Wednesday, 7 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०७ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आज प्रारंभ झाला. लोकसभेत प्रारंभी दिवंगत सदस्य मुलायमसिंग यादव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. १२ वाजता सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्यांवरच्या चर्चेनं कामकाजाला सुरुवात झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. यावेळी कर्नाटक मधील सदस्यांनी गोंधळ करत त्यांच्या भाषणात अडथळे आणले. मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यासंदर्भात कोणती नोंद केली जात नसल्याचं जाहीर केलं.राज्यसभेत नवनिर्वाचित सभापतीच्या अभिनंदनाचा ठरावावर चर्चा सुरु आहे. 

दरम्यान, लोकसभेत आज बहु-राज्य सहकारी समिति दुरुस्ती विधेयक, २०२२ सादर करण्यात येईल. गृहमंत्री अमित शहा हे विधेयक सादर करतील. सागरी चाचेगिरी विधेयक, २०१९ देखील आज सदनात मंजुरीसाठी सादर होईल. समुद्रात होणारी लुटमार रोखण्यासाठीच्या आणि अश्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेची तरतूद या विधेयकात प्रस्तावित आहे. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर हे विधेयक सादर करतील. डॉ. जयशंकर भारताची परराष्ट्र नीती आणि चालू घडामोडींवर ही यावेळी भाष्य करतील. राज्यसभेत १९७२ च्या विधेयकात सुधारणांसाठी वन्यजीव संरक्षण विधेयक २०२२, सादर होईल. केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तनमंत्री भूपेंद्र यादव हे विधेयक सादर करतील. हे विधेयक पूर्वीच लोकसभेत पारित करण्यात आलेलं आहे.

तत्पूर्वी वार्ताहरांशी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचं हिवाळी अधिवेशन अधिक उपयोगी व्हावं यासाठी सामुहिक प्रयत्न करावेत असं आवाहन सर्व राजकीय पक्षांना केलं. या अधिवेशनात युवा सदस्यांना चर्चेत भाग घेण्याची संधी द्यावी असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशाला प्रगतीच्या नव्या शिखरापर्यंत नेण्यासाठीच्या उद्देशानं या अधिवेशनात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील असं त्यांनी सांगितलं.

***

इटलीरोममध्ये, आज आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचं उद्घाटन झालं, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी उद्घाटन समारंभात भारताच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचून दाखवला. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. या प्रस्तावाला, जगभरातील ७० पेक्षा जास्त देशांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे, जगभरात, शाश्वत शेतीत, भरड धान्याच्या योगदानाचं महत्त्व, आणि एक पोषक, आरोग्यदायी अन्न म्हणून त्याची उपयुक्तता, याबद्दल जनजागृती करण्यास मदत होईल.

***

राज्याच्या सीमावर्ती भागातील गावांची नाराजी कमी करण्यासाठी किमान त्या परिसरातील विकासकामांवरील स्थगिती राज्य सरकारनं तातडीनं मागे घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे.

नांदेडसह सांगली, सोलापूर, नाशिक, नंदूरबार जिल्ह्यातील काही गावं लगतच्या राज्यांमध्ये समाविष्ट होऊ इच्छित असल्याच्या बातम्यांविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना मुंबईत आज ते बोलत होते. ही अतिशय गंभीर बाब असून, राज्य सरकारनं विनाविलंब पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. या गावांच्या प्रामुख्यानं विविध शासकीय योजना आणि पायाभूत सुविधांबाबत तक्रारी आहेत. राज्य सरकारनं त्यांचं निराकरण करण्याबाबत तात्काळ निर्णय घेतले पाहिजेत. अन्यथा महाराष्ट्र तोडू इच्छिणारे त्या नाराजीचा गैरफायदा घेतील, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला.

***

भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेश संघानं प्रथम फलंदाजी करत १७ व्या षटकापर्यंत चार बाद ६ धावा केल्या आहेत. भारताचा गोलंदाज मोहम्मद साईराज यानं दोन तर उमरान मलिक आणि वॉशिंग्टन सुंदर यानं बांगलादेशचा प्रत्येकी एक गडी बाद केला.

****

नाशिक जिल्ह्यातील वणी इथलं सप्तश्रृंगी देवस्थान आणि गडाच्या विकासासाठी आगामी २५ वर्षाच्या दूरदृष्टीने विकास आराखडा तयार करावा अशी सूचना नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे. गडाच्या विकासासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. गडावरील पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर निधीची मागणी करावी, पाझर तलावाच्या जल शुद्धीकरणाचा प्रस्ताव देखील तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. गडावरच्या दुरुस्तीची गरज असलेल्या कुंडांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पंधरा दिवसात सादर करावेत, गडावर स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, असे निर्देशही मंत्री भुसे यांनी यावेळी दिले.

//**********//

No comments:

Post a Comment