Monday, 12 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१२ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल आज शपथ घेणार आहेत. गांधीनगर इथं आज दुपारी दोन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात, राज्यपाल आचार्य देवव्रत त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि मित्रपक्ष शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

****

भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड इथं शाई फेक प्रकरणानंतर, संबंधित कार्यक्रमाला बंदोबस्तावर असलेल्या १० पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मात्र या घटनेत पोलिसांचा दोष असेलच असं नाही, त्यामुळे पोलिसांना निलंबित न करता, त्यांची इतरत्र बदली करावी, अशी विनंती पाटील यांनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

****

राष्ट्रीय सौर दिनदर्शिका निर्मिती आणि प्रसारासाठी अमूल्य योगदान देणारे औरंगाबाद इथले कार्यकर्ते अभय मराठे यांचं काल रात्री निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी औरंगाबाद इथं पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

साठ वर्षावरील वृद्ध शेतकऱ्यांना प्रति महिना पाच हजार रुपये पेन्शन देण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ठराव मांडावा, असं आवाहन जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष विधिज्ञ रेवण भोसले यांनी केलं आहे. ते काल उस्मानाबाद इथं बोलत होते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिजोरीवर वार्षिक कोट्यवधी रुपयांचा बोजा पडतो, मात्र शेतकऱ्यांना प्रति महिना पाच हजार रुपये पेन्शन दिल्यास राज्याच्या तिजोरीवर बोजा पडणार नसल्याचं भोसले म्हणाले.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघादरम्यान सुरु असलेल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या काल मुंबईत झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सुपर ओवरमध्ये चार धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत एक - एक अशी बरोबरी साधली आहे.

****

कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना, क्रोएशिया, फ्रान्स आणि मोरोक्को यांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. पहिला उपान्त्य फेरीचा सामना येत्या १४ तारखेला अर्जेंटिना आणि क्रोएशिया दरम्यान होणार आहे.

//*********//

 

No comments:

Post a Comment