Wednesday, 14 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्याच्या विविध भागात ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना राज्य सरकारची मान्यता

·      जलयुक्त शिवार अभियानाचा राज्यात दुसरा टप्पा सुरु करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

·      ग्रामीण भागात शेतजमिनीच्या ताब्यावरून होणारे वाद मिटवण्यासाठीच्या सलोखा योजनेला मंजुरी

·      महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

·      राज्यात आंतरधर्मीय विवाहांसाठी समन्वय समिती नियुक्त

·      मराठवाडा आणि विदर्भातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपुचं हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी  

णि

·      भारत - बांगलादेश दरम्यान आजपासून पहिला कसोटी क्रिकेट सामना तर कतारमधल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश

****

राज्याच्या विविध भागात ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ उपसमितीची चौथी बैठक काल झाली, यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे भागात सुमारे ५५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

यामधे, १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला महिंद्रा इलेक्ट्रीक व्हेईकल ऑटोमोबाईल्सचा पुण्यातला प्रकल्प, चंद्रपूर जिल्ह्यात २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हरित तंत्रज्ञानावर आधारीत न्युईरा क्लिनटेक सोल्युशन्सचा कोल गॅसिफिकेशन प्रकल्प, तसंच गडचिरोली जिल्ह्यात दोन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये कॉस्मो फर्स्ट लिमिटेड, पिरामल फार्मा या दोन कंपन्यांना प्रत्येकी ५०० कोटी रुपये, तर कॉस्मो फिल्म्सच्या ९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे.  

****

राज्यातल्या शाळांना अनुदान देण्याचा आणि त्यासाठी अकराशे कोटी रुपये मान्यता देण्यास निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. सहा हजार दहा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना,सं१४ हजार ८६२ तुकड्यांना हे अनुदान मिळणार असून, या निर्णयाचा लाभ राज्यातल्या सुमारे ६३ हजार ३३८ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना होणार आहे.

राज्यात जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा सुरु करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी २०१५ ते २०१९ या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आलं होतं, त्यामाध्यमातून ३९ लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या होत्या. आता नव्यानं सुरु होणाऱ्या या अभियानात येत्या तीन वर्षात सुमारे पाच हजार गावं नव्याने समाविष्ट केली जातील. 

राज्याच्या ग्रामीण भागात शेतजमिनीच्या ताब्यावरून होणारे वाद मिटवण्याची तरतूद असलेल्या सलोखा योजनेलाही काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी सवलतीत मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये आणि नोंदणी फी १०० रुपये आकारण्यात येईल. शेतजमिनीच्या ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद होतात, ते मिटवण्यासाठी आणि समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना आहे.

राज्यातल्या आदिवासी शासकीय आश्रमशाळेतल्या एक हजार ५८५ रोजंदारी आणि तासिका कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड घालून राज्यातल्या ग्रामीण कुटुंबांना सक्षम करणारं, सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

हकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी बँकेस रक्कम देण्याचा, तसंच राज्यात‍व्यवसायानुकूल वातावरण निर्माण करण्याकरता महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदी करण्याचा, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ करून वाचनसंस्कृतीला बळ देण्याचा, तसंच कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा आणि कालबाह्य तरतुदी काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

****

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांकडे खासदार इम्तियाज जलील यांनी काल लोकसभेचं लक्ष वेधलं. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सरकार एकीकडे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करत असल्याचं सांगतं, दुसरीकडे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढत असल्याचं ते म्हणाले. सरकारचे श्रीमंत आणि गरीबांसाठी नियम वेगवेगळे असल्याचा आरोपही जलील यांनी केला.

****

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन, महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद प्रकरणी दखल घेण्याचं विनंतीपत्र सादर केलं. या प्रकरणी केंद्र सरकारला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देऊन, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावर योग्य तो तोडगा काढावा, अशी विनंती शेवाळे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न केले परंतू बेळगावातल्या संघटना आणि अन्य राजकीय पक्ष जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांची एकत्रित बैठक बोलावली आहे. सायंकाळच्या सुमारास ही बैठक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काल अचानक बेळगाव दौरा केला. मी बेळगावला जाऊ शकतो, तर मंत्री का जात नाहीत, असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी तसंच नागरिकांशी आपण चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयत्न सुरु होता, पण खासदार शरद पवार यांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर वातावरण बदलून गेल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या सत्ता संघर्षावर आता येत्या दहा जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. मात्र काल झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची मागणी केली. सरन्यायाधीशांनी दोन्ही बाजूंना या मुद्द्यावर आपलं म्हणणं थोडक्यात लेखी मांडण्याची सूचना केली. शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल आणि महाराष्ट्राचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सिब्बल यांच्या या मुद्यावर आपले लेखी म्हणणे मांडण्यास सहमती दर्शवली आहे.

****

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका, तसंच इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणासंबंधी सर्व याचिकांसंबंधी सर्वोच्च न्यायालय येत्या १७ जानेवारीला निकाल देणार आहे. काल यासंदर्भात झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी १७ जानेवारीपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

****

राज्यात आंतरधर्मीय विवाहांसाठी समन्वय समिती नेमण्यात आली आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडासारखे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन ही समिती आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह करणार्या मुलींची तसंच त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेऊन त्यांच्यात समन्वय घडवून आणणार आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना एका अज्ञाताने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पवार यांच्या निवासस्थानातल्या दूरध्वनीवर मोबाईलवरून २ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान सातत्याने फोन करून धमकी देण्यात आल्याचं, टेलिफोन ऑपरेटरने या तक्रारीत म्हटलं आहे. हा फोन बिहारमधून आला असून ती व्यक्ती हिंदीत बोलत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

मराठवाडा, विदर्भातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपुचं हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावं, अशी मागणी विधान सभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक काल विधान भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. अधिवेशनकाळात नागपूर इथल्या पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. मराठवाड्यासह राज्यातल्या नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात यावं, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, विधीमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचं कामकाज सकाळी साडेनऊ वाजेपासून सुरु व्हावं, आदी मागण्याही अजित पवार यांनी केल्या.

****

‘चला जाणूया नदीला’ या अभियानात औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिवना, दुधना आणि खाम नदीचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत ‘नदी संवाद यात्रेचं यशस्वी आयोजन करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, त्यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियाजन करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत होणाऱ्या या अभियानासाठी स्थापन जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी खाम नदीच्या पुनरुजीवन अभियानाची ध्वनिचित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली.

****

औरंगाबाद - अहमदनगर - पुणे महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना जारी झाली आहे. औरंगाबाद तालुक्यातल्या सात, तर पैठण तालुक्यातल्या १७ गावांतून या महामार्गासाठी भूसंपादन करावं लागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हा महामार्ग तयार करण्यात येणार आहे.

****

’इंडियन कॉमर्स असोसिएशन’च्या ७३ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचं यजमानपद,रंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळालं आहे. विद्यापीठाच्या नाट्यगृहात २२ ते २४ डिसेंबर दरम्यान ही परिषद होणार असल्याची माहिती, वाणिज्य परिषदेचे सदस्य सचिव तथा अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे यांनी दिली. या परिषदेत सात परिसंवाद होणार आहेत. देशभरातून सुमारे दोन हजार प्रतिनिधी सहभागी होत असलेल्या या परिषदेत, विविध विषयांवर मंथन होईल,संच विविध पारितोषिकांचं वितरण तसंच स्मरणिका प्रकाशन करण्यात येणार आहे.

****

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आजपासून चट्टग्राम इथं सुरु होणार आहे. आज सकाळी नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या पहिल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनानं क्रोएशियाचा तीन - शून्य असा पराभव केला. उपान्त्य फेरीचा दुसरा सामना आज रात्री साडे बारा वाजता फ्रान्स आणि मोरोक्को दरम्यान होणार आहे.

****

राज्यातल्या कृषी वीज ग्राहकांसाठी स्वतंत्र कृषी कंपनी स्थापन करण्यासाठी माजी ऊर्जा सचिव जयंत कावळे यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्याच्या निषेधार्थ, उस्मानाबाद इथं काल वीज कर्मचारी आणि संघटनानी निदर्शनं केली. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये कोणत्याही पद्धतीच्या खाजगीकरणाचा एकतर्फी निर्णय सरकार आणि प्रशासनाने घेतला तर त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

****

आठवा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या ११ ते १५ जानेवारी दरम्यान औरंगाबाद इथं होणार आहे. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं औरंगाबाद जिल्हा केंद्र, यांच्यावतीनं आयोजित हा महोत्सव शहरातल्या प्रोझोन मॉलमधील चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जगभरातल्या ४० चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच, परिसंवाद, चर्चासत्र तसंच विशेष व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे. १५ जानेवारीला समारोप सोहळ्यात विजेत्या चित्रपटाला सुवर्ण कैलास सर्वोत्कृष्ट सिनेमा पुरस्कार तर चित्रपट सृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल एका मान्यवराला, पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं एक ते पाच जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी काल या महोत्सवाचा एका बैठकीत आढावा घेतला. शासनाच्या विविध विभागांनी आपआपल्या योजनांची अंमलबजावणी झालेल्या उपक्रमाची माहिती स्टॉलच्या माध्यमातून शेतकरी, नागरिकांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना, त्यांनी केल्या. या महोत्सवात पुस्तक प्रदर्शनाबरोबरच ‘पुस्तकदान’ उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमात नागरिकांकडून पुस्तक जमा करुन ते पुस्तके गरजू वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

****

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या अध्यापक,  व्यवस्थापन प्रतिनिधी,  प्राचार्य,  विद्यापीठ अध्यापक,  विद्यापरिषद गटाच्या निवडणूकीत आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यापीठ उत्कर्ष पॅनलनं ४४  पैकी ३५  जागांवर विजय मिळवला. विद्यापीठ विकास मंचनं सात जागांवर विजय मिळवला, तर स्वाभिमानी मुप्टा आणि परिवर्तन पॅनलनं प्रत्येकी एक जागा जिंकली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात गायरान आणि गावठाण जमिनीवर दीर्घकाळापासून राहत असणाऱ्या नागरिकांना न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सामावून घेण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचं, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना या योजनेअंतर्गत नियमित करण्याचा आणि घरकुल देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून मागच्या बैठकीत घेण्यात आला आणि त्याला कालच्या बैठकीत पुष्टी मिळाल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात आतापर्यंत गोवर आजाराचे शंभरच्या वर रुग्ण आढळून आले असू, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यावर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून उद्यापासून जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. पालकांनी गोवर प्रतिबंधक लस देऊन आपल्या बालकांचं संरक्षण करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात काल दुपारी काही भागात पाऊस झाला. वसमत शहरासह परिसरात रिमझिम पाऊस झाला. तर आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, रामेश्वर तांडा या परिसरात अर्धा तास पाऊस झाला.

****

No comments:

Post a Comment