Wednesday, 21 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 21 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २१ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करावा, अशी मागणी आज विधानसभेत विरोधी पक्षांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्य विधानसभेत कर्नाटकची जमिन इतर राज्यांना देणार नसल्याचा ठराव मांडणार असल्याचं सांगितलं, हा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला. महाराष्ट्रात राज्य सरकारने असा ठराव केला तर विरोधी पक्ष पाठिंबा देईल, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. कर्नाटकात असलेली महाराष्ट्राची एकेक इंच भूमी महाराष्ट्रात आली पाहिजे, त्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा करून ठराव मंजूर करू, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक वाढत असून, केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावधगिरीचा सल्ला दिला असून, यासंदर्भात राज्य सरकार समिती नेमणार का, असा प्रश्न देखील पवार यांनी विचारला. यासंदर्भात राजकारण बाजुला ठेऊन काम करण्याचं आवाहन, त्यांनी सभागृहाला केलं. कोविड संदर्भात बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी समिती किंवा कृती दल गठीत करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं.

राज्यातल्या वैद्यकीय रुग्णालयातल्या औषध खरेदीसाठी हाफकिन च्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितलं. राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयात तंत्रज्ञांची साडेचार हजार पदांची भरती येत्या चार महिन्यात केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

स्वमग्नता आणि गतीमंद अर्थात ऑटिझम आजाराने ग्रस्त बालकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र उभारण्यात येतील, या आजाराच्या उपचाराचा समावेश महात्मा फुले आरोग्य योजनेत समाविष्ट केलं जाईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश टोपे यांनी उपस्थित केली होती.

****

लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथं १९९३ मध्ये भूकंपाने बाधित झालेल्या घरांचं अद्यापही पूर्ण पुनर्वसन न झाल्याचा मुद्दा औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केला. नागरीकांना जमिनी उपलब्ध करुन द्याव्या, किंवा अधिकचं भूसंपादन करावं, अशी मागणी त्यांनी केली. किल्लारी हा स्वतंत्र तालुका निर्मिती करण्याची मागणी देखील त्यांनी केली. पुनर्वसनाची कारवाई लवकरात लवकर केली जाईल, असं आश्वासन सरकारतर्फे देण्यात आलं.

****

दरम्यान, अधिवेशनात आजचं कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाबाहेर आंदोलन केलं. नागपूरच्या भूखंड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

****

चीनसह जगातल्या काही देशात कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक पाहता, केंद्र सरकारने आज यासंदर्भात विशेष बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतानं कोरोना लसीकरणात समाधानकारक टप्पा गाठला असून, हे आरोग्य यंत्रणेचं मोठं यश असल्याचं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, देशातल्या कोविड पॉझिटिव्ह नमुन्यांची जनुकीय क्रमनिर्धारण अर्थात जिनोम सिक्वेंसींग करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबतचं पत्र सर्व मुख्य सचिव आणि राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना पाठवलं आहे.

****

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित 'भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. यात्रेदरम्यान नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असं देखील मांडवीय यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

****

भारतात खोटी माहिती पसरवणारी तीन युट्युब चॅनेल्स पीआयबी फॅक्ट चेक विभागाने ४० हून अधिक फॅक्ट -चेक मालिकेत, उघडकीस आणली आहेत. या यूट्यूब चॅनेल्सचे सुमारे ३३ लाख सब्सक्रायबर्स आहेत आणि त्यांचे व्हिडिओ, ज्यातील बहुतेक सर्व खोटे असल्याचं आढळून आलं आहे. ही युट्युब चॅनेल्स सर्वोच्च न्यायालय, भारताचे सरन्यायाधीश, सरकारी योजना, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, कृषी कर्जमाफी इत्यादींबाबत खोटे आणि खळबळजनक दावे पसरवत आहेत, आणि यात खोट्या बातम्यांचा समावेश आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक विभागाने  केलेल्या कारवाईनंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गेल्या वर्षभरात शंभरहून अधिक युट्युब चॅनेल्स ब्लॉक केली आहेत.

****

परभणी जिल्ह्यात बेरोजगारांसाठी आज आणि उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुकांनी महास्वयंम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करुन, या मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केलं आहे.

****

No comments:

Post a Comment