Friday, 16 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  16 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ डिसेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      १९७१ मध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ विजय दिन सर्वत्र साजरा.

·      राजकीय विचार पुढे रेटण्यासाठी साहित्य क्षेत्र खराब करू नये-समरसता साहित्य परिषदेचं आवाहन.

·      महाविकास आघाडीचा उद्या मुंबईत महामोर्चा तर भाजपचं माफी मागा आंदोलन.

आणि

·      बांगलादेशविरोधात पहिल्या कसोटीत भारत दुसऱ्या डावात ४७१ धावांनी आघाडीवर.

****

१९७१ मध्ये भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या युद्ध विजयाच्या स्मरणार्थ आज देशभरात सर्वत्र विजय दिन साजरा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय सशस्त्र दलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सशस्त्र जवानांच्या अतुलनीय धैर्याच्या आणि देशासाठी बलिदानाच्या कथा प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत आहेत असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हुतात्मा सैनिकांना ट्विट संदेशातून आदरांजली अर्पण केली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहिली. यानिमित्त दिलेल्या संदेशात संरक्षण मंत्र्यांनी, सैनिकांचं अतुलनीय साहस, शौर्य, आणि बलिदानाला देश नमन करत असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, विजय दिनाच्या एक्कावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कुलाबा इथं, या युध्दातील सर्व शूरवीरांना समर्पित विजय उद्यान उभारण्यात आलं आहे. परमवीर चक्र प्राप्त हुतात्मा मेजर होशियार सिंग दहिया यांच्या पत्नी धनो देवी यांच्या हस्ते या विजय उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं.

****

भारत चीन मुद्यावरून राज्यसभेचं कामकाज आजही बाधित झालं. आज सकाळी सदनाचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चीनकडून घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस, तसंच आम आदमी पक्षाकडून विविध विषयांवर दिलेले स्थगन प्रस्ताव उपसभापती हरिवंश यांनी अमान्य करताच, काँग्रेस तसंच आम आदमी पक्षाचे खासदार अध्यक्षांसमोरच्या हौद्यात उतरले. उपसभापतींनी वारंवार आवाहन करूनही सदनात सुरू झालेला गदारोळ थांबला नाही, त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.

****

एक देश एक मतदार यादी या संदर्भात विविध घटकांशी विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल, असं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत बोलत होते. मतदार ओळखपत्राचं आधार कार्डशी संलग्नीकरण हे ऐच्छिक असून, ज्या नागरिकांनी आपली आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र परस्परांशी जोडलेली नाहीत, त्यांची नावं मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, असंही रिजीजू यांनी स्पष्ट केलं. अनिवासी भारतीयांसाठी प्रॉक्सी अर्थात प्रतिनिधीतर्फे मतदानाची सुविधा देण्याबाबत कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असंही रिजीजू यांनी आज लोकसभेत सांगितलं.

****

संशयास्पद चीनी अॅप्सना नागरिक बळी पडू नयेत यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत शून्य काळात सांगितलं. गेल्या सात महिन्यांत रिझर्व्ह बँक, मंत्रालयाचे अधिकारी आणि इतर विभागांशी या धोक्याचा सामना करण्यासाठी बैठका घेतल्या असून, काही ॲप्सवर कारवाईही करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे खासदार नदीमुल हक यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

****

जागतिक भूकबळी निर्देशांक हा चुकीच्या तथ्यांवर आधारित असून, भारताची योग्य प्रतिमा दाखवत नसल्याचं, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी सांगितलं आहे. त्या आज लोकसभेत बोलत होत्या. जागतिक भूकबळी निर्देशांक कोणत्याच देशाच्या वास्तविक स्थितीची माहिती देत नाही, असं इराणी यांनी सांगितलं

****

औषध निर्मिती क्षेत्राला कच्चा माल पुरवठ्यासाठी केंद्र सरकार देशात तीन औषध पार्क स्थापन करणार आहे. खतं आणि रसायन मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. आंध्रप्रदेश, हिमाचलप्रदेश, आणि गुजरातमध्ये हे औषध पार्क विकसित केले जाणार असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं.

****

तृतीयपंथियांच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर नोंदणी केलेली व्यक्ती आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय सुविधा घेऊ शकतात, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

****

लोकसभेत आज अनुसूचित जमाती सुधारणा विधेयक २०२२ पारित करण्यात आलं. हिमाचल प्रदेशात सिरमौर पर्वत क्षेत्रातील हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती श्रेणीत समाविष्ट करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

****

राजकीय विचार पुढे रेटण्यासाठी पुरस्कार परत करणाऱ्या बुद्धीजीवींनी साहित्यासारखे निर्मळ क्षेत्र खराब करू नये, असं आवाहन समरसता साहित्य परिषदेनं केलं आहे. कोबाड घांदी लिखित फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार शासनाने परत घेतला, त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर समरसता परिषदेनं ही भूमिका व्यक्त केली. या पुस्तकाला तसंच पुरस्काराला समर्थन देणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा, असं आवाहन परिषदेनं केलं आहे. हा पुस्तकाला पुरस्कार जाहीर होणं, ही चूक होती. ती दुरुस्त करून पुरस्कार परत घेतला, याबद्दल समरसता साहित्य परिषदेनं समाधान व्यक्त करत, राज्यशासनाचं अभिनंदन केलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाकडून उद्या मुंबईत “माफी मागा” आंदोलन केलं जाणार आहे. भाजप नेते विधीज्ञ आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाबाबत केलेलं विधान, उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवदेवता तसंच संतांबाबत केलेली विधानं, याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे का बोलत नाहीत, असं शेलार यांनी विचारलं आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याविरोधात माफी मागा आंदोलन करत असल्याचं शेलार यांनी सांगितलं.

 

दरम्यान, महाविकास आघाडीच्या वतीनंही उद्या मुंबईत महामोर्चा काढला जाणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपच्या अन्य नेत्यांकडून महापुरुषांबद्दल कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जात आहे.

महाविकास आघाडीचा हा महामोर्चा सरकारला धडकी बसवेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी काही माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही, सरकारला कसली भीती आहे, असा प्रश्नही जयंत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

****

संत महात्म्यांच्या संदर्भात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात आज नाशिकमध्ये वारकऱ्यांनी निषेध दिंडी काढली. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा येथून काढण्यात आलेली दिंडी पंचवटी परिसरातून विविध भागातून नेण्यात आली आणि रामकुंडावर तिचा समारोप करण्यात आला. सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला वारकरी मतदान करणार नाही अशी शपथ उपस्थित वारकऱ्यांनी यावेळी घेतली

****

बांगलादेशाविरोधात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ ४७१ धावांनी आघाडीवर आहे. आज सकाळी तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १५० धावा काढून बाद झाला, भारतीय संघाने दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या ११० तर चेतेश्वर पुजाराच्या १०२ धावांच्या बळावर २५८ धावा करून दुसरा डाव घोषित केला. आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशाच्या दुसऱ्या डावात बिन बाद ४२ धावा झाल्या असून, भारत सध्या ४७१ धावांनी आघाडीवर आहे.

****

महात्मा गांधी अभिमत विद्यापीठाच्या महागामी गुरूकुलाच्या यंदाच्या ऑरा औरंगाबाद या महोत्सवाचा उद्या आणि परवा दोन दिवसीय सोहळ्यात समारोप होत आहे. गेल्या महिन्यात १९ नोव्हेंबरला औरंगाबाद लेणीत पहिला कार्यक्रम सादर झाला. त्यानंतर देवगिरी किल्ला, सोनेरी महल, बिबी का मकबरा आदी ठिकाणी झालेल्या सांगितिक कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. समारोप सोहळ्यात उद्या सायंकाळी मौलाना आझाद महाविद्यालय परिसरात पीर इस्माईल मकबरा इथं सुफी कव्वाली तसंच महागामीच्या गुरु पार्वती दत्ता यांचं कथक तर परवा रविवारी सायंकाळी भोकरदन तालुक्यात अन्वा इथल्या मंदिरात महागामीच्या शिष्यांचं ओडिसी नृत्य आणि निरंजन भालेराव यांचं बासरी सादरीकरण होणार आहे.

****

No comments:

Post a Comment