Tuesday, 6 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर अभिवादन

·      महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालनिर्णय घेईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·      राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचा येत्या १७ तारखेला मुंबईत मोर्चा

·      लंपी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोवंशीय पशुधनाचं १०० टक्के लसीकरण झाल्याचा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा

·      राज्यातल्या गोवर साथीच्या नियंत्रणासाठी १० कलमी राज्यस्तरीय कृती योजना निश्चित 

आणि

·      राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या स्वच्छतेबाबत पंचसुत्रीचा अवलंब करण्याचे निर्देश

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभर त्यांना अभिवादन केलं जात आहे. देशभरातून मुंबईत चैत्यभूमीवर त्यांचे  अनुयायी दाखल झाले आहेत. चैत्यभूमीवर काल सकाळपासून मोठी रांग लागली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विशेष माहिती पुस्तिकेचं काल प्रकाशन करण्यात आलं. बाबासाहेबांच्या प्रेरणादायी कार्याची, तसंच महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीबाबत माहिती देणारी ही पुस्तिका महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने संकलित केली आहे. या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशीष शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं. बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी दिशादर्शक फुगाही आकाशात सोडण्यात आला. महानगरपालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या भोजन वितरणालाही मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

औरंगाबादमध्येही महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ.ऋषीकेश कांबळे यांचं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आज सकाळी ११ वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. त्यापूर्वी सकाळी आठ वाजता समता शांती पदयात्रा निघणार आहे. विद्यापीठात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघणाऱ्या या पदयात्रेचा भडकल गेट इथं समारोप होईल.

****

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु असून जो काय निर्णय घ्यायचा तो न्यायालय घेईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. यासंदर्भात कर्नाटक आणि महाराष्ट्र कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही असं सांगून महाराष्ट्रानं न्यायालयात आपली बाजू ताकदीनं मांडल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.

दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोणताही वाद निर्माण होऊ नये, म्हणून राज्याच्या दोन मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. सीमा प्रश्नी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत, पक्षाच्या संघटनात्मक बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपनं राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका जिंकल्या आहेत. कोण काम करतं हे पाहून लोक मतदान करतात, असं बावनकुळे म्हणाले.

****

सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यासाठी म्हैसाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल, तो पर्यंत तातडीने ४२ गावांना पाणी देण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत यांनी काल या भागाचा दौरा करून, परिस्थितीचा आढावा घेतला तसंच पाणी टंचाई असलेल्या ४२ गावातील दुष्काळग्रस्तांशी त्यांनी थेट संवाद साधला,

पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी यावेळी बोलताना, पाणी दिलं तर कर्नाटकात जाण्याचा प्रश्नच नसल्याचं सांगितलं, उलट कर्नाटक मधीलच बांधवांना घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू अशी भूमिका त्यानीं मांडली. ते म्हणाले...

‘‘जर पाणी दिलं तर आमच्या भागातले, कर्नाटकातील जे आमचे बंधु, भगिनी आहेत, पै पाहुणे, त्यांना सुद्धा आम्ही तुमचं स्वागत करण्यासाठी आणू. पण कधी आणू? तुम्ही पाणी दिलं तर. पण पाणी नाही दिलं तर इथले लोकं सुद्धा आम्ही जास्तीत जास्त हे ४२ गावं सोडून सुद्धा आमचे जे महाराष्ट्रातील पै पाहुणे आहेत, त्यांना सुद्धा आम्ही कर्नाटकात नेऊ.’’

****

राज्यात नवीन उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण आणलं जाईल. त्याचबरोबर एक खिडकी योजनेद्वारे  जलद परवानग्या दिल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणी, समस्या येऊ नयेत म्हणून हे उद्योगस्नेही धोरण आणलं जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं येत्या १७ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. आघाडीच नेते अजित पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून सातत्यानं होत असलेला महापुरुषांचा अवमान, सीमाभागातील गावांकडून महाराष्ट्रबाहेर जाण्याची इतिहासात पहिल्यांदाच होत असलेली मागणी, मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर पळवल्याने होत असलेलं नुकसान, वाढती महागाई, बेरोजगारी, संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेलं अपयश, अशा अनेक आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला.

नांदेडमधील देगलूर, सांगलीतील जत, सोलापुरातील अक्कलकोट, तसंच गुजरात सीमेलगतच्या गावांसाठी महाविकास आघाडी सरकारनं अनेक विकास कामं जाहीर करून त्यासाठी निधीही उपलब्ध केला होता. शिंदे-फडणवीस सरकारनं त्या कामांना स्थगिती दिल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारनं राज्यपालांना पदावरून हटवलं तरीही हा मोर्चा निघेलच, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

****

भारतीय जनता पक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची चढाओढच लागली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. गेल्या महिनाभरात भाजपाच्या चार-पाच नेत्यांनी केलेली वक्तव्ये अनवधानाने झालेली नसून भाजपाने शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचे जाणीवपूर्वक रचलेलं षडयंत्र असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

****

लंपी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुमारे १०० टक्के गोवंशीय पशुधनाचं लसीकरण झाल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत या लसीच्या १४४ लाख १२ हजार मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या, त्यातून एकूण १३९ लाख ४२ हजार पशुधनाचं मोफत लसीकरण करण्यात आल्याची माहिती विखेपाटील यांनी दिली. लंपी रोगामुळे आतापर्यंत तीन लाख ५० हजार १७१ बाधित पशुधनापैकी दोन लाख ६७ हजार २२४ पशुधन उपचारानंतर रोगमुक्त झाले, ११ हजार २१४ पशू दगावले. अशा पशुपालकांना नुकसान भरपाई पोटी एकूण २८ कोटी ४० लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत, असं ते म्हणाले.

****

राज्यातल्या गोवर साथीच्या नियंत्रणासाठी १० कलमी राज्यस्तरीय कृती योजना निश्चित करण्यात आली आहे. गोवर कृती दलाच्या कालच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यात ताप-पुरळाचं गतीमान सर्वेक्षण, गोवर संसर्ग जास्त असलेल्या ठिकाणांचा शोध, ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातल्या बालकांचं विशेष लसीकरण अभियान यासह विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. सध्या राज्यातल्या ८३६ बालकांना गोवरची लागण झाली असून त्यातल्या १८ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू मुंबई महानगर क्षेत्रातले आहेत. सर्व बालकांना गोवरची लस तातडीनं देण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं केलं आहे.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या स्वच्छतेबाबत पंचसुत्रीचा अवलंब करण्याचे निर्देश महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिले आहेत. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलेत होते. या पंचसुत्रीत बसेसची अंतर्बाह्य सखोल स्वच्छता, बसच्या खिडक्या सरकत्या आणि पारदर्शक ठेवणं, खराब खिडक्या त्वरित बदलून घेणं, गळक्या बसेस मार्गस्थ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, आसनं सुस्थितीत असतील याची दक्षता घेऊन फाटलेली आसनं तातडीने दुरुस्ती करून घ्यावीत, बसचा अंतर बाह्य रंग उडाला असल्यास रंगरंगोटी करून घ्यावी, आदी  सुक्ष्म सुचनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या मध्ये कचरा इतस्तत: न टाकण्याबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

****

आगामी लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचं पक्षाचे ज्येष्ठ नेते तसंच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून परभणीचे लोकसभा प्रभारी असलेले डॉ. कराड यांनी काल यासंदर्भात बैठक घेतली, त्यात त्यांनी ही बाब नमूद केली.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काल औरंगाबाद इथल्या क्रांतीचौकात राज्यपाल हटवा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून त्यांच्या घरासमोर या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत आंदोलन केलं.

****

रोजगार हमी योजनेतील मंजूर काम डिसेंबर अखेर सुरु करुन विभागाने दिलेला इष्टांक प्रत्येक जिल्ह्यांनी पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथे काल यासंदर्भातल्या विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेती साठी रस्ता उपलब्ध करुन द्यावा. विशेषत: जालना जिल्ह्यातील अबंड आणि घनसावंगी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतरस्त्यासाठी गटविकास अधिकारी उपजिल्हाधिकारी यांनी कालबद्ध कार्यक्रम आखून शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करुन द्यावेत असे निर्देश त्यांनी दिले.

****

कतारमध्ये सुरु असलेल्या फीफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल ब्राजीलनं दक्षिण कोरियाचा ४-१ अशा फरकानं  पराभव करत उपांत्यपूर्व  फेरीत प्रवेश केला, तर क्रोएशियानं जपानला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. येत्या शुक्रवारी ब्राझील आणि क्रोएशियामध्ये उपांत्य फेरीचा सामना होईल. अंतिम आठ संघांमध्ये  इंग्लंड, फ्रांस, अर्जेंटीना आणि  नेदरलँड याधीच पोहचले आहेत. राऊंड ऑफ सिस्कटीनमध्ये आज मोरक्को आणि स्पेन यांच्यात सामना होणार आहे.

****

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरु असलेल्या क्रिडा महोत्सवात काल कब्बडी स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महिला संघानं पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संघावर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. बास्केट बॉलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुरुष संघानं साखळी फेरीतील सामन्यात लोणेरे इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. विजेत्या संघाचा आज उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या शिवाजी महाविद्यालयासोबत सामना होणार आहे. वैयक्तिक क्रिडा प्रकारात ॲथलेटिक्समध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला काल तीन पदकं मिळाली. भालाफेकमध्ये सोनाली पवारनं रौप्य, तर सुरेखा आडेनं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत रामेश्वर मुंजाळनं तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या सुशांत जेधेनं सुवर्ण तर नागपूरच्या आरटीएमएन विद्यापीठाच्या शादाब पठाण यानं रौप्य पदक पटकावलं. याच विद्यापीठाच्या प्राजक्ता गोडबोलेनं महिलांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं. शिवाजी विद्यापीठाच्या प्राजक्ता शिंदेनं रौप्य पदक मिळवलं.

****

श्री गुरु गोविंदसिंघजी यांच्या जयंतीनिमित्त नांदेड इथं येत्या २२ डिसेंबरपासून श्री गुरु गोविंद सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचं हे ४९ वं वर्ष आहे. २९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातले १६ संघ सहभागी होणार आहेत.

****

देशातील सर्व घटनात्मक संस्थांची स्वायत्तता, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता  अबाधित ठेवण्या यावी असा ठराव काल कॉम्रेड अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मंजूर करण्यात आला. औरंगाबाद इथं प्रगतीशील लेखक संघाच्यावतीनं आयोजित दोन दिवसीय संमेलनाचा काल समारोप झाला, त्यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डि. लिट पदवी दिल्याबद्दल एमजीएम विद्यापीठाचा अभिनंदनाचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला. तर देशातील वाढत्या मूलतत्ववादाचा आणि अभिव्यक्ति स्वातत्र्यांवर घाला घालणाऱ्या व्यवस्थेविषयी निषेधही या संमेलनात व्यक्त करण्यात आला.

****

लातूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी तसंच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अधिकाधिक कामे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयानं काम करावं, अशा सूचना जिल्हा विकास आणि संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिल्या आहेत. लातूर इथे जिल्हा विकास आणि संनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत काल बोलत होते. जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांमधून सुरु असलेल्या कामांची गती वाढवून ही कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

****

No comments:

Post a Comment