Tuesday, 13 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  13 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ डिसेंबर २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे तवांग भागातून चीनची माघार - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं संसदेत निवेदन.

·      महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आता येत्या १० जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी.

·      जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.

आणि

·      मराठवाडा तसंच विदर्भातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची अजित पवार यांची मागणी.

****

अरुणाचल प्रदेशात तवांग भागात नऊ डिसेंबरला चीननं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं चोख प्रत्यूत्तर दिल्यानं तवांग भागातून चीनला माघार घ्यावी लागली, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं. तवांग भागात भारत आणि चिनी सैन्यात चकमक झाल्याचा मुद्दा आज संसदेत विरोधी पक्षांनी उपस्थित केला. त्यावर संरक्षण मंत्री निवेदन देत होते. या चकमकीत एकही भारतीय सैनिक हुतात्मा किंवा गंभीर जखमी झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी घोषणाबाजी केली. या निवेदनावर प्रश्न विचारण्याची संधी मिळाली नसल्याचा आरोप करत विरोधकांनी राज्यसभेत सभात्याग केला. दोन्ही सदनांचं कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं होतं.

****

राजीव गांधी फाऊंडेशनद्वारे परकीय योगदान नियमन कायदा-एफसीआरएच्या उल्लंघनाचा मुद्दा टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. संसद परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. राजीव गांधी फाऊंडेशनला २००५-२००७ दरम्यान चिनी दूतावासाकडून एक कोटी ३५ लाख रुपयांचं मिळालेलं अनुदान हे एफसीआरएच्या नियमांचं उल्लंघन करणारं होतं, असं शहा यांनी सांगितलं. शासनानं नियमानुसार राजीव गांधी फाऊंडेशनची नोंदणी रद्द केली आहे. लोकसभेत याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. पण काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी कामकाजात व्यत्यय आणल्याचं शहा यांनी सांगितलं.

दरम्यान, भारत चीन संघर्ष आणि राजीव गांधी फाऊंडेशनचा परवाना रद्द करणं, या दोन्ही मुद्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही, असं काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

****

आकाशवाणीची स्थानिक प्रसारण केंद्रं बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात बोलत होते. देशभरात आकाशवाणीच्या ५०१ प्रसारण केंद्रांवरून २३ भाषा आणि १८१ बोलीभाषांमधून प्रसारण करत असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. विविध भारतीची राष्ट्रीय सेवा, एफएम रेनबो, आणि एफएम गोल्डसह २८० पेक्षा अधिक वाहिन्या तसंच आकाशवाणी केंद्रांच्या कार्यक्रमांचं थेट प्रसारण सुरू करण्यात आलं आहे. न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून जगभरात कुठेही हे प्रसारण ऐकता येत असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.

****

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांकडे खासदार इम्तियाज जलील यांनी आज लोकसभेचं लक्ष वेधलं. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान खासदार जलील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सरकार एकीकडे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करत असल्याचं सांगतं, दुसरीकडे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढत असल्याचं जलील म्हणाले. सरकारचे श्रीमंत आणि गरीबांसाठी नियम वेगवेगळे असल्याचा आरोपही जलील यांनी केला.

****

संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्याला आज २१ वर्ष पूर्ण झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्वीट संदेशातून या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांनी संसद परिसरात हुतात्म्यांना अभिवादन केलं.

****

जी-20 समूह देशांच्या विकास कृतीगटाची बैठक आजपासून मुंबईत सुरु झाली. या बैठकीत ‘डेटा फॉर डेव्हलपमेंट: रोल ऑफ जी-20’, या विषयावर भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी मार्गदर्शन केलं. नॅशनल डेटा अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म, देशातल्या महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांचा कायापालट करण्यासाठी डेटाचा वापर यासारख्या भारताच्या पद्धती त्यांनी यावेळी सांगितल्या. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या मेळाव्याला संबोधित करताना, डेटा वापरात भारताची भूमिका विशद केली.

****

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आता येत्या १० जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. मात्र आज, झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची मागणी केली. सरन्यायाधीशांनी दोन्ही बाजूंना या मुद्यावर आपलं म्हणणं थोडक्यात लेखी मांडण्याची सूचना केली. शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल आणि महाराष्ट्राचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सिब्बल यांच्या या मुद्यावर आपले लेखी म्हणणे मांडण्यास सहमती दर्शवली आहे.

****

राज्यात जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदींनाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्यातील शाळांना एक हजार शंभर कोटी रुपये अनुदानही राज्यमंत्रिमंडळानं मंजूर केलं. राज्याच्या ग्रामीण भागात ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबवण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळानं घेतला आहे. खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड घालण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्याच्या विविध भागांत सुमारे साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने आज मान्यता दिली. यामाध्यमातून राज्यात ५३ हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ, कामगार कायद्यांतल्या कालबाह्य तरतुदी हटवणं तसंच कारावासाऐवजी वाढीव दंडाची तरतूद करणं, आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १ हजार ५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांचं नियमितीकरण, तसंच महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकारण्यासही राज्यमंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना एका अज्ञाताने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पवार यांच्या निवासस्थानातील दूरध्वनी क्रमांकावर २ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२२ दरम्यान सातत्याने फोन करून धमकी देण्यात आल्याचं, टेलिफोन ऑपरेटरने या तक्रारीत म्हटलं आहे. हा फोन बिहारमधून आला असून ती व्यक्ती हिंदीत बोलत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

मराठवाडा, विदर्भातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपुरचं हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावं, अशी मागणी विधान सभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधान भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. अधिवेशनकाळात नागपूर इथल्या पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. मराठवाड्यासह राज्यातल्या नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात यावं, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, विधीमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचं कामकाज सकाळी साडेनऊ वाजेपासून सुरु व्हावं, आदी मागण्याही अजित पवार यांनी केल्या.

****

माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी आज एक सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांतर्गत सध्या बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडक शाळांमधील १५ वर्षांवरील मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर २४९ शाळांमधील नववी तसंच दहावीतील ४१ हजार ७७४ विद्यार्थ्यांकरीता सुरू करण्यात येणार आहे.

****

राज्यातल्या कृषी वीज ग्राहकांसाठी स्वतंत्र कृषी कंपनी स्थापन करण्यासाठी माजी ऊर्जा सचिव जयंत कावळे यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद इथं आज वीज कर्मचारी आणि संघटनानी निदर्शनं केली. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये कोणत्याही पद्धतीच्या खाजगीकरणाचा एकतर्फी निर्णय सरकार आणि प्रशासनाने घेतला तर त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात वारंगा फाटा- हदगांव मार्गावर सकाळी फिरायला गेलेल्या मुलांना कारने धडक दिल्यानं एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. आज पहाटे हा अपघात झाला. ही कार घटनास्थळावरुन पसार झाली असून, पोलिसांचा तपास सुरु आहे.

****

No comments:

Post a Comment