Tuesday, 13 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१३ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेवरील हल्ल्याला आज २१ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना हुतात्मा झालेल्या नऊ सुरक्षारक्षकांना देशवासियांकडून अभिवादन केलं जात आहे. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सैनिकांचं बलिदान सदैव स्मरणात राहील आणि देश त्यांचा ॠणी असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

जी-२० समूह देशांच्या विकास कृतीगटाची बैठक आजपासून मुंबईत सुरु झाली. या बैठकीसाठी विविध देशांमधून आलेल्या प्रतिनिधींचं स्वागत शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून करण्यात आलं. विकासासाठी डेटा, हरित विकासात लाईफ संकल्पनेचा समावेश करणं आणि २०३० च्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टासाठी प्रगतीला वेग देणं अशा विषयांवर या बैठकीत विविध सत्रं होणार आहेत.

****

ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पाच पूर्णांक ८८ शंताश टक्के नोंदवण्यात आला आहे. गेल्या अकरा महिन्यातली ही निच्चांकी संख्या आहे. अन्नधान्यांच्या किंमती कमी झाल्यामुळे हा दर कमी झाला.

****

ऊर्जा संवर्धन सुधारणा विधेयक काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. ग्राहकांना ऊर्जेचा वापर करताना त्यात बिगर जीवाश्म ऊर्जा किती प्रमाणात असेल, हे निश्चित करण्याची तरतूद या विधेयकात आहे, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री ऊर्जा मंत्री राजकुमार सिंह यांनी दिली.

****

कोविड संकट आणि रशिया युक्रेन युद्धाचं सावट असतानाही भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत सांगितलं. जगातल्या इतर मुद्रांच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती मजबूत आहे, असं त्या म्हणाल्या.

****

महापुरुषांच्या अवमानाविरोधात पुण्यातल्या विविध संस्था संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली आहे. मात्र नागरिकांनी त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू ठेवावेत असं आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलं आहे.

****

जातीय सलोखा अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातल्या मौजपुरी पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून काल रामनगर पोलीस चौकीत रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक अशा एकूण ८२ जणांनी रक्तदान केलं.

//*********//

No comments:

Post a Comment