Monday, 12 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास

·      नागपूची मिहान परिसरातली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था राष्ट्राला समर्पित

·      मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती

·      राज्यातल्या गुरव समाजासाठी संत काशीबा विकास योजनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा

·      घनसावंगी इथल्या ४२व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप

·      हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदर सिंह सुक्खू, मुकेश अग्निहोत्री उपमुख्यमंत्री

·      गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल आज शपथ घेणार

·      णि

·      ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतीय महिला संघानं सुपर ओवर मध्ये चार धावांनी जिंकला

****

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गामुळे कृषी-उद्योग-पर्यटन तसंच विविध धार्मिक पर्यटनाला लाभ होणार असून, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, या भागाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं काल नागपूर इथं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. २०१७ मध्ये डबल इंजिनचं सरकार सुरु झाल्यानंतर या हामार्गाच्या विकासाचा पाया रचला गेला आणि आज काम ते पूर्णत्वास गेल्याचं मोदी यांनी सांगितलं. ते म्हणाले....

‘‘डबल इंजिन की सरकार महाराष्ट्र मे कितनी तेज गती से काम कर रही है। समृद्धी महामार्ग से नागपूर और मुंबई के बीच दूरी तो कम होगी ही, ये महाराष्ट्र के चोबीस जिलों को आधुनिक कनेक्टिव्हीटी से जोड रहा है। इससे खेती-किसानी को आस्था के विभीन्न स्थलों मे आनेजानेवाले श्रद्धालुओं को, उद्योगों को बहोत बडा लाभ होनेवाला है। रोजगार के नये अवसर बनने वाले है।’’

देशाच्या विकासात पायाभूत सुविधा विकसित करण्यावर आपला भर असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. देशभरात वैद्यकीय क्षेत्रात सुधारणा आणण्यावर आपला भर असून, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालय सुरु करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

तत्पूर्वी पंतप्रधानांनी समृद्धी महामार्गावर पहिल्या टप्प्याच्या झिरो मैल पॉईंट पासून दहा किलोमीटर अंतराचा प्रवास केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी यावेळी उपस्थित होते.

नागपुरात पंतप्रधानांनी फ्रीडम पार्क ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोनं प्रवास केला. या प्रवासात त्यांनी एम्स नागपूरच्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. नागपूर इथल्या मेट्रो दोन मार्गिकांचं भूमिपूजन ही त्यांच्या हस्ते झालं. स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत या रेल्वेगाडीला ही पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. या एक्सप्रेस गाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर तसंच बिलासपूर ही महत्त्वाची शहरं जोडली जाणार आहेत.

****

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लोकार्पण सोहळ्यात बोलताना, समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासाची भाग्य रेखा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या महामार्गावर १३ लाख झाडं लावण्यात आली असून, आणखी ३५ लाख झाडं लावण्याचं नियोजन आहे. हा रस्ता पूर्णपणे पर्यावरणपूरक असून वन्य प्राण्यांसाठी रस्ते पार करण्याची सुरक्षित सोय सुद्धा यामध्ये असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विक्रमी वेळेत भूसंपादन पूर्ण करण्यात आलं असून, या रस्त्यामुळे उद्योग आणि कृषी क्षेत्रात भरभराट येईल, असं ते म्हणाले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसन यांनी, पीएम गतीचं मॉडेल या प्रकल्पांमधून दिसून येत असल्याचं सांगितलं. ठरवलेल्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडे नव्हता, त्यामुळे सिडको, म्हाडा यांसारख्या संस्थांकडून कर्ज घेतलं असून, केवळ नऊ महिन्यात समृद्धीसाठी भूसंपादन करण्यात आलं. यावेळी एकही विरोधी याचिका आली नाही, असं त्यांनी सांगितलं. या समृद्धी महामार्गामुळे राज्यातले १४ जिल्हे थेट जवाहरलाल नेहरू बंदरासोबत जोडले गेले आहेत. या महामार्गामुळे गडचिरोली आणि गोंदिया सारखे जिल्हे देखील मुंबईशी जोडले जातील असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना, राज्यात आणखी सहा राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं सांगितलं. ७५ हजार कोटी रुपयांच्या या हरित महामार्गांचं काम सुरु झालं असून, यात औरंगाबाद ते पुणे महामार्गाचं काम लवकरच सुरू होईल, असं गडकरी म्हणाले.

****

नागपुरच्या मिहान परिसरात उभारण्यात आलेली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्स, पंतप्रधान मोदी यांनी काल राष्ट्राला समर्पित केली. एम्स नागपूर ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था असून तिची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांनी जुलै २०१७ मध्ये केली होती. ही संस्था प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. 

एम्स नागपूर हे वैद्यक शास्त्रातील सर्व प्रमुख विशेष आणि सुपर स्पेशालिटी विषयांचा समावेश असलेलं, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ३८ विभाग असलेलं रुग्णालय आहे. हे रुग्णालय एक हजार ५७५ कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केलं जाणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते चंद्रपूर इथल्या सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी -सिपेट, आणि सेंटर फॉर रिसर्च, मॅनेजमेंट, कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथीस या दोन संस्थांचंही, काल दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी काल गोव्यात नवव्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप सत्रालाही संबोधित केलं. तीन राष्ट्रीय आयुष्य संस्थांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. यामध्ये गोवा इथल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय युनानी औषध संस्था आणि दिल्लीमधल्या राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था यांचा समावेश आहे.

****

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याचं औरंगाबाद इथल्या माळीवाडा इंटरचेंज, जालना जिल्ह्यात निधोना इंटरचेंज, तसंच शिर्डी इथं थेट प्रसारण दाखवण्यात आलं.

****

दिल्ली - मुंबई द्रुतगती महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. हरियाणाच्या गुरुग्रामपासून राजस्थानातल्या अलवर, दौसा इथपर्यंतच्या मार्गाचा या पहिल्या टप्प्यात समावेश आहे. या महामार्गावरच्या प्रत्येक वाहनावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवता येणार असल्याचं, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं सांगितलं आहे.

****

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजीजू यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

****

राज्यातल्या गुरव समाजासाठी संत काशीबा विकास योजनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घोषणा केली. सोलापूर इथं राष्ट्रीय गुरव समाजाच्या महाअधिवेशनात ते काल बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यावेळी उपस्थित होते. गुरव समाजाने आपल्या अधिवेशनात झालेल्या ठरावानुसार इनामातील जमिनी, शिक्षणासाठी योजना, आणि गुरव समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ओबीसी महामंडळाअंतर्गत विकास योजना जाहीर करून, त्यासाठी ५० कोटी रुपयांचं भांडवल देखील घोषित केलं. राज्यातल्या सर्व जिल्ह्यातून सुमारे दहा हजाराहून अधिक गुरव बांधव यावेळी उपस्थित होते.

****

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भारतीय नता पक्ष - बाळासाहेबांची शिवसेना गटानं विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचं वर्चस्व असलेल्या दूध संघाच्या या निवडणुकीत, एकूण २० पैकी १६ जागांवर, भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. खडसे गटाला अवघ्या चार जागांवर विजय मिळाला. दूध संघाच्या विद्यमान अध्यक्ष मंदा खडसे यांचा आमदार मंगेश चव्हाण यांनी पराभव केला.

****

हिमाचल प्रदेशचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते सुखविंदर सिंह सुक्खू यांनी काल शपथ घेतली. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सिमला इथं सुक्खू यांना मुख्यमंत्रिपदाची तर मुकेश अग्निहोत्री यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या शपथग्रहण सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, तसंच काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

****

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल आज शपथ घेणार आहेत. गांधीनगर इथं आज दुपारी दोन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात, राज्यपाल आचार्य देवव्रत त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि मित्रपक्ष शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

****

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथं आयोजित ४२व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप काल साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सद्य:स्थितीत साहित्याची ताकद कुठेतरी कमी झाल्याचं मत लुलेकर यांनी यावेळी केलेल्या भाषणात व्यक्त केलं. वैचारीक वर्ग निर्माण व्हावा, विवेकी समाज घडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आद्य कवयित्री महदंबा यांचं रामसगाव इथं स्मारक उभारावं, घनसावंगी इथं सुसज्ज नाट्यगृह उभारावं, जालना जिल्हा मोसंबी हब म्हणून घोषित करावा, आदी ठराव या संमेलनाच्या समारोप सत्रात संमत करण्यात आले. महापुरुषांबद्यदल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांच्या निषेधाचा ठरावही यावेळी पारित करण्यात आला.

तत्पूर्वी साहित्य संमेलनात काल मराठवाड्यातील राजकीय चित्र - दशा आणि दिशा या विषयावार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. कुरघोडीच्या राजकारणामुळे मराठवाड्याच्या विकासाला अपेक्षित गती मिळाली नाही, यामुळे रस्ते, पाणी, आरोग्यासह इतर अनेक प्रश्न कायम असल्याचं, चव्हाण यावेळी म्हणाले. जातीधर्माचं राजकारण बाजुला ठेऊन सर्वांनी ॲक्शन मोडवर येण्याची गरज, त्यांनी व्यक्त केली. 

****

येत्या १७ तारखेला निघणारा मोर्चा हा महाराष्ट्राची सातत्यानं होत असलेल्या अवहेलनेविरोधात काढत असल्याचं, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत काही कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. छत्रपतींबाबत आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल पंतप्रधानांसोबत बसतात, बेळगाव निपाणीचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री अक्कलकोट, सोलापूरबाबत विधान करतात, मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, अशी टीका ठाकरे यांनी केली.

****

बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीनं काल सोलापुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत घोषणाबाजी करण्यात आली. कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिका संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं होतं, त्याला प्रत्युत्तर म्हणून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सागर शितोळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्राचा द्वेष आणि आंदोलन थांबवा अन्यथा, कर्नाटकात येऊन असंच आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

****

औरंगाबाद शहरालगत चितेगाव इथं जिल्हास्तरीय तब्लिगी इज्तेमाचा काल विशेष दुआ अदा केल्यानंतर समारोप झाला. मागील काही वर्षात साथरोगाने संपूर्ण जगाला  ग्रासलं होतं, अशा साथीपासून मानवजातीचं संरक्षण करण्याची दुआ देखील यावेळी करण्यात आली.

****

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शामराव बोधनकर स्मृति प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारे शामराव बोधनकर पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेते प्राचार्य सोमनाथ रोडे यांना, तर इंद्रायणी मधुकर बोधनकर पुरस्कार समाजवादी कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांना काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला. लेखक डॉ. भवान महाजन यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण झालं. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील कुबेर या शामराव बोधनकर यांच्या चरित्राच्या दुसर्या आवृत्तीचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघादरम्यान सुरु असलेल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या काल मुंबईत झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सुपर ओवरमध्ये चार धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात १८७ धावा केल्या. भारतीय संघानंही पाच गडी गमावत १८७चं धावा केल्या. त्यानंतर टाकण्यात आलेल्या सुपर ओवरमध्ये भारतीय संघानं चार धावांनी विजय मिळवला. स्मृति मंधानानं ७९ धावा केल्या. या विजयाबरोबरच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक - एक अशी बरोबरी साधली आहे.

****

कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना, क्रोएशिया, फ्रान्स आणि मोरोक्को यांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. पहिला उपान्त्य फेरीचा सामना येत्या १४ तारखेला अर्जेंटिना आणि क्रोएशिया दरम्यान, तर दुसरा सामना १५ तारखेला फ्रान्स आणि मोरोक्को दरम्यान होणार आहे.

****

महाराष्ट्र ज्युदो संघटना आणि कोल्हापूर जिल्हा ज्युदो संघटनेच्या वतीनं कोल्हापूर इथं झालेल्या कनिष्ट वयोगटातल्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत, उस्मानाबादचे ज्युदोपटू प्रसाद निंबाळकर आणि ओंकार चौरे यांनी कांस्यपदक पटकावलं. काल या स्पर्धेचा समारोप झाला.

****

रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळतं, त्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावं, असं आवाहन, लातूरचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट यांनी केलं आहे. रेशीम शेतीविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात महारेशीम अभियान राबवलं जात असून, इच्छुक शेतकऱ्यांनी १५ डिसेंबर पर्यंत हरंगुळ इथल्या औद्योगिक वसाहतीमधे असलेल्या जिल्हा रेशीम विकास कार्यालयात नाव नोंदणी करावी, असंही वराट यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment