Monday, 12 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या सीबीआय कोर्टानं देशमुख यांना जामीन नाकारला होता, त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासमोर या प्रकरणासंदर्भात गेला आठवडाभार सुनावणी झाल्यानंतर आज हा निर्णय सुनावण्यात आला. मात्र केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयने न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यामुळे न्यायालयानं देशमुख यांच्या जामिनाला दहा दिवसांची स्थगिती दिली आहे. १०० कोटी रुपये खंडणी वसूल प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं देशमुख यांना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अटक केली होती.

****

प्रत्येक चलनाच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितलं. डॉलर-रुपयाच्या चढउताराचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं, परकीय चलनाचा वापर बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केला असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. जगातल्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये देशात थेट परकीय गुंतवणुकीचा प्रवाह सर्वाधिक आहे. भारत ही सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे, मात्र विरोधकांना यात अडचण असल्याचा आरोप सीतारामन यांनी केला.

****

रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांतून औषध खरेदी करणं बंधनकारक नसल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याबाबतचं पत्र नुकतंच प्रकाशित केलं. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा निर्णय दिलासादायक ठरणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी त्यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती दत्ता यांचा कार्यकाळ आठ फेब्रुवारी २०३० पर्यंत असेल.

****

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल आज शपथ घेणार आहेत. गांधीनगर इथं आज दुपारी दोन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात, राज्यपाल आचार्य देवव्रत त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि मित्रपक्ष शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

****

माजी केंद्रीय मंत्री भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात परळी इथल्या गोपिनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी गोपिनाथ गडावर कार्यकर्त्यांनी मुंडे यांना आदरांजली वाहिली. भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांनी गोपिनाथ मुंडे यांना अभिवादन करुन मौनव्रत पाळलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

****

भारताच्या अध्यक्षतेखाली जी ट्वेंटी समूहाची चार दिवसीय बैठक उद्यापासून मुंबईत सुरु होणार आहे. या बैठकीत भारत विकसनशील राष्ट्रांचे प्रमुख मुद्दे उपस्थित करणार आहे. तर दुसरीकडे जी ट्वेंटीच्या अर्थ आणि केंद्रीय बँक उपप्रमुखांची पहिली बैठक उद्यापासून बंगळुरु मध्ये सुरु होणार आहे. 

****

सार्वजनिक आरोग्य अधिकारी सार्वभौमिक आरोग्य राखण्यासाठी प्रमुख भूमिका बजावत असतात, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्‍याण मंत्री डॉक्‍टर मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. वाराणसीमध्ये सार्वभौमिक स्‍वास्‍थ्‍य राष्‍ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात ते काल बोलत होते. उत्‍तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यावेळी उपस्थित होते. देशाच्या कोविड प्रतिबंधक मॉडेलची जगभरात प्रशंसा झाली आहे आणि भारत महामारीच्या दयनीय स्थितितून बाहेर पडण्यात यशस्वी झाला असल्याचं, ते यावेळी म्हणाले.

****

स्पेन इथं सुरु असलेल्या एफ आय एच महिला हॉकी नेशन्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पहिल्या सामन्यात चिलीचा तीन - एक असा पराभव केला. भारताचा दुसरा सामना आज जपान सोबत, तर तिसरा सामना बुधवारी दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे.

****

अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय फिनस्विमिंग अजिंक्यपद स्पर्धेत पश्चिम बंगाल संघानं ३२ सुवर्ण पदकांसह ९० पदकं मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. केरळनं १७ सुवर्णपदकांसह ४४ पदकं मिळवत दुसरं तर तेलंणानं १६ सुवर्ण पदकांसह ३४ पदकं मिळवत तिसरं स्थान पटकावलं. महाराष्ट्राला एक सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

****

राज्यात येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तुरळक ठिकाणी मेघ गर्जना तसंच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

//**********//

 

 

No comments:

Post a Comment