Monday, 19 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्य विधीमंडळाचं आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

·      मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, चालू अधिवेशनात विधेयक मांडणार

·      राज्यातल्या ग्रामपंचायनिवडणुकीत ८० क्क्याहून अधिक मतदान, उद्या मतमोजणी

·      मोरमुगाओ क्षेपणास्त्र- सज्ज विनाशिका भारतीय नौदलात सामील

·      महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळाव्याउपस्थित राहण्यास इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांना बंदी

·      बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा १८८ धावांनी विजय

णि

·      फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना जगज्जेता  

****

राज्य विधीमंडळाचं आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात २३ विधेयके आणि पाच अध्यादेश मांडले जाणार आहेत.

दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. भ्रष्टाचार विरोधी नवीन लोकायुक्त कायदा करण्याच्या विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार संवेदनशिल असून राज्यात सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी मोठे निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी शक्य ते सर्व काही केलं जाईल, असं सांगत महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादाबाबत राजकारण न करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. शेतकऱ्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती देतांना ते म्हणाले…

आतापर्यंत जेवढा निधी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसासाठी सरकारने दिला नव्हता, जवळपास नऊ हजार कोटी रुपये अपेक्षित आहेत. सात हजार ४०० कोटी मंजुर झाले, चार हजार ८०० कोटी रुपयाचं प्रत्यक्ष वितरण झालंय, आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचं ७५५ कोटी रुपये, त्याचंही वाटप झालेलं आहे. आणि त्याचबरोबर एनडीआरएफच्या नॉर्मच्या दुप्पट आम्ही मदत दिली. त्यामुळे शेतकर्यांच्या बाबतमीमध्ये सरकार अतिशय संवेदनशील आहे.

सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातल्या म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणास मंत्रिंडळानं मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यासाठी साधारण दोन  हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेतून कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातल्या ४८  गावांना पिण्याचं पाणी तसंच सिंचनाचं पाणी मिळू शकणार आहे. त्या भागातला दुष्काळ दूर होण्यास या विस्तारित प्रकल्पाची मोठी मदत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलतांना, चालू अधिवेशात भ्रष्ट्राचार विरोधी लोकायुक्त नियुक्तीसंदर्भातील विधेयक मांडलं जाणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले…

‘‘लोकायुक्त कायदा तयार करण्याच्या विधेयकाला मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आमच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याच अधिवेशनामध्ये नवीन लोकायुक्ताचं बील मांडणार आहोत. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना देखील लोकायुक्ताच्या कक्षेत आणण्याचं काम हे सरकार करणार आहे. मंत्रिमंडळ देखील आता लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहे आणि या कायद्यामध्ये अँटी करप्शन ॲक्ट जो आहे, त्या ॲक्टला देखील आता या कायद्याचा भाग केलेला आहे. त्यामुळे राज्यामध्ये पूर्ण ट्रान्स्परन्सी आणण्याच्या संदर्भात अतिशय महत्वाचं पाऊल हे उचललं गेलेलं आहे.

सीमा भागामध्ये इतर राज्यांमध्ये जाण्याची ही मानसिकता बोलून दाखवली जाते, त्यामागे कोणत्या राजकीय पक्षाचे लोक आहेत, याची सगळी माहिती इंटेलिजन्सच्या माध्यमातून आमच्याकडे आली असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. योग्य वेळी ही माहिती जाहीर करण्यात येईल, असं ते म्हणाले.

****

सर्व क्षेत्रात राज्याच्या हिताचा कारभार करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचं सांगत विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपुरात वार्ताह परिषदेत सरकारच्या कारभारावर टीका करत, चहापानावर बहिष्कार घालत असल्याचं सांगितलं. अधिवेशनात विकासाच्या मुद्यावर या सरकारला आम्ही घेरणार असल्याचं ते म्हणाले. राज्यातलं सरकार सत्तेवर येऊन जवळपास सहा महिने होऊन गेले तरीही या सरकारकडून असलेल्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, असं आरोप अजीत पवार यांनी केला. ते म्हणाले---

जे काही अतिवृष्टी झाली ऑक्टोबरमध्ये आणि त्याच्यामध्ये शेतकर्यांचं अतोनात नुकसान झालंय, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर धान आणि कापूस आणि सोयाबिन यांचं नुकसान झालंय, त्याच्यामध्ये पिकविमा मिळत नाहीये, त्याच्यामध्ये खरेदी केंद्र व्यवस्थित केली जात नाहीये, खरेदी केंद्र सुरु करताना ठराविक तोंडं पाहून खरेदी केंद्र सुरु केली जातात. हे तर या सरकारचं अपयश आहे. आम्ही सरकार म्हणून काम करत असताना असा दुजाभाव करत नव्हतो. शेवटी ज्या भागामध्ये पिक जाणार असेल त्या भागामध्ये खरेदी केंद्र सुरु झाली पाहिजेत, ही आमच्या सरकारी भुमिका असायची. मात्र या सरकारची तशा प्रकारची भुमिका असताना दिसत नाही.

****

सीमावादावर अजून समाधानकारक तोडगा निघत नाही, अनेक उद्योग आणि प्रकल्प महाराष्ट्राबाहेर चाललेत, लक्षावधी युवकांचा रोजगार बुडाला, अशा अनेक प्रश्नांमुळे राज्यात अस्वस्थता आहे आणि या अस्वस्थतेला तोंड फोडण्याचं काम आम्ही या अधिवेशनात करु असं अजित पावर यांनी यावेळी सांगितलं. महापुरुषांबाबत सत्ताधारी पक्षाकडून सतत बेताल वक्तव्य केली जात असून त्याबद्दल क्षमा मागायलाही हे सरकार तयार नसल्यानं जनतेत असंतोष आहे, असं ते म्हणाले.

****

राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काल किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झालं. राज्यात सरासरी ८० क्क्याहून अधिक मतदान झाल्याचा अंदाज आहे. ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच थेट सरपंच निवडले जाणार असल्यानं या निवडणुकीत मोठी चुरस दिसून आली. उद्या मंगळवारी या मतदानाची मोजणी केली जाणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात २०८ ग्रामपंचायतीसाठी ८६ पूर्णांक ५५ टक्के मतदान झालं. हिंगोली जिल्ह्यात दिनांक ६१ ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान झालं. शिरडशहापूर आणि वारंगा फाटा इथं उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.

बीड जिल्ह्यात ६६३ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के मतदान झालं.

जालना जिल्ह्यातल्या २५ ग्रामपंचायतींसाठी सुमारे ८५ टक्के मतदान झालं.

उस्मानाबाद जिल्ह्यात १६३ ग्रामपंचायतींसाठी ८० टक्क्याहून अधिक मतदान झालं, तर तीन ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड झाली.

लातूर जिल्ह्यातही ३३८ ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान झालं.

कोल्हापूर जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८४ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९३ ग्रामपंचायतींसाठी सुमारे ७५ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात ८० पूर्णांक ४७ टक्के, वाशिम जिल्ह्यातल्या २८० ग्रामपंचायतींसाठी ८० पूर्णांक ५४ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात ८० पूर्णांक २४ टक्के मतदान झालं.

सोलापूर जिल्ह्यातल्या १७७ ग्रामपंचायतीसाठी ८१ पूर्णांक १९ टक्के, भंडारा जिल्ह्यात ७८ पूर्णांक २२ टक्के, पालघर जिल्ह्यातल्या ६१ ग्रामपंचायतींसाठी ७८ पूर्णांक ६३ टक्के मतदान झालं.

****

मोरमुगाओ ही रडारपासून सुरक्षित असणारी क्षेपणास्त्र- सज्ज विनाशिका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत काल भारतीय नौदलात सामील करण्यात आली. मेक इन इंडिया अंतर्गत मुंबईतल्या माझगाव गोदीत ही युद्धनौका तयार करण्यात आली आहे. स्वदेशी बनावटीची ही दुसरी विनाशिका आहे. यावेळी संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ॲडमिरल हरीकुमार तसंच माझगाव गोदीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हाईस ॲडमिरल नारायण प्रसाद उपस्थित होते.

****

विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही काळाची गरज आहे, जागतिक तापमात वाढ होण्याच्या काळात वन विभागाचं पर्यावरण संवर्धनाचं कार्य ईश्वरीय आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या कार्याचा गौरव केला. काल नागपूर इथं वनविभागाच्या वन भवन या इमारतीचं उद्घाटन आणि उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदक वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई, ठाणे या भागात अर्बन फॅारेस्ट ही संकल्पना पुढे येत असू, त्यामुळे प्राणवायु वाढण्यास नक्कीच मदत होईल, असं ते म्हणाले. नुकतंच लोकार्पण करण्यात आलेल्या समृध्दी महामार्गावर ३५ लाख झाडं लावण्याचं नियोजन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत बदल करून त्याची अंमलबजवणी २०२३ पासून करण्याऐवजी २०२५ पासून लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर काल नागपूर इथं ते पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो, विद्यार्थ्यांचं हित विचारात घेऊन नवीन परीक्षा पद्धत दोन वर्षांनंतर लागू करावी, असं पटोले म्हणाले.

****

जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या दुध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी सहकार पॅनलनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या गटाचा पराभव करत विजय मिळवला होता. खडसे यांच्या गटाला केवळ चार जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. तब्बल सात वर्ष खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची या दूध संघावर सत्ता होती.

****

बेळगावमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होत आहे. मात्र या मेळाव्यास इचलकरंजीचे खासदार आणि राज्य सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना उपस्थित राहता येणार नाही. त्यांना बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगावात प्रवेशबंदी केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचं कारण देत त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या महामेळाव्याचं आयोजन केलं आहे. दरम्यान, खासदार माने यांनी बेळगावला महामेळाव्याला जाणार असल्याचं म्हटलं आहे.

****

 

औरंगाबाद महानगरपालिकेनं व्यापाऱ्यांना लावलेल्या आस्थापना कराला स्थगिती देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असं आश्वासन, पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिलं आहे. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया यांच्या अध्यक्षतेखालच्या एका शिष्टमंडळानं यासंदर्भात काल मंत्री भुमरे यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. या शिष्टमंडळानं आस्थापना कराच्या मुद्द्यावरती व्यापाऱ्यांच्या भावना बोलून दाखवल्या, यावेळी पालकमंत्र्यांनी व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि यावर सकारात्मकपणे विचार करू असं आश्वासन दिलं. महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी हे यावेळी उपस्थित होते.

****

औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं एक ते पाच जानेवारी दरम्यान होणारा राज्यस्तरीय कृषी आणि सांस्कृतिक महोत्सव शेतकऱ्याला सक्षम करणारा ठरणार असल्याचं, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं काल या महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या महोत्सवात कृषी विभागाचे कार्यक्रम, कृषि विद्यापीठाच्या समन्वयानं विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञानापासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांमधून, विचारमंथन होईल, असं त्यांनी सांगितलं. शासनाच्या प्रत्येक विभागानं नेमू दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देशही सत्तार यांनी दिले. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी  विकास मिना उपस्थित होते.

****

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं १८८ धावांनी विजय मिळवत दोन सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विजयासाठी बांगलादेशला दुसऱ्या डावात ५१३ धावा करण्याचं लक्ष्य भारतानं दिलं होतं. मात्र त्यांचा संघ केवळ ३२४ धावाच करु शकला. सामनावीरचा किताब फलंदाजी आणि गोलंदाजीतही चमक दाखवणाऱ्या भारताच्या कुलदीप यादवला देण्यात आला.

****

फिफा फुटबॉल विश्वचषक अर्जेंटिनानं पटकावला आहे. काल रात्री कतार मध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूट आऊट मध्ये चार-दोन असा पराभव केला. अर्जेंटिना ने तब्बल ३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे. विश्वचषकात एकूण सात गोल करणाऱ्या मेस्सी ने गोल्डन बॉल तर आठ गोल करणाऱ्या एमबाप्पे याने गोल्डन बूट पटकावला.

****

पायाभूत सुविधांच्या सूत्रबद्ध विकासासाठी केंद्र सरकारनं आखलेला गतिशक्ती कार्यक्रम आणि विविध कल्याणकारी योजना, या विषयावर आधारित मल्टिमीडिया चित्रांचं प्रदर्शन, जालना इथं रेल्वे स्थानकावर भरवण्यात आलं आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरोच्या औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयानं, दक्षिण मध्य रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं, केंद्र सरकारला आठ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त भरवण्यात आलेलं हे प्रदर्शन येत्या २१ तारखेपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळात सर्वसामान्य जनतेसाठी खुलं राहणार आहे.

****

राज्य शासनाच्या बाल संगोपन योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या ६२० लाभार्थी बालकांच्या खात्यात ४७ लाख चार हजार ७०० रुपये अनुदान जमा करण्यात आलं आहे. ही जिल्ह्यातलीतापर्यंतची सर्वोच्च लाभार्थी संख्या असल्याची माहिती, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी दिली. या योजनेअंतर्गत अनुदान थेट लाभार्थांच्या बँक खात्यात जमा केलं जातं.

****

कर्जतमध्ये होणाऱ्या पहिल्या स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडच्या प्रख्यात कवयित्री प्रा. प्रतिभा अहिरे यांची निवड झाली आहे.  येत्या ३ जानेवारी रोजी हे पहिले स्री शिक्षिका साहित्य संमेलन होत आहे.

****

No comments:

Post a Comment