Wednesday, 7 December 2022

Text-आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 December 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०७ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ;खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडला सीमावादाचा मुद्दा. 

·      नोटबंदी ही आर्थिक धोरणाशी संबंधित बाब असली तरी निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा न्यायालयाला अधिकार-सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट.

·      स्थानिक सिंचन क्षमता वृद्धीसाठी प्रयत्न करावेत-मुख्यमंत्र्यांचे जलसंधारण विभागाला निर्देश.

आणि

·      राज्य क्रीडा महोत्सवाचा समारोप;डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाला सर्वसाधारण विजेतेपद. 

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आज प्रारंभ झाला. लोकसभेत प्रारंभी दिवंगत सदस्य मुलायमसिंग यादव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. १२ वाजता शून्यकाळानं कामकाजाला सुरुवात झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. यावेळी कर्नाटक मधील सदस्यांनी गोंधळ करत त्यांच्या भाषणात अडथळे आणले. मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यासंदर्भात कोणती नोंद केली जात नसल्याचं जाहीर केलं.

 

भारताला जी-२० देशांचं प्रतिनिधित्व मिळणं ही अभिमानास्पद बाब असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत बोलत होते. जी-२० शिखर संमेलन आणि जी-२० देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची बैठक भारतात यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

****

रेल्वे खाजगीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. रेल्वे मंडळाच्या नियमित कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत असल्याच्या तसंच, कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्याच्या वृत्ताचंही त्यांनी खंडन केलं.

****

राज्यसभेत नवनियुक्त सभापती उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत झाला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, उपसभापती हरिवंश यांच्यासह अनेक पक्षांच्या सदस्यांनी धनखड यांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांना उत्तर देताना धनखड यांनी, आपल्याला दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संसदेच्या या वरिष्ठ सभागृहाने लोकशाही मूल्य अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा देश करत असल्याचं धनखड यांनी नमूद केलं.

 

संसदेचं हिवाळी अधिवेशन अधिक उपयोगी व्हावं यासाठी सामुहिक प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. या अधिवेशनात युवा सदस्यांना चर्चेत भाग घेण्याची संधी द्यावी असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशाला प्रगतीच्या नव्या शिखरापर्यंत नेण्यासाठीच्या उद्देशानं या अधिवेशनात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील असं त्यांनी सांगितलं.

 

लोकहिताचे सगळेच मुद्दे विरोधी पक्षांकडून सदनात उपस्थित केले जातील, असं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकाजुर्न खरगे यांनी म्हटलं आहे. या हिवाळी अधिवेशनातलं धोरण ठरवण्यासाठी विरोधी पक्षांनी आज खरगे यांच्या दालनात एक बैठक घेतली, त्यावेळी खरगे बोलत होते. तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आम आदमी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह विरोधी पक्षांचे नेते या बैठकीत उपस्थित होते. महत्त्वाची सगळी विधेयकं सखोल अभ्यासासाठी संसदेच्या प्रवर समितीकडे किंवा संयुक्त समितीकडे पाठवली जातील, अशी अपेक्षा खरगे यांनी व्यक्त केली.

****

नोटबंदीच्या निर्णयाबाबत न्यायालय मूकदर्शक होऊ शकत नाही, ही बाब आर्थिक धोरणाची असली तरी न्यायालयाला निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने सहा वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटबंदी निर्णयाविरोधात ५८ याचिका दाखल आहेत. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एस.ए.नजीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आज सुनावणी झाली. नोटबंदी निर्णयाची योग्यता नव्हे, तर हा निर्णय घेण्यासंबंधीची प्रक्रिया तपासली जाऊ शकते, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. नोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नव्हती, असं रिझर्व्ह बँकेचे वकील जयदीप गुप्ता यांनी आजच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाला सांगितलं.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात शून्य पूर्णांक ३५ दशांश टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज रेपो दरासह इतर दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. रेपो दरात ही सलग पाचवी वाढ असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मृद आणि जलसंधारण विभागाने पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. विभागाचे बळकटीकरण आणि आर्थिक तरतुदीस सर्वतोपरी पाठबळ देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियानातूनही मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे हे अभियान पुन्हा गतिमान करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत अप्रत्यक्षरीत्या सुमारे १७ लाख २४ हजार ९३३ हेक्टर सिंचन क्षमता स्थापित झाल्याची माहितीही बैठकीत सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

****

अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ऊस, गहू, ज्वारी, तूर, तीळ आणि उडदाच्या सात वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली आहे. भारतीय कृषीसंशोधन परिषदेच्या केंद्रीय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या वतीने ही मान्यता देण्यात आली.

****

प्रख्यात कवयित्री प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार यांना यंदाचा गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. परवा शुक्रवारी ठाणे इथं मराठी ग्रंथ संग्रहालयात त्यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.

****

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या २४ व्या राज्य क्रीडा महोत्सवाचा आज समारोप झाला. या स्पर्धेत यजमान विद्यापीठ संघाने व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, खो-खो आणि कबड्डी या चारही गटात सुवर्णपदक मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. गेल्या २४ वर्षांत यजमान संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यजमान विद्यापीठ पुरुष संघ २६० गुणांसह पहिल्या क्रमांकावर तर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा पुरुष संघ २२० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मुलींच्या गटातलं विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जिंकलं. यजमान विद्यापीठ संघाने मुलींच्या गटात कबड्डी तसंच खोखो स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली तसंच ऑलंपिकपटू सुमंगला शर्मा, क्रीडा राजदूत तथा बास्केटबॉलपटू नवेली देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या समारोप सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाला जनरल चॅम्पियनशीप प्रदान करण्यात आली.

****

बांगलादेशाविरूद्ध आज ढाक्यात सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यातही भारताची स्थिती फारशी समाधानकारक नाही. बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करून दिलेलं २७२ धावांचं आव्हान गाठताना विराट कोहली पाच, शिखर धवन आठ, वॉशिंग्टन सुंदर ११ तर के एल राहुल १४ धावा काढून तंबूत परतले. भारतानं २७ व्या षटकांत चार बाद १२२ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर ५५ तर अक्षर पटेल २३ धावांवर खेळत आहे

****

राज्याच्या सीमावर्ती भागातील गावांची नाराजी कमी करण्यासाठी किमान त्या परिसरातील विकासकामांवरील स्थगिती राज्य सरकारने तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. सांगली, सोलापूर, नाशिक, नंदूरबार, नांदेड जिल्ह्यातील काही गावांनी तेलंगणात समाविष्ट होण्याची परवानगी मागितल्याचे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल १९२ कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी दिली होती, यातील काही कामे निविदा स्तरावर तर काही कामे अंदाजपत्रक स्तरावर असताना राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकारने या कामांना स्थगिती दिल्याचा आरोप चव्हाण यांनी केला, ही स्थगिती तातडीने मागे घ्यावी असं चव्हाण म्हणाले.

****

औरंगाबाद इथं मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटकच्या दोन बसवर केशरी रंगाचा फवारा उडवून घोषणाबाजी करण्यात आली. आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. कर्नाटकच्या बस पोलिस बंदोबस्तात त्यांच्या हद्दीपर्यंत सोडल्या जात आहेत. शहरात कर्नाटक बँकेच्या शाखेलाही पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment