Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६
डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
भारत - चीन सीमेसह इतर मुद्यांवरुन राज्यसभेत आज विरोधकांनी
गदारोळ केला. सभागृहाचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी
भारत - चीन मुद्दा हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असून, त्यावर सविस्तर चर्चा करण्याची
मागणी केली. मात्र उपसभापती हरीवंश यांनी ही मागणी नाकारत, विरोधकांचा स्थगन प्रस्तावही
फेटाळला. त्यामुळे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
गोंधळ वाढत गेल्यानं सभागृहाचं कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं होतं.
****
संशयास्पद चीनी अॅप्सना नागरीक बळी पडू नयेत यासाठी सरकार प्रयत्न
करत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत शून्य काळात सांगितलं.
गेल्या सात महिन्यांत रिझर्व्ह बँक, मंत्रालयाचे
अधिकारी आणि इतर विभागांशी या धोक्याचा सामना करण्यासाठी बैठका
घेतल्या असून, काही ॲप्सवर कारवाईही करण्यात आली असल्याचं
त्यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे खासदार नदीमुल हक यांनी हा मुद्दा
उपस्थित केला होता.
****
एक राष्ट्र एक मतदार यादीवर विविध प्रस्ताव
आणि सूचनांवर विचार करून निर्णय घेतला जाईल, असं कायदा आणि न्याय
मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत सांगितलं. निवडणूक सुधारणा
ही निरंतर आणि चालू असलेली प्रक्रिया असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
१९७१ मध्ये भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या
युद्ध विजयाच्या स्मरणार्थ आज देशभरात सर्वत्र विजय दिन साजरा केला जात आहे. संरक्षण
मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं
पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहिली.
यानिमित्त दिलेल्या संदेशात संरक्षण मंत्र्यांनी, सैनिकांचं अतुलनिय साहस, शौर्य, आणि
बलिदानाला देश नमन करत असल्याचं म्हटलं आहे. १९७१चं युद्ध म्हणजे मानवतेचा क्रूरतेवर
विजय असून, देशाला सशस्त्र सेनेवर गर्व असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी
संरक्षण मंत्रालयाअंतर्गत एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची शिफारस, संसदेच्या एका समितीनं केली आहे. अशा कुटुंबियांच्या
कल्याणासाठी कोणत्या उपाययोजना उपलब्ध आहेत, याबाबत ३१ वा अहवाल
या समितीनं संसदेत सादर केला. सैनिकाच्या मृत्यूनंतर दिली जाणारी आर्थिक मदत १० लाख
रूपयांनी वाढवण्याबाबत विचार करावा, हुतात्मा सैनिकाची पत्नी
किंवा निकटच्या पात्र नातेवाईकाला नोकरी देण्यासाठी योग्य व्यवस्था तयार करण्याची शिफारसही, या समितीनं केली आहे.
****
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीनं मुंबई
इथं गोवर रुबेला लसीकरणा संदर्भात दोन दिवसीय कार्यशाळेला आज सकाळी सुरुवात झाली. कोविड
काळात मुलांचं लसीकरण घटल्यानं गोवरच्या रुग्णात वाढ झाली आहे. गोवरला रोखण्यासाठी
९५ टक्के लसीकरण उद्दिष्ट गाठणं आवश्यक असून माध्यमांनी यासाठी
जनजागृती करण्याचं आवाहन, आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर विना धवन यांनी यावेळी केलं.
****
महाराष्ट्रातली ज्यू वारसा स्थळं पर्यटनासाठी
खुली केली जाणार असल्याची माहिती, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
आणि मुंबई इथले इस्राईलचे महा वाणिज्यदूत यांच्यासोबत, या स्थळांच्या
पर्यटनाबाबतच्या इरादा पत्रावर, काल स्वाक्षरी करण्यात आली,
त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमामुळे राज्यातल्या महत्वाच्या ज्यू
-वारसास्थळांची जगभरातल्या पर्यटकांना ओळख होईल, असा विश्वास
लोढा यांनी व्यक्त केला.
****
नाशिक इथल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
गटातल्या १२ माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची
शिवसेना गटात प्रवेश केला. यामध्ये नाशिक महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते, माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांचा
समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत केलं.
****
नांदेडच्या पर्यटनाला चालना देण्याच्या
दृष्टीनं विष्णुपुरी जलाशयात साहसी जलक्रीडा सुविधा कामांचे तांत्रिक प्रस्ताव सादर
करण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी
अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत. यासंबंधिच्या आढावा बैठकीत ते
काल बोलत होते. नांदेडच्या श्री तख्त सचखंड हुजूर साहिब गुरूद्वारा,
तसंच माहूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या निमित्तानं भाविक-पर्यटकांची संख्या
अधिक आहे. त्या दृष्टीनं या सुविधा निर्माण होणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले.
****
भारत आणि बांग्लादेशदरम्यान सुरु असलेल्या पहिल्या कसोटी
क्रिकेट सामन्याच्या आजच्या तिसर्या दिवशी, बांग्लादेशचा पहिला डाव १५० धावांवर संपुष्टात
आला. कुलदीप यादवनं पाच, मोहम्मद सिराजनं तीन, तर उमेश आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी
एक गडी बाद केला. भारताचा दुसरा डाव सुरु झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा,
एक बाद ९२ धावा झाल्या होत्या. भारत ३४६ धावांनी आघाडीवर आहे.
//**********//
No comments:
Post a Comment