या
सामाजिक माध्यमावरून करण्यात येणार आहे. सकाळी पावणे आठ ते ९ या कालावधीत हे प्रक्षेपण
करण्यात येणार आहे.
बाबासाहेबांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त औरंगाबाद
इथं ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात
आलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात उद्या सकाळी ११
वाजता हा कार्यक्रम होईल. त्यापूर्वी सकाळी आठ वाजता समता शांती पदयात्रा निघणार आहे.
विद्यापीठात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळयापासून निघणाऱ्या या पदयात्रेचा भडकल
गेट इथं समारोप होईल.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या नेतृत्वात राज्यात कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत, असं भारतीय जनता पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत, पक्षाच्या संघटनात्मक
बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपनं राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर ग्रामपंचायत
निवडणुका जिंकल्या आहेत. कोण काम करतं हे पाहून लोक मतदान करतात, असं बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात
खटला सुरू आहे. न्यायालयाच्या निकालाची सर्वांनी वाट पहावी. न्यायालयाचा अवमान होईल,
असे वर्तन कोणी करू नये, असं आवाहनही बावनकुळे यांनी यावेळी केलं.
****
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यासाठी म्हैसाळ विस्तारित
पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल, तो पर्यंत तातडीने ४२ गावांना पाणी देण्यासाठी पर्यायी
व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत यांनी
आज या भागाचा दौरा करून, परिस्थितीचा आढावा घेतला तसंच पाणी टंचाई असलेल्या ४२ गावातील
दुष्काळग्रस्तांशी त्यांनी थेट संवाद साधला.
पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी यावेळी
बोलताना, पाणी दिलं तर कर्नाटकात जाण्याचा प्रश्नच नसल्याचं सांगितलं, उलट कर्नाटक
मधीलच बांधवांना घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू अशी भूमिका मांडली.
ते म्हणाले –
जर पाणी दिलं तर आमच्या भागातले, कर्नाटकातील जे आमचे बंधु,
भगिनी आहेत, पै पाहुणे, त्यांना सुद्धा आम्ही तुमचं स्वागत करण्यासाठी आणू. पण कधी
आणू? तुम्ही पाणी दिलं तर. पण पाणी नाही दिलं तर इथले लोकं सुद्धा आम्ही जास्तीत जास्त
हे ४२ गावं सोडून सुद्धा आमचे जे महाराष्ट्रातील पै पाहुणे आहेत, त्यांना सुद्धा आम्ही
कर्नाटकात नेऊ.
****
भारतीय जनता पक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान
करण्याची चढाओढच लागली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला
आहे. ते आज मुंबईत बोलत होते. गेल्या महिनाभरात भाजपाच्या चार-पाच नेत्यांनी केलेली
वक्तव्ये अनवधानाने झालेली नसून भाजपनं शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचे जाणीवपूर्वक
रचलेलं षडयंत्र असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने होणारा
अवमान याविरोधात धडक मोर्चा काढणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे
यांनी सांगितलं आहे. ते आज यवतमाळ इथं पक्षाच्या बैठकीत बोलत होते. विधिमंडळ हिवाळी
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी, बेरोजगारी, महागाई या प्रश्नांवर सरकारला जाब विचारणार
असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल
केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज औरंगाबाद इथल्या क्रांती चौकात राज्यपाल हटवा स्वाक्षरी
मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही छत्रपती
शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून त्यांच्या घरासमोर या कार्यकर्त्यांनी
ढोल वाजवत आंदोलन केलं.
****
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी
आज मतदान झालं. दुपारी ३ वाजेपर्यंत ५० पूर्णांक ५१ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी
नारणापूर इथं मतदान केलं. मुख्यमंत्री भुपेंद्र
पटेल, भाजपचे युवा नेते हार्दिक पटेल यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. पंतप्रधानांच्या
मातोश्री हिराबा यांनीही वयाच्या शंभराव्या वर्षी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं.
उत्तर प्रदेशात मैनपुरी इथं लोकसभेच्या जागेसाठी तर रामपूर
आणि खतौली इथं विधानसभेच्या जागेसाठी मतदान झालं तर ओडिशामध्ये पदमपूर, राजस्थानमध्ये
सरदार शहर, बिहारमध्ये कुढनी तर छत्तीसगडमध्ये भानुप्रतापनगर इथं विधानसभेच्या रिक्त
जागांसाठी पोटनिवडणूक झाली. गुजरातसह या सर्व ठिकाणची मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.
****
एसटी बसेसच्या स्वच्छतेबाबत पंचसुत्रीचा अवलंब करण्याचे
निर्देश महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिले आहेत.
महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलेत होते. या पंचसुत्रीत बसेसची अंतर्बाह्य
सखोल स्वच्छता, बसच्या खिडक्या सरकत्या आणि पारदर्शक ठेवणं, खराब खिडक्या त्वरित बदलून
घेणं, गळक्या बसेस मार्गस्थ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, आसनं सुस्थितीत असतील
याची दक्षता घेऊन फाटलेली आसनं तातडीने दुरुस्ती करून घ्यावीत, बसचा अंतर-बाह्य रंग
उडाला असल्यास रंगरंगोटी करून घ्यावी, आदी
सुक्ष्म सुचनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या मध्ये कचरा इतस्तत: न टाकण्याबाबत
विविध माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
****
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन या कार्यक्रमांतर्गत
उस्मानाबाद जिल्ह्यात डिसेंबर महिनाभर स्वच्छ जल से सुरक्षा अभियान राबवलं जात आहे.
या अभियानांतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी इथं गावकऱ्यांना जलस्रोताच्या ठिकाणी
जाऊन पिण्याच्या पाण्याच्या तपासण्या घेण्यासाठीचं प्रात्यक्षिक आज दाखवण्यात आलं.
गावातील पाणी स्रोतांच्या जैविक तसंच रासायनिक चाचण्या करून गावकऱ्यांना त्यातील घटकाबद्दल
माहिती दिली जात आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यात नवापूर पोलिसांनी दरोड्याच्या संशयात
अटक केलेले पाच आरोपी पोलीस कोठडीची खिडकी तोडून पसार झाले. हे सर्व सराईत गुन्हेगार
औरंगाबाद जिल्ह्यातले रहिवासी असल्याचं समजतं. त्यांना शोधण्यासाठी आज सकाळपासून शोधमोहीम
राबवली जात आहे. यापैकी एकाला गुजरात पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
****
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या कार्यकर्त्या शाहिरा
केशर जैनू चांद यांचं आज मुंबईत वृद्धापकाळनं निधन झालं. त्या ७८ वर्षांच्या होत्या.
केशर चांद यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख आणि पती शाहीर जैनू चांद यांच्यासह
संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह गिरणी कामगारांच्या चळवळीत सांस्कृतिक प्रबोधनाचं मोठं
कार्य केलं होतं.
****
No comments:
Post a Comment