Sunday, 18 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 18.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ७ हजारांहून अधिक ग्रामपंचायती आणि थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही आज सकाळी साडेसात वाजता ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात एकूण २१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून ७२५ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या निवडणुकीची मंगळवारी मतमोजणी केली जाईल. जालना जिल्ह्यात ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत १६ टक्के मतदान झालं आहे.

धुळे जिल्ह्यातील ११८ ग्रामपंचायतसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.

***

भारतीय नौदलात आज आय एन एस मोरमुगाव ही क्षेपणास्त्र विनाशिका दाखल झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ही युद्ध नौका नौदलात सामिल करणायत आली. यावेळी संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख आर हरीकुमार आणि इतर उपस्थित होते.

***

नागपूरमध्ये उद्यापासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनला सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सीमावाद, वाढती महागाई, बेरोजगारी, मंत्रिमंडळ विस्तार अशा विविध मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित केलं आहे. संध्याकाळी वाजता मुख्यमंत्री शिंदे यांची पत्रकार परिषद होणार आहे.

***

जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी भारतीय नता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या दुध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी सहकार पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या गटाचा पराभव करत विजय मिळवला होता. खडसे यांच्या गटाला केवळ चार जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. तब्बल सात वर्ष खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची या दूध संघावर सत्ता होती.

***

भारत आणि बांगलादेश यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं १८८ धावांनी जिंकला. बांगलादेशच्या संघानं आज खेळ सुरू झाल्यानंतर ५३ धावात चार गडी गमावले. त्यामुळे बांगलादेशचा दुसरा डाव ३२ धावांवर आटोपला. भारतानं दुसऱ्या डावात ५१३ धावांची आघाडी घेतली होती. सामनावीरचा पुरस्कार भारताचा गोलंदाज कुलदीप यादवला देण्यात आला. या विजयाबरोबरच भारतान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतला पुढचा सामना २२ तारखेपासून सुरू होणार आहे.

***

महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठाच्या महागामी गुरूकुलाच्या यंदाच्या ऑरा औरंगाबाद या महोत्सवाचा आज समारोप होत आहे. समारोप सोहळ्यात आज सायंकाळी भोकरदन तालुक्यात अन्वा इथल्या मंदिरात महागामीच्या शिष्यांचं ओडिसी नृत्य आणि निरंजन भालेराव यांचं बासरी वादन होणार आहे.

***

नांदेड जिल्ह्यात येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ऑटोरिक्षा वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना ऑटोरिक्षा, योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेली ऑटोरिक्षा चालत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

***

हिंगोली इथं ३ ते ५ जानेवारी दरम्यान राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा सेवा संघ आणि संलग्लित कक्षाच्या वतीनं दरवर्षी या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं.

***

औरंगाबाद-हैद्राबाद रेल्वेगाडी पुढचे काही दिवस अडीच तास उशीरा सुटणार आहे. दुपारी सव्वा चार वाजता सुटणारी गाडी सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल. करमाड ते बदनापूर स्थानकांदरम्यानच्या ट्राफिक ब्लॉकमुळे ही गाडी येत्या सात जानेवारीपर्यंत दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून तीन दिवस उशिरा धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे.

//**********//

 

No comments:

Post a Comment