Thursday, 22 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी एक बैठक घेणार आहेत. चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.

****

जागतिक आरोग्य संघटनेनं, चीन मधल्या वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीनमधल्या कोरोनाच्या परिस्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी, आजाराची गंभीरता, रुग्णांची रुग्णालयात होणारी भरती आणि गंभीर रुग्णांवर अतिदक्षता विभागात करण्यात येणाऱ्या उपायांची माहिती संघटनेकडे असणं आवश्यक आहे, असं संघटनेचे संचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी, काल झालेल्या साप्ताहिक वार्ताहर परिषदेत सांगितलं.

****

चालू आर्थिक वर्षाकरता तीन लाख २५ हजार कोटी रुपयांच्या, पहिल्या टप्प्यातल्या पुरवणी मागण्यांना काल संसदेनं मंजुरी दिली. राज्यसभेनं चर्चेनंतर विनियोजन विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं केलेल्या उपययोजनांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारनं केलेल्या लक्ष्यित उपाययोजनांमुळे मंदी टाळून विकास साधण्यात देशाला मदतच झाल्याचं त्यांनी सांगितलं.

****

गर्दीच्या काळात विमान प्रवाशांना, गैरसोय न होता प्रवास करता यावा यासाठी विमानतळ प्रशासनांनी क्षमता वाढवून प्रणालीची पुनर्रचना करण्याचे आदेश सरकारने विमानतळांना दिले आहेत. नागरी विमान वाहतूक सचिव राजीव बन्सल यांनी काल झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले.

****

देशभरात पाच ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आणि २२ प्रवेश नियंत्रित कॉरिडॉरची योजना भारत सरकारनं आखली आहे. हे प्रकल्प पायाभूत सुविधा जोडणी प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजन आणि अंमलबजावणीचा भाग असल्याची माहिती वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

****

राज्यातील विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची ३१ डिसेंबर पर्यंत आधार नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र ही नोंदणी पूर्ण होईपर्यंत शालेय पोषण आहार आणि इतर कोणत्याही योजनेच्या लाभापासून विद्यार्थांना वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

****

No comments:

Post a Comment