Tuesday, 6 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

उद्यापासून सुरु होत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक सध्या दिल्लीत सुरु आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते बैठकीत सहभागी झाले आहेत. हे अधिवेशन २९ डिसेंबपर्यंत  चालणार आहे.

***

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अपर्ण करुन अभिवादन केलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री डॉ विरेंद्र कुमार, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुंबईत राज्यपाल भगत भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईत चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते  अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांनीही  चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.

दरम्यान, देशभरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकर यांच्या अनुयायांनी चैत्यभूमी आणि परिसरात मोठी गर्दी केली आहे. नागपूर इथंही दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बौद्ध अनुयायांनी गर्दी केली आहे. दीक्षाभूमीवर असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या  अस्थीकलशाचं दर्शन घेऊन महामानवाचा जयघोष केला जात आहे. विविध बौद्ध संघटना, समता सैनिक दल तर्फे आदरांजली वाहून दीक्षाभूमीवर असलेल्या त्यांच्या पुतळ्यासमोर सामूहिक बुद्ध वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केलं जात आहे.

औरंगाबादमध्ये भडकल गेट परिसरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे. डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन आणि आम्ही मार्गदिप संघाच्या वतीनं औरंगाबाद इथल्या सामाज कल्याण शासकीय वसतिगृहात सकाळी रक्तदान शिबीरीला सुरुवात झाली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे रक्तदान शिबीर असून औरंगाबादमध्ये रक्त तुटवड्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी या रक्तदान शिबीरात सहभागी होण्याचं आवाहन मार्गदिप संघाचे सुमीत भुईगळ यांनी केलं आहे. फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या वतीनं भडकल गेट इथं एक वही एक पेन हे अभियान राबवण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शोषित वंचित गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी तसंच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा, या उद्देशानं हे एक वही एक पेन अभियान राबवण्यात येत असल्याचं मनिष नरवडे यांनी सांगितलं.

***

राज्यातील सत्तासंघर्षावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी १० जानेवारीला सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं राज्यात असंवैधानिक सरकार सुरू आहे, त्यामुळे सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. १० जानेवारी २०२३ रोजी घटनापीठ बसणार आहे. त्याच दिवशी या प्रकरणाची सुनावणी कोणत्या दिवशी होणार हे ठरवलं जाईल, सं न्यायालयानं म्हटलं आहे.

***

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथं येत्या १ जानेवारीपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. मराठवाड्यात प्रथमच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होत असल्याची माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाच्या आयोजनासंदर्भात  बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यावेळी उपस्थित होते. प्रदर्शनात शेती आणि शेतीपूरक उद्योग, उत्पादनांचे ६०० दालनं उभारली जाणार आहे. दहा जानेवारीपर्यंत चालणाऱ्या प्रदर्शनात ५ जानेवारीपासून सिल्लोड महोत्सव होणार आहे.

***

गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेविषयी केलेल्या वादग्रस्त ट्विटबद्दल तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना काल गुजरात पोलिसांनी जयपूर विमानतळावर अटक केली. गोखले यांचा मोबाईल आणि अन्य साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतलं. साकेत यांनी केलेल्या एका ट्वीटप्रकरणी अहमदाबाद सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भाजप सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रियन यांनी केला आहे.

//**********//

 

No comments:

Post a Comment