Saturday, 24 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 24 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २४ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

गेल्या २४ तासात देशभरात कोरोना विषाणु संसर्ग झालेले २०१ नवे रुग्ण आढळले तर १८३ रुग्ण या आजारातून बरे झाले. सध्या देशभरात ३ हजार ३९७ सक्रीय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात ५ हजार ४४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. देशात आतापर्यंत २२० कोटी ४ लाख इतकं लसीकरण झालं आहे. यापैकी ९५ कोटी १२ लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा तर २२ कोटी ३६ लाख नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात आलेली आहे.

***

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा आज सकाळी सहा वाजता दिल्लीत पोहोचली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचं बदरपूर इथं स्वागत केलं. तामिळनाडू इथून सुरू झालेली ही यात्रा तेलंगणा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांना भेट देऊन आज नवी दिल्लीत दाखल झाली.

***

केंद्र सरकारनं प्रधानमंत्री आयुष्मान भारत स्वास्थ्य अभियानासाठी प्रतीकचिन्ह- `लोगो` तयार करण्यासाठी सहभागी होण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. भारतात सशक्त आणि सुलभ आरोग्यव्यवस्था असल्याचं या माध्यमातून सुस्पष्टपणे लक्षात यावं अश्या आशयाचं प्रतिकचिन्ह तयार करावं असा सरकारचा उद्देश आहे. विजेत्याला एक लाख रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

***

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाताळनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील आणि धीरोदात्त जीवनाचं स्मरण देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि संपन्नता घेवून येवो, या सदिच्छेसह सर्वांना नाताळ तसंच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा, असं राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

***

राजकीय व्यवस्था, प्रशासनाला वाणिज्य आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी कृतीशील विचार मांडून पाठपुरावा केला तरच कल्याणकारी राज्याची संकल्पना अस्तित्वात येईल, असं प्रतिपादन माजी कुलगुरु डॉ. विजय धारुरकर यांनी काल केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ७३ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेमध्ये प्रा. समयोद्दीन स्मृती पुरस्कार वितरण सत्रात ते काल बोलत होते. दरम्यान, अखिल भारतीय वाणिज्य परिषदेच्या अध्यक्षपदी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक वाल्मिक सरवदे यांची निवड करण्यात आली आहे. या परिषदेचा आज समारोप होत आहे. 

***

सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक तथा कादंबरीकार डॉ. राम वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.  येत्या ३० डिसेंबर रोजी लोहा तालुक्यातील जवळा देशमुख इथं हे संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांनी दिली आहे. डॉ. राम वाघमारे यांचे कथासंग्रह, अनेक कादंबऱ्या आणि अनेक चरित्रात्मक पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत.

***

नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या माळेगाव यात्रेमध्ये विविध पशुधनांना सजावट करणाऱ्या वस्तूंची बाजारपेठ फुलली आहे. माळेगाव यात्रेमध्ये घोडा, उंटासह इतर पशु खरेदी विक्रीसाठी आणले गेले आहेत. यात्रेत राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, चंदिगड, पंजाब मधून व्यापारी वर्ग सहभागी झाला आहे.  या यात्रेत आज कुस्त्यांची दंगल होणार आहे.

***

औरंगाबाद इथल्या सलोखा प्रस्थापन संस्थेच्या वतीनं शहरामध्ये नायलॉन मांजा  विरोधी अभियान राबवण्यात ये आहे. यासंदर्भात सलोखा प्रस्थापन संस्था, महानगरपालिकेचे पदाधिकारी, नागरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि सहकार फाउंडेशन यांनी काल बैठक घेतली. येत्या २८ तारखेला क्रांती चौकात दुपारी बारा वाजता संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जमा केलेले, जप्त केलेले पतंग आणि नायलॉन मांजा यांची होळी केली जाणार आहे.

***

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेश संघानं आज तिसऱ्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावात सहा बाद १२० धावा केल्या आहेत. ढाका इथं सुरू या सामन्यात भारतानं पहिल्या डावात ९२ धावांची आघाडी घेतली आहे.   

***

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्ली इथं आज खेलो इंडियाच्या नव्या `डॅशबोर्ड`चं अनावरण केलं. यावर `खेलो इंडिया` योजना आणि `खेलो इंडिया`च्या कार्यक्रमांशी संबंधित सर्व सांख्यिकी माहिती उपलब्ध आहे.

//***********//

 

No comments:

Post a Comment