Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 08 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ डिसेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
· गुजरातमध्ये भारतीय जनता
पक्ष ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला बहुमत, तर आम आदमी
पक्षाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा.
· गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल येत्या
१२ डिसेंबर पुन्हा शपथ घेणार.
· महाविकास आघाडीची केंद्र आणि राज्य सरकार विरोधात येत्या
१७ तारखेला मुंबईत मोर्चा.
· नाशिक जिल्ह्यात, त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर
क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित.
आणि
·
४२वं मराठवाडा साहित्य संमेलन येत्या
शनिवारी घनसावंगीमध्ये होणार.
****
गुजरातमध्ये
भारतीय जनता पक्ष ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला
बहुमत मिळालं आहे. आम आदमी पक्षाला या निवडणुकीत फारसं यश मिळालं नसलं तरी पक्षाला
राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुजरातमध्ये
भाजपला सलग सातव्यांदा सत्ता मिळाली आहे. एकूण १८२ पैकी आतापर्यंत
भाजपनं १४१ जागांवर विजय मिळवला आहे, तर आणखी १५ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
दुसरीकडे राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची दाणादाण उडाली असून पक्षाला
आतापर्यंत केवळ १५ जागांवर विजय मिळाला तर दोन जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
आम आदमी पक्षाला पाच जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
म्हणून घोषित करण्यात आलेले इसुदिन गढवी यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. मात्र
एकूण मतांपैकी १४ टक्के मतं पक्षाला मिळाल्यामुळे, आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्ष
म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हिमाचल
प्रदेशात भारतीय जनता पक्ष- राष्ट्रीय लोकदल युतीच्या हातातून सत्ता निसटली असून या
राज्यात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं आहे. एकूण ६८ जागांपैकी आतापर्यंत ३९ जागांवर
विजय मिळाला असून एका जागेवर त्यांचा उमेदवार आघाडीवर आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे
१८ उमेदवार विजयी झाले आहेत तर सात जागांवर
त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. या राज्यात तीन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
पाच
राज्यात झालेल्या एक लोकसभा आणि सहा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचीही आज मतमोजणी पार
पडली. उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदार संघात समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल
यादव विजयी झाल्या आहेत. विधानसभेच्या दोन जागांपैकी एक भाजपला तर दुसरी राष्ट्रीय
लोकदलाला मिळाली आहे. बिहारमधल्या एका जागेवर भाजप, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस
तर ओडिसात बिजू जनता दलाचा उमेदवार विजयी झाला आहे.
****
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय प्राप्त केल्याने राज्यात जल्लोष सुरू
झाला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील
यांनी पक्षाचा विजय मिठाई वाटप करुन साजरा केला. येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री म्हणून
भूपेंद्र पटेल हे पुन्हा शपथ घेणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष
पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शपथविधी
सोहळ्यात सहभागी होतील असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
हिमाचल प्रदेशच्या विजयाबद्दल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हिमाचल प्रदेशचे नागरिक, पक्षाचे नेते, आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. ते आज दिल्लीत वार्ताहरांशी
बोलत होते. गुजरातच्या जनादेशाचा आपण स्विकार करत असून, लोकशाही
प्रक्रियेत जय -पराजय होत असतात, असंही
खरगे म्हणाले.
****
गुजरातचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागला
म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
खासदार शरद पवार यांनी
म्हटलं आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या
बैठकीत ते बोलत होते. यावेळी पवार यांनी दिल्ली महानगर
पालिका आणि हिमाचल प्रदेशच्या निकालाच उदाहरण दिलं. राजकारणात पोकळी असते, गुजरातची पोकळी भाजपाने भरून काढली आणि दिल्लीची पोकळी आम आदमी पार्टीने
भरून काढली आहे. आज अनेकांना बदल हवे आहेत त्याची नोंद कार्यकर्त्यांनी घेऊन ती
पोकळी भरून काढण्यासाठी आवश्यक ते कार्यक्रम घेतले पाहिजेत, असं
ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,
पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
****
कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्या मतांमध्ये विभागणी झाली, त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला गुजरातमध्ये
मिळाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यातील जनतेमध्ये शिंदे- फडणवीस सरकार बद्दल असंतोष आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडला जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहे, सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे, या
सर्व बाबींच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीनं
येत्या १७ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
महाविकास आघाडीच्यावतीनं केंद्र आणि राज्य सरकार विरोधात येत्या
१७ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. महाविकास
आघाडीच्या सर्व नेत्यांची आज मुंबईत यासंदर्भात आढावा बैठक झाली. त्यानंतर ते
पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र द्रोहीच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं
ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद, राज्यातून उद्योग पळवले जात आहे. गुजरातच्या विजयात
महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगाचं श्रेय असल्याचं ठाकरे म्हणाले.
या विरोधात सर्व महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र येत या मोर्चात सहभागी
होण्याचं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं. यावेळी विधानसभेचे
विरोधी पक्षनेते अजीत पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या महाविकास
आघाडीतील घटक पक्षाचे नेते उपस्थित होते.
****
नाशिक जिल्ह्यात, गोदावरी नदीचं उगमस्थान म्हणून ओळख
असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र
म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यामुळे ब्रह्मगिरी परिसरात गौण खनिजासाठी
बेकायदेशीर खोदकामाला पायबंद बसणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरसह कळवण
आणि इगतपुरी तालुक्यातल्या काही भागांचा यात समावेश आहे.
त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीसह वाघेरा, वरस विहीर, गोरठाण, आंबोली, वेळुंजे,
अंबई, काचुर्ली आदी
गावांचा परिसर संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून ब्रह्मगिरी परिसरात खोदकाम करण्याचे प्रकार
वाढल्यानं पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करत ब्रह्मगिरी बचाव
समिती स्थापन केली होती.
****
४२वं मराठवाडा साहित्य
संमेलन येत्या शनिवारी १० डिसेंबरला
जालना जिल्ह्यात घनसावंगीमध्ये होत
आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्धाटन
होणार असून साहित्यिक शेषराव मोहिते हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत. संमेलनाच्या दोन
दिवसात कथाकथन, विविध विषयांवरील परिसंवाद, मराठवाडा, राज्य आणि जिल्हा अशा तीन स्तरावरील
कवींचं संमेलन, बाल मेळावा, प्रकट
मुलाखत आदि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती स्वाताध्यक्ष माजी
आमदार शिवाजी चौथे यांनी दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत ६० टक्के मुलांना पहिली गोवर
लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात गोवर रुबेला
लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांचं सर्वेक्षण करण्यात
आलं आहे. आता १५ ते २५ डिसेंबर आणि १५ ते २५ जानेवारी या
कालावधीत लसीकरणापासून वंचित सर्व बालकांना विशेष मोहीमेद्वारे गोवर
लस देण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात ताप आणि पुरळ
असलेल्या व्यक्तींचे रक्तजल नमुने घेण्याचं काम सुरु आहे.
****
औरंगाबाद इथं उभारण्यात आलेल्या वंदे मातरम सभागृहाचा लोकार्पण सोहळा
उद्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
त्यानंतर इथं नवीन शैक्षणिक धोरणावर आयोजित चर्चासत्राचं उद्धाटन मंत्री पाटील यांच्या
उपस्थितीत होणार असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सतिश
देशपांडे यांनी दिली आहे. दोन एकर परिसरात ही चार मजली इमारत असून यामध्ये दोन
सभागृह, एक आर्ट गॅलरी ॲम्पिथिएटर, अतिथी
कक्ष, प्रदर्शन केंद्रासह अत्याधुनिक सोयी सुविधा असलेलं हे
सभागृह आहे.
****
लव्ह जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतरणाविरोधात हिंगोलीत आज भव्य मुक मोर्चा
काढण्यात आला. याबाबत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात माळेगाव इथल्या खंडोबा यात्रेतील पालखी मिरवणूक आणि इतर
कार्यक्रम शांततेत पार पडावेत, त्यात कसल्याही
प्रकारची बाधा येऊ नये, शांतता रहावी म्हणून पोलीस अधीक्षक
श्रीकृष्ण कोकाटे यांनी कंधार आणि माळाकोळीच्या पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment