Monday, 5 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गामुळे कृषी आणि उद्योग क्षेत्रात समृद्धी येईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास

·      देशात येत्या १ ऑगस्ट पासून जीवनावश्यक औषधांवर बारकोड लावणं अनिवार्य होणार

·      छत्रपती शिवाजी महराजांविषयी केलेल्या क्तव्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांची माफी

·      लातूरची मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी खाजगी कंपनी चालवणार -खासदार सुधाकर शृंगारे

·      बनावट लग्न लावून लाखो रुपयांसह सोन्या चांदीचे दागिने घेऊन पसार होणारी टोळी पैठण पोलिसांच्या ताब्यात

आणि

·      पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बांगलादेशचा भारतावर एक गडी आणि चार षटकं राखून विजय

****

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गामुळे कृषी आणि उद्योग क्षेत्रात समृद्धी येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी काल नागपूर इथं आले असता मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.

एकूण सातशे एक किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटरच्या टप्प्याची मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाहणी केली. रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह इतर अधिकारीही या पाहणी दौऱ्यात हजर होते. उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: या वाहनाचं सारथ्य केलं. दहा जिल्ह्यांच्या २६ तालुक्यातल्या ३९२ गावातून हा महामार्ग जात आहे. वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना तसंच औरंगाबाद या प्रत्येक जिल्ह्यात काही मिनिटांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लोकप्रतिनिधी तसंच अधिकाऱ्यांनी स्वागत केलं.

जालना जिल्ह्यात जामवाडी इथं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, माजी  राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचं स्वागत केलं.

औरंगाबाद इथं पालकमंत्री संदिपान भुमरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी, तर शिर्डी इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, यांनी त्यांचं स्वागत केलं.

मुख्यमंत्र्यांच्या वाहनानं या मार्गावरून दीडशे ते १६० किलोमीटर प्रतितास वेगानं प्रवास केला. दुपारी बारा वाजून ४५ मिनिटांनी नागपूरहून या प्रवासाला प्रारंभ झाला, सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्याचा ताफा शिर्डीत दाखल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ तारखेला या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे.

****

देशात १ ऑगस्ट २०२३ पासून जीवनावश्यक औषधांवर बारकोड लावणं अनिवार्य होणार आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयाला 'औषधांचा आधारकार्ड' असं म्हटलं जाणार आहे. या बारकोड मध्ये उत्पादनाचा ओळख क्रमांक, औषधाचं नाव आणि जेनेरिक नाव, ब्रॅण्डचे नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, औषधाची मुदत, उत्पादकाचा परवाना क्रमांक यासारखी माहिती मिळणार आहे. या निर्णयामुळे बनावट औषधांना आळा बसणार असल्याचं म्हटलं आहे.

****

राज्यातल्या कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा अचानकपणे बंद करणार नसल्याचं शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिक्षण विभागातल्या विविध विषयांवर मांढरे यांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यामुळे कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना दिलासा मिळाला आहे. एकाच गावात कमी विद्यार्थी संख्या असलेल्या दोन सरकारी शाळांचं समायोजन करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असं मांढरे यांनी यावेळी सांगितलं. दुर्गम भागात, डोंगर खोऱ्यात कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा सुरूच ठेवणार असल्याचंही मांढरे यांनी स्पष्ट केलं.

****

राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये ९ डिसेंबरपर्यंत समता सप्ताह राबवण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहे. यात विशेष गरजा असणारी मुले आणि पालकांशी संवाद, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धात्मक कार्यक्रम, दिव्यांग गुणवंत विद्यार्थ्यांच्या मुलाखती असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या सप्ताहात लोकसहभागातून वर्गणी गोळा करून, दानशूर व्यक्तींचा सहभाग नोंदवून प्रभावीपणे उपक्रम राबवण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहे.

****

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. अहमदाबाद, बडोदा आणि गांधीनगरसह १४ जिल्ह्यांतल्या ९३ जागांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ६९ महिलांसह एकूण ८३३ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही टप्प्यातील मतदानाची मोजणी गुरुवारी म्हणजेच ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

****

नौसेना दिन काल साजरा झाला. नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम काल विशाखापट्टणम इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत झाला. १९७१ साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धात भारतीय नौसेनेनं बजावलेल्या महत्वपूर्ण कामगिरीचा सन्मान आणि आठवण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय नौदलातील जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईत नौदल दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी साजरा करण्यात आला. विद्युत रोषणाई करण्यात आलेल्या गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने नौदलाच्या सैनिकांनी संचलन केलं. कमांडोंची धाडसी प्रात्यक्षिकं तसंच विविध हेलिकॉप्टर्सनी सादर केलेली थरारक प्रात्यक्षिकं उपस्थितांना पाहता आली.

****

छत्रपती शिवाजी महराजांविषयी केलेल्या क्तव्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी माफी मागितली आहे. शिवरायांचा जन्म कोकणात झाला असं वक्तव्य लाड यांनी काल मुंबईत बोलतांना केलं होतं, त्यावर सर्व स्तरातून टिका झाल्यावर त्यांनी माफी मागत कोकण ही शिवरायांची कर्मभूमी होती, माझ्याकडून अनावधानाने जन्मभूमी शद्बप्रयोग झाला, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलं आहे, आपण आपली चूक त्वरित दुरुस्त केल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

लातूरची केंद्र शासनाची  मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी खाजगी कंपनी चालवणार असून, त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. हा कारखाना खाजगी कंपनी चालवणार असली त्यावर नियंत्रण मात्र केंद्र सरकारचंच असेल त्यांनी सांगितलं. येत्या अधिवेशनात लातूरला आकाशवाणी केंद्र सुरु करण्यासाठी प्रश्न उपस्थित करणार असल्याचं सांगून लातूर-टेंभूर्णी रस्ता चौपदरीकरण, चाकूर इथं महाराष्ट्र औद्यिगिक विकास महामंडळ -एमआयडीसी उभारणासाठीही पाठपुरावा करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

बनावट लग्न लावून लाखो रुपयांसह सोन्या चांदीचे दागिने घेऊन पसार होणारी टोळी औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. नाथसमाधी मंदिर परिसरात काही संशयित व्यक्ती लग्नाचा बनाव करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना मिळाली. त्यांनी या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हा प्रकार समोर आला. पोलिसांनी बनावट नवऱ्यामुलीसह चार आरोपींना अटक केली. अंबादास नवनाथ नागरे, राजु अंकुश चाबुकस्वार, उमेश गणेश गिरी, आणि शीला मनोहर बनकर अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याविरोधात पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

औरंगाबाद शहरात काल गोवरच्या साथीची आणखी सहा संशयित बालकं आढळली. यामुळे आतापर्यंत संशयित बालकांची संख्या १०५ इतकी झाली आहे. रुग्ण आढळलेल्या भागात आज नऊ लसीकरण शिबीरं घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. या बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबई इथल्या हाफकीन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. तसंच गोवर साथीला नियंत्रणात आणण्यासाठी आज चिकलठाणा, नेहरूनगर, विजयनगर, नक्षत्रवाडी या भागात प्रत्येकी दोन, तर भवानीनगरात एक याप्रमाणे लसीकरण शिबिरं घेतली जाणार असल्याचं मंडलेचा यांनी सांगितलं.

****

पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बांगलादेशानं भारतीय संघाचा एक गडी आणि चार षटकं राखून पराभव केला. कालच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यजमान संघाच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहू शकले नाहीत. यष्टीरक्षक के एल राहुलच्या ७३ धावा वगळता, भारताचा अन्य एकही फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. अवघ्या ४१ षटकं आणि दोन चेंडूत भारतीय संघ १८६ धावांवर तंबूत परतला. बांगलादेशनं ४६ व्या षटकांत विजयाला गवसणी घातली. झंझावाती नाबाद ३८ धावांची खेळी करून विजय खेचून नेणारा मेहदी हसन सामनावीर ठरला. मालिकेत पुढचा सामना बुधवारी सात तारखेला होणार आहे.

****

कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना आणि फ्रांस संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मेस्सीच्या गोलच्या जोरावर अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियावर २-१ अशा फरकानं मात केली. तर फ्रांसनं ३-१च्या फरकानं पोलंडला पराभूत केलं.

****

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवात काल महिला तसंच पुरुष गटात बास्केट बॉलचे सामने झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संघ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघ आदी संघांनी विजयी सलामी देत, प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवत पुढची फेरी गाठली. खो-खो स्पर्धेत यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ,सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि मुंबई विद्यापीठानं महिला गटात प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला. कब्बडीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या पुरुष संघानं अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या संघावर २ गुणांनी दणदणीत विजय मिळवला.वैयक्तिक क्रिडा प्रकारात ॲथलेटिक्समध्ये  पुण्याच्या सावितीबाई फुले विद्यापीठाची अवंतिका नारले आणि कोल्हापूरचा निखिल पाटील हे वेगवान धावपटू ठरले.लांब उडी प्रकारात सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा पुनाजी चौधरी याची उडी सरस ठरली.एकूणच कालचा दिवस शिवाजी विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या खेळाडूंनी गाजवला.

****

लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा देशात लागू करण्यात यावा या मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं काल हिंदू सकल समाज बांधवांच्या वतीनं उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या मोर्चाला सुरूवात करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांना यावेळी विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.

****

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे  चित्रकार सूर्यभान नागभिडे यांच्या पार्थिवावर काल परभणी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. नागभिडे यांचं परवा शनिवारी निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. चित्रकार, साहित्यिक, गायक असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले नागभिडे यांना अनेक राष्ट्रीय तसंच आंतराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. अनेक चित्रपटांची, तसंच नाटकांची भित्तीपत्रकं, कृषी विद्यापाठांची, नामवंत कंपन्यांची  बोधचिन्ह त्यांनी बनवली आहेत.

****

दिव्यांगांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासह आवश्यक शस्त्रक्रिया आणि सहाय्यभूत साधने उपलब्ध करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचं लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितलं आहे. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दयानंद महाविद्यालयात झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. या सांस्कृतिक स्पर्धेत जिल्ह्यातल्या ४९ शाळांमधल्या २७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी लोकनृत्य, भक्तीगीते, देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण केलं. दिव्यांग विद्यार्थ्यांना यावेळी विविध प्रमाणपत्रांचं वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

मध्य रेल्वे मधील जळगाव रेल्वे स्थानकावर कामासाठी लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस आज आणि उद्या भुसावळहून-अकोला-पूर्णा मार्गे वळवण्यात येणार आहे. दरम्यान, बंगलोर विभागात भुयारी रेल्वे पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे, नांदेड-बंगळुरू एक्स्प्रेस आज यशवंतपूर - माल्लेस्वरम मार्गे वळवण्यात आली आहे.

****

देशातील युवा उद्योजक भारताला जगातली तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद इथले पत्रकार दत्ता जोशी यांच्या 'मूव्हिंग ॲस्पिरेशन्स' या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचं प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते काल राजभवन इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या २५ कौटुंबिक युवा उद्योजकांच्या व्यवसाय यशोगाथा या पुस्तकामध्ये देण्यात आल्या आहेत.

****

No comments:

Post a Comment