Friday, 23 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय आज सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. दुपारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक होईल. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उच्चस्तरीय बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या होत्या.

****

दरम्यान, भारतीय विमानतळांवर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानातल्या किमान दोन टक्के प्रवाशांची कोविड चाचणी करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं घेतला आहे. विविध देशां त सध्या फैलावत असलेल्या कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रसाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे.

****

कोविड-१९ च्या XBB प्रकाराबाबत समाज माध्यमावर फिरत असलेला संदेश बनावट आणि दिशाभूल करणारा आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांनी या खोट्या संदेशांकडे लक्ष देऊ नये, असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे.

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन आज वेळापत्रकानुसार निर्धारित सहा दिवस आधीच संस्थगित होणार आहे. लोकसभेत काल शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते गदारोळ करत असतानाच, अधिवेशन तहकूब करण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीनं घेतल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.

****

देशातली शांतता आणि ऐक्याला बाधा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसंच नियमांची पायमल्ली केल्याबद्दल केंद्र सरकारनं विविध यू ट्यूब वाहिन्या, अॅप्स, संकेतस्थळं आणि समाज माध्यमांवर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. भविष्यातही अशा व्यासपीठांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

****

मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्रात कालपासून अटल इन्क्युबेशन केंद्राची सुरुवात करण्यात आली. यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग- उद्योगांसाठी, अणु ऊर्जा विभागानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानांचा उपयोग करण्याविषयीच्या करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या.

****

बीड जिल्ह्यातल्या धारुर इथं बैलगाडी तलावात पडून आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला, तर एक बैल दगावला. सय्यद कबीर बाशुमिया आणि त्यांचा नातू आजमत अखिल सय्यद काल बैलगाडीने शेतावर निघाले असता, रानडुकरांनी हल्ला केल्यामुळे बैल बिथरले, त्यामुळे बैलगाडी तलावात पडली.

****

No comments:

Post a Comment