Sunday, 18 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 18.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 December 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

·      नागपूरमध्ये उद्यापासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन, विरोधकांचा सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार.

·      राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सरपंच तसंच सदस्य पदासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान.

·      रडारपासून सुरक्षित असणारी क्षेपणास्त्र-सज्ज विनाशिका मोरमुगाओ भारतीय नौदलात दाखल.

·      पालघर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी आठ जणांना अटक.

आणि

·      बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा १८८ धावांनी विजय.

****

नागपूरमध्ये उद्यापासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन होत आहे. २९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात विरोधी पक्षांकडून महापुरुषांबाबत कथित अवमानकारक वक्तव्य, कर्नाटक - महाराष्ट्र सीमावाद, राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प, वाढती महागाई, बेरोजगारी आदी विषय उपस्थित केले जाऊ शकतात. कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर नागपूरला अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सध्या नागपूरमध्ये राज्य मंत्रीमंडळाची बैठक सुरु आहे. 

दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. अधिवेशनाच्या पाश्वर्श्वभूमीवर नागपूरमध्ये वार्ताहरांशी बोलतांना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गेल्या सहा महिन्यांपासून सत्तेवर असलेलं शिंदे फडणवीस सरकार हे सर्व आघाडीवर अपयशी ठरल्याचा आरोप केला. जनतेच्या कोणत्याही अपेक्षा हे सरकार पूर्ण करु शकलं नसल्याचे ते म्हणाले. यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होत असून विदर्भाच्या हिताचे आणि अनुशेषाचे प्रश्न अग्रक्रमानं मांडणं ही आपली प्रमुख मागणी आहे असं सांगत पवार म्हणाले…

चर्चा होऊ देणं, गोंधळ न घालणं तोच साधारण प्रयत्न आम्हा लोकांचा या अधिवेशनाच्या निमित्तानं राहणार आहे. आणि चर्चा झाली पाहिजे, चर्चेमधून उत्तरं मिळाली पाहिजे, समाधान झालं पाहिजे. विधेयक पण मंजूर करत असतांना विधेयकाला पण लागणारा वेळ चर्चेला तो देखील दिला पाहिजे. वेळ पडली तर थोडसं उशीर बसवावं लागलं तरी आमची तयारी आहे. आणि आम्ही मागणी केलेली आहे की तीन आठवड्याचं आधिवेशन घ्या. दोन वर्ष कोरोनाच्यामुळे इथं आधिवेशन झालं नाही. त्याच्यामुळे साहजिकच विदर्भ मराठवाडा या मागासलेल्या भागातल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये जो काही त्यांना वेगवेगळ्या आयुधाचा वापर करुन तिथल्या सर्वांगीण विकासाच्याकरता वेळ मिळाला पाहिजे होता. तशा प्रकारचा वेळ मिळाला नाही.

ऑक्टोबर मधे विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे धान कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले या नुकसानाची भरपाई वेळेवर मिळावी आणि पीक खरेदी विक्री केंद्रे लवकर सुरू होऊन पीकविमा शेतकरी खात्यात जमा व्हावा यावर सुद्धा सरकारला प्रश्न विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायती आणि थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आज किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झालं. औरंगाबाद जिल्ह्यात २०८ ग्रामपंचायतीसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत ५५ टक्क्याहून अधिक मतदान झालं होतं. जालना जिल्ह्यातल्या २५३ ग्रामपंचायतींसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुमारे ७४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागानं दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात १६३ ग्रामपंचायतींसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत ३६ टक्के मतदान झालं, तर तीन ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात ६१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारी एक वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झालं. बुलढाणा जिल्ह्यात २५९ ग्रामपंचायतीसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत ५८ टक्के  मतदान झालं. भंडारा जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६५ टक्के तर पालघर जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६८ टक्के मतदान झालं.

****

मोरमुगाओ ही रडारपासून सुरक्षित असणारी क्षेपणास्त्र-सज्ज विनाशिका आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात सामील करण्यात आली. मेक इन इंडिया अंतर्गत ही स्वदेशी बनावटीची युद्धनौका मुंबईतील माझगाव गोदीत निर्माण करण्यात आली आहे. प्रकल्प १५-बी विनाशिका अंतर्गत बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची ही दुसरी विनाशिका आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थितांना संबोधित केलं. मोरमुगाओ ही युध्दनौका भारतात आत्मनिर्भर भारतअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या युध्दनौकेचं गौरवशाली प्रतिक असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.  आपल्या क्षमतेमुळे ही युध्दनौका भारतीय नौदलात महत्वपूर्ण भुमिका बजावेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ॲडमिरल हरीकुमार तसंच माझगाव गोदीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हाईस ॲडमिरल नारायण प्रसाद उपस्थित होते.

****

कोणत्याही समाजाला पुढे जाण्यासाठी, संशोधन आणि नवोन्मेष या बाबी महत्त्वाच्या असतात, भारताने स्वदेशी संशोधनाला गती दिली असून त्याचा आपल्याला फायदा होत आहे. असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. हैदराबाद इथंल्या भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेत नॅशनल ॲनिमल रिसोर्स फॅसिलिटी फॉर बायोमेडिकल रिसर्चचं उद्घाटन करतांना मांडविया बोलत होते. नॅशनल ॲनिमल रिसोर्स फॅसिलिटी फॉर बायोमेडिकल रिसर्चकडे २१ व्या शतकात बायोमेडिकल संशोधनात भारताला एक प्रमुख जागतिक घटक बनवण्याची क्षमता आहे, असा विश्वास मांडविया यांनी व्यक्त केला.

****

महिला स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा आहेत, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या पवनाथडी यात्रेला पाटील यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. बचत गटांनी नागरिकांची गरज ओळखून नवे उत्पादन आणि सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असंही पाटील यावेळी म्हणाले. महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात या हेतूने पवनाथडी जत्रेचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं.

****

पालघर जिल्ह्यातल्या माहीम भागात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या आठ जणांना पोलिसांना अटक केली आहे. यामध्ये पिडीत मुलीच्या एका मित्राचाही समावेश आहे. पिडीत मुलीला वैद्यकिय तपासणीसाठी एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी निता पाडवी यांनी दिली आहे.

****

जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी भारतीय नता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या दुध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी सहकार पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या गटाचा पराभव करत विजय मिळवला होता.

****

मानवतेचा विचार पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचं काम संतांनी केलं असून वारकरी संप्रदायातील संत हे महाराष्ट्राचे वैभव आहेत, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त नागपूर इथं श्री. संताजी आर्ट गॅलरीचं भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. संतांच्या आध्यात्मिक विचारातून मानवी जीवन कसं बदलू शकतं हे दिसून येतं असंही फडणविस यांनी सांगितलं.

****

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं १८८ धावांनी विजय मिळवत दोन सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आज बांगलादेशनं कालच्या ६ बाद २७२ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. अवघ्या ५२ धावांची भर घालून त्यांचा सर्व संघ बाद झाला. विजयासाठी बांगलादेशला दुसऱ्या डावात ५१३ धावा करण्याचं लक्ष्य भारतानं दिलं होतं. मात्र त्यांचा संघ केवळ ३२४ धावाच करु शकला. सामनावीरचा किताब फलंदाजी आणि गोलंदाजीतही चमक दाखवणाऱ्या भारताच्या कुलदीप यादवला देण्यात आला.

****

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री साडे आठ वाजता विजेतेपदासाठी अर्जेटिना आणि गतविजेता फ्रान्स यांच्यात लढत होईल.

****

धर्मांतरण विरोधी कायदा लागू करण्यात यावा तसंच गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज धुळे शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

****

No comments:

Post a Comment