Monday, 12 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  12 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ डिसेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      प्रत्येक चलनाच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन.

·      माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर; मात्र १० दिवसांसाठी स्थगिती.

·      अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर.

आणि

·      उस्मानाबाद जिल्ह्यात दोन टप्प्यात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम.

****

प्रत्येक चलनाच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत बोलत होत्या. डॉलर-रुपयाच्या चढउताराचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी रिजर्व्ह बँकेनं, परकीय चलनाचा वापर केला असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. देशात परकीय गुंतवणूक वाढत आहे. उदयोन्मुख बाजारपेठांमधील ५० टक्के गुंतवणूक भारतात येत आहे, याकडेही सीतारामन यांनी लक्ष वेधलं. भारत ही सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे, मात्र विरोधकांना यात अडचण असल्याचा आरोप सीतारामन यांनी केला.

****

चलनी नोटांवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं छायाचित्र हटवण्याचा कोणताही विचार नसल्याचं, केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केलं आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली. चलनी नोटांवर देवीदेवता, स्वातंत्र्यसैनिक तसंच प्रसिद्ध लोकांची चित्रं छापण्याबाबत अनेक निवेदनं सरकारकडे आली आहेत, मात्र नोटांमध्ये कोणताही बदल करण्याचा प्रस्ताव नसल्याचं रिजर्व्ह बँकेनं यापूर्वीच स्पष्ट केल्याची माहिती पंकज चौधरी यांनी दिली.

****

देशभरात आतापर्यंत दहा कोटी ६८ लाखांपेक्षा अधिक कुटुंबांपर्यंत नळाद्वारे पेयजल पुरवलं जात असल्याचं, केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. जलशक्ती मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. १५ ऑगस्ट २०१९ रोजी देशभरात तीन कोटी २३ लाख कुटुंबांना नळाद्वारे पाणी मिळत होतं, गेल्या तीन वर्षात त्यात ५५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं पटेल यांनी सांगितलं.

****

देशभरातल्या ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांची सहा हजार १८० पदं रिक्त आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. सर्व उच्च शिक्षण संस्थांना रिक्त पदं भरण्याचे निर्देश दिले असल्याचं, शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं.

****

अग्नीपथ योजने अंतर्गत सशस्त्र दलात २०२२ या वर्षी ४६ हजार जागा रिक्त असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत आज एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. यापैकी ४० हजार रिक्त जागा थलसेनेत तर ३ हजार नौसेनेत तर वायुसेनेत तीन हजार रिक्त असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, २०१७ ते २०२१ या कालावधीत १ हजार ९१९ अधिकारी आणि २६ हजार नाविकांना नौसेनेत दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं.

****

निवडून आलेले लोकप्रतिनिधीही कायद्याच्या कक्षेबाहेर नसल्याचं राज्यसभेचे नेते पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. आज राज्यसभेत शून्य काळात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केंद्रीय तपास यंत्रणा फक्त विरोधकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला. हा आरोप फेटाळून लावत गोयल यांनी, सामाजिक माध्यमांवरून होणारे असे दावे निराधार असल्याचं सांगितलं. सभापती जगदीप धनखड यांनीही या मुद्यावरून बोलताना, सदनासमोर ठेवले जाणारे विषय हे प्रामाणिक तथ्यावर आधारित असावेत, असं म्हटलं आहे.

****

२००१ च्या ऊर्जा संरक्षण अधिनियमात दुरुस्ती सुचवणाऱ्या विधेयकावर राज्यसभेत आज पुन्हा चर्चा झाली. ऊर्जा दक्षता आणि संवर्धनाला चालना देणारं हे विधेयक केंद्र सरकारला कार्बन क्रेडीट ट्रेडिंग योजना निर्धारित करण्यास सहायक ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेकांनी या विधेयकावरच्या चर्चेत भाग घेऊन आपली मतं मांडली.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन देण्याबाबतचा आपला निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं पुढल्या १० दिवसांसाठी स्थगित केला आहे. देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल असून या प्रकरणी न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या समोर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयानं देशमुख यांना आज जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयाला केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस देशमुख यांची कोठडी कायम राहणार आहे.

****

उद्योगातील कुशल मनुष्यबळासाठी नवीन अभ्यासक्रमांची गरज असल्याचं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. जर्मनीचे वाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी आज मंत्रालयात केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. जर्मनीसह जगातील विविध देशातील उद्योगसमूह महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत. या उद्योगांना लागणारी कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागानं त्या दृष्टीनं पाऊलं उचलावीत, असं मंत्री केसरकर म्हणाले.

****

रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांतून औषध खरेदी करणं बंधनकारक नसल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याबाबतचं पत्र नुकतंच जारी केलं. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना हा निर्णय दिलासादायक ठरणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी त्यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती दत्ता यांचा कार्यकाळ आठ फेब्रुवारी २०३० पर्यंत असेल.

****

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि मित्रपक्ष शासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित होते.

****

विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत, असं आवाहन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांनी केलं आहे. सोलापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १८ वा दीक्षांत समारंभ आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण केलं तर पुढं जाण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो असंही ते यावेळी म्हणाले. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. राजेश गादेवार यावेळी उपस्थित होते. यावेळी ५० संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी तर ५७ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आलं. विविध विद्याशाखांच्या एकूण १७ हजार १९१ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करत असल्याचं कुलगुरूंनी घोषित केलं.

****

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीने आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साहित्याच्या क्षेत्रात सहा, समाजकार्याच्या क्षेत्रात चार आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार, असे एकूण अकरा पुरस्कार यंदा दिले जाणार आहेत. २८ जानेवारी रोजी पुण्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन टप्प्यात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली त्या बैठकीत जिल्हाधिकारी ओंबासे यांनी ही माहिती दिली. १५ डिसेंबर २०२२ ते २५ डिसेंबर २०२२ हा पहिला टप्पा तर १५ जानेवारी २०२३ ते २५ जानेवारी २०२३ असा दुसरा टप्पा असेल. या दरम्यान नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरण न झालेल्या बालकांचं प्राधान्यानं लसीकरण करण्यात येणार आहे.

****

परभणी जिल्ह्यातील हुतात्मा सैनिकांच्या वीरमाता, पत्नी, पिता किंवा माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्याला जिल्हा महसूल तसच पोलीस प्रशासनाचं प्राधान्य असेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. सर्वसामान्य नागरिकांना हुतात्म्यांचा इतिहास माहीत व्हावा, यासाठी हुतात्मा स्मारकासाठी पान्हेरा या गावी जागेची पाहणी केली असून, त्या ठिकाणचं काम लवकरच पूर्णत्वाकडं नेण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. दहावी आणि बारावी परीक्षेत ९० टक्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना रोख दहा हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र तसंच वीरपत्नींना जमिनीचा सातबारा वाटप गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्टेशन इथं आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते आज शवविच्छेदन गृहाचे भूमिपूजन करण्यात आलं. आमदार बंब यांच्या निधीतून या शवविच्छेदन गृहासाठी सात लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

****

औरंगाबाद शहरात आज तुरळक पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे शहरात थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी झाला आहे.

****

No comments:

Post a Comment