Friday, 23 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      कोविड संबंधित सर्व नियमांचं पालन करण आवश्यक - पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      राज्यात नव्यानं कोविड कृती दल स्थापन करण्याचा निर्णय, सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यांत आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश

·      दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा तर मुंबईतील खासदारावर बलात्कार प्रकरणी झालेल्या आरोपांची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याचे विधान परिषद उपसभापतींचे निर्देश

·      राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचं विधानसभा अध्यक्षांबाबत असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोपावरून निलंबन

·      नव्यानं निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना संधी मिळावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात बदल

·      प्रसिद्ध लेखक प्रवीण बांदेकर आणि अनुवादासाठी प्रमोद मुजुमदार यांना साहित्य अकादमी पुरस्कार घोषित 

आणि

·      दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव २२७ धावांवर संपुष्टात, भारताच्या बिनबाद १९ धावा

 

सविस्तर बातम्या

चीनसह अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूचा `बीएफ 7` हा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोविड संबंधित सर्व नियमांचं पालन करण आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल घेतलेल्या बैठकीत ते ते बोलत होते. विमानतळांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यांनी कोविड संबंधीत ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सीजन निर्मित यंत्र, वेंटिलेटर यासंबंधीत उपकरणांच्या उपलब्धतेवर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरणं तसंच वयस्कर आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. औषध, प्रतिबंधक लस, रुग्णालयातल्या खाटांच्या उपलब्धेतवर तसंच आवश्यक औषध आणि त्यांच्या किंमतींवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी यावेळी केल्या.

****

राज्यातही काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. या बैठकीत नव्यानं कोविड कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यांत आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. राज्य मंत्रीमंडळ बैठकीतही यावर चर्चा झाली.

****

आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यात नवीन `बीएफ 7` या प्रकाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती काल विधानसभेत दिली. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही, मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करत गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावं, असं आवाहन त्यांनी केलं.

****

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली.

 

मुंबई पोलीसांकडे मला असं वाटतं ऑलरेडी केस आहे. या संदर्भातली ही जी मागणी आहे, निश्चितपणे जे काही पुरावे ज्यांच्याजवळ असतील त्यांनी द्यावे, यासंदर्भात एसआयटीचा माध्यमातून चौकशी केली जाईल.

 

या प्रकरणावरुन सत्ताधारी सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळं सदनाचं कामकाज दोन वेळा तहकूब झालं. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सरकारवर टीका केली. ते म्हणाले,

 

राज्यपाल हटावची आम्ही सतत मागणी करत आहोत, ज्या राज्यापालांनी या महाराष्ट्राचा अपमान केला, महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा अपमान केलाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय, महात्मा फुलेंचा अपमान केलाय, त्यांना वाचवण्यासाठी हा पूर्ण प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न आहे. आणि म्हणून हे सगळं कुठेतरी विचलित करायचं, ह्याच्यासाठी येतंय. जे काही शोधायचं शोधु द्या. महत्वाची गोष्ट हीच राहते की एन आय टी चा जो घोटाळा आहे, तो आम्हाला हाऊसमध्ये काढू देत नाहीयेत. आणि म्हणून हे सगळं चालूये.

****

दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा झाल्यानंतर, विरोधी सदस्यांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत, हे सदस्य सभागृहाच्या हौद्यात उतरले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी, विधानसभा अध्यक्षांबाबत असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोपावरून त्यांचं नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरीत काळासाठी निलंबन करण्यात आलं. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर पाटील यांच्या निलंबनाचा ठराव सभागृहात मांडण्यात आला. या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा भवनाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली. या प्रकरणावर प्रतिक्रीया देताना पाटील म्हणाले,

 

जे काही बोललो ते सरकारने या गोष्टी टाळाव्यात म्हणून बोललो. पण सरकारला काहीतरी करून आजचा प्रसंग टाळायचा होता. म्हणून त्यांनी अध्यक्षांच्या बद्दल मी बोललो हे अध्यक्षांना चिटकवलं. आणि त्याचा निलंबानाचा प्रस्ताव आणला. ठीक आहे, आज मेजॉरिटी तुमची आहे, निलंबन करताय, माझी काही तक्रार नाही.

 

****

विधान परिषदेत विरोधीपक्ष सदस्यांच्या मागणीवरून उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मुंबईच्या खासदाराची बलात्कार प्रकरणी झालेल्या आरोपांची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे केली जावी, असे निर्देश दिले. या खासदारावर एका तरुणीला फसवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ते संसदेचे सदस्य असल्याने नियमानुसार नोटीस दिल्याखेरीज त्यांचं नाव घेता येत नाही, त्यामुळे शिवसेनेच्या मनिषा कायंदे आणि अनिल परब यांनी हा मुद्दा संबंधित खासदाराचं नाव न घेता मांडला. या खासदारापासून तिच्या जिवाला धोका आहे. या प्रकरणी तिचे जबाब झालेले असले तरीसुद्धा पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावात असल्यामुळे अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसल्यानं तो दाखल करण्यात यावा आणि या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्यात यावं, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी केली.

****

महावितरण मध्ये लवकरच पदभरती करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. महावितरणमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक कामगारांची जवळपास २६ हजार ६४८ पदे रिक्त आहेत मात्र कंत्राटी कामगारांना सेवेत थेट घेता येत नसल्यानं भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना प्रत्येक वर्षी अधिकचे गुण देऊन प्राधान्य देण्यात येईल, तसंच त्यांना सुरक्षा महामंडळाच्या पद्धतीनं विमा संरक्षण देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. वीज महामंडळाचे कोणत्याही स्थितीत खाजगीकरण करण्याचा शासनाचा विचार नसल्याचंही फडणवीस यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं.

****

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राज्यात नव्यानं निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना संधी मिळावी यासाठी सहकारी निवडणूक प्राधिकरणानं राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला आहे. प्राधिकरणाच्या सहा सप्टेंबरच्या पत्रानुसार अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आणि याद्या प्रसिद्ध होणार असलेल्या सर्व बाजार समितीच्या निवडणुका तीन जानेवारी २०२३ पर्यंत पुढे ढकलल्या आहेत.

****

प्रसिद्ध लेखक प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीला, साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली. देशातल्या २३ भाषांमधल्या आठ साहित्य प्रकारांच्या २३ पुस्तकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. एक लाख रूपये रोख, ताम्रपट आणि महावस्त्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. अनुवादासाठीच्या पुरस्कारांमध्ये प्रमोद मुजुमदार यांच्या ‘सलाख्याचे प्रदेशः शोध सहिष्णु भारताचा या पुस्तकाचा समावेश आहे. सबा नकवी यांच्या ‘इन गुड फेथ या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. पन्नास हजार रूपये रोख आणि ताम्रपट असं अनुवादासाठीच्या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं काल दिर्घ आजारानं निधन झालं, त्या ५९ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशामभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. २०१७ मध्ये भाजपाच्या पहिल्या पुणे शहराच्या महापौर होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

****

भारतानं बांगलादेशाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल पहिल्या दिवस अखेर बिनबाद १९ धावा केल्या आहेत. ढाका इथं सुरू असलेल्या या सामन्यात बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी चार गडी आणि जयदेव उनाडकटनं दोन गडी बाद करत बांगलादेश संघाचा डाव २२७ धावांवर संपुष्टात आणला. दिवसअखेर खेळ थांबला तेव्हा कर्णधार के. एल. राहुल तीन आणि शुभमन गिल १४ धावा काढून खेळत होते.

****

औरंगाबाद महानगरपालिकेनं किती बेकायदा केबल्स जप्त केल्या आणि किती ऑपरेटर्सवर गुन्हे दाखल केले, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. यासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली. यापूर्वीच्या सुनावणीत महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथक प्रमुखांनी २५ हजार रुपये कॉस्ट म्हणून जमा करण्याचा आदेश खंडपीठानं दिला होता, मात्र त्याऐवजी महानगरपालिकेनं धनादेशाद्वारे कॉस्ट जमा केला. त्यामुळे अतिक्रमण हटाव पथक प्रमुख रविंद्र निकम यांनी आपल्या पगारातून कॉस्ट म्हणून तत्काळ २५ हजार रुपये जमा करण्याचे आदेश खंडपीठानं यावेळी दिले.

****

नांदेड जिल्ह्यात माळेगाव इथल्या श्री खंडोबा यात्रेला काल सुरुवात झाली. यावेळी परंपरेनुसार खंडोबाच्या आणि मानकर्यांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं. प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते शासकीय माहपूजा करण्यात आली. या यात्रेनिमित्त लाखो भाविक माळेगावात दाखल झाले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात खाजनापुर वाडी, आंबा, कुरुंदा, यासह कळमनुरी तालुक्यात कवडा आणि इतर गावांमध्ये काल दुपारी दोन वाजेदरम्यान भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यात कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती तलाठी एन. गिते यांनी दिली. दरम्यान, वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे, शिरळी, वापटी, कुपटी, डोनवाडा, कुरुंदा, सेलू, आंबा यासह २० गावांत परवा भूकंपाचा धक्का जाणवला होता असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या दौलताबाद किल्ला परिसरातली अतिक्रमणं येत्या ३१ तारखेपर्यंत हटवावी अथवा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला आहे. शहरात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या बैठकीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी `बिबी का मकबरा` परिसर, दौलताबाद किल्ला आणि वेरुळ लेणी परिसरातल्या अतिक्रमणांची पाहणी करुन लवकरात लवकर अतिक्रमणं काढण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

****

उस्मानाबाद नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या २०१६ ते २०२१ या कालावधीतल्या कारभाराची चौकशी करुन विशेष लेखा परीक्षण करण्याची मागणी, काँग्रेस नेते धनंजय राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात मकरंद राजेनिंबाळकर यांनी  दमदाटी करुन चुकीचं प्रशासकीय कामकाज करुन घेतलं, जुलै २०२१ च्या एकाच सर्वसाधारण सभेत चारशे पेक्षा जास्त कामं मंजूर करुन घेतल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.

****

नांदेड- अमृतसर विशेष रेल्वेगाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पूर्वी ही गाडी नांदेड इथून आज आणि उद्या सुटणार होती, मात्र आता यात बदल करण्यात आला असून, ही गाडी २७ आणि २८ डिसेंबरला नांदेड इथून रात्री ११ वाजून दहा मिनिटांनी सुटेल. आणि  पूर्णा,   हिंगोली,  वाशीम,  अकोला,  खांडवा, आग्रा,   नवी दिल्ली,   जालंधर  मार्गे  अमृतसर ला  तिसऱ्या  दिवशी  सकाळी  साडे नऊ वाजता  पोहोचेल. प्रवाशांनी हा बदल लक्षात घ्यावा, असं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेनं केलं आहे.

****

निझामाबाद- नांदेड- निझामाबाद ही विशेष रेल्वे उद्यापासून २७ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. सिकंदराबाद विभागातल्या तांत्रिक समस्येमुळं ही रेल्वे रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment