Thursday, 29 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 29 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २९ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      जी- ट्वेंटी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात देशाच्या बलस्थानांवर अधिक भर देण्याचा निर्धार

·      देशात क्षयरुग्णांच्या संख्येत १८ टक्क्यांनी घट;२०२५ पर्यंत क्षयरोग निर्मुलनाचं उद्दीष्ट

·      लोकायुक्त २०२२ विधेयक विधानसभेत कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर

·      टीईटी घोटाळ्यावरून विधानसभेत विरोधकांचा सभात्याग;उपमुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचं आश्वासन

·       शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात मॉडेल स्कूल योजना राबवण्याची घोषणा

·      खासदार इम्तियाज जलील यांचा माजी मंत्री सुभाष देसाई यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप

·      माजी मंत्री अनिल देशमुख यांची काल कारागृहातून जामिनावर सुटका

·      बुलडाण्याच्या उपजिल्हाधिकाऱ्याला एक लाख रुपये लाच घेताना रंगेहात अटक

·      आणि

·      औरंगाबाद विभागात सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासनाची जागेवरच निवड संधी योजना

 

सविस्तर बातम्या

जी- ट्वेंटीच्या भारताच्या अध्यक्षतेच्या काळात सर्वसमावेशक वृद्धी, विविध गोष्टींना पर्याय पुरवण्याची देशाची क्षमता आणि मूलभूत तंत्रज्ञान निर्माण करण्याची आकांक्षा, या बलस्थानांवर लक्ष दिलं जाईल, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. काल नवी दिल्लीत जी - २० डिजिटल इनोव्हेशन अलायन्स आणि ऑनलाइन सुरक्षित रहा, या अभियानाचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. जी-२० डिजिटल इनोव्हेशन अलायन्स अंतर्गत जगभरातल्या देशांसमोरच्या समस्यांना पर्याय सुचवणाऱ्या संशोधकांना पाठिंबा दिला जाणार आहे. ऑनलाईन सुरक्षित राहा अभियान इंटरनेट वापरणाऱ्यांना सायबर सुरक्षेबाबत अधिक सतर्क होण्यास मदत करणार आहे.

****

देशात यावर्षी क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येत १८ टक्क्यांनी घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली. देशातील क्षयरोग २०२५ पर्यंत संपुष्टात आणणं केंद्रीय आरोग्य विभागाचं मुख्य उद्दिष्ट आहे. क्षयरोग निर्मूलन प्रकल्प हाती घेण्यासाठी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने केंद्रीय क्षयरोग विभाग, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसोबत सामंजस्य करार केला आहे. भारतात उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये क्षयरुग्णांची संख्या अधिक आहे.

****

महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२ हे नवीन लोकायुक्त विधेयक काल विधानसभेत कोणत्याही चर्चेविना आणि विरोधी पक्षांच्या आमदारांच्या अनुपस्थितीत एकमताने मंजूर करण्यात आलं. या कायद्यामुळे आता मुख्यमंत्री, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्या भ्रष्टाचाराच्या घटनेवर लोकायुक्त थेट कारवाई करू शकणार आहेत. हे विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले. लोकपाल कायद्यासारखे लोकायुक्त विधेयक मंजूर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

****

मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणं खपवून घेतलं जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. कर्नाटक राज्य सरकारमधल्या एका मंत्र्याने मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्यासंदर्भात केलेल्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले...

 

कर्नाटक सरकारने तिथले कोणी मंत्री आहेत, त्यांनी कालच काहीतरी मुंबई हे केंद्रशासीत करा म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. त्याचा निषेध सगळ्यांनीच केलाय. मीही या ठिकाणी सभागृहाच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो. आणि अशा प्रकारचं वक्तव्य जे करतायेत, त्यांना त्या राज्याच्या प्रमुखांनी देखील समज दिली पाहिजे, कारवाई केली पाहिजे. आणि मुंबई ही कोणाच्याही बापाची नाही, मुंबई आपल्या महाराष्ट्राची आहे. आणि अशा प्रकारचं भाष्य करणं, अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य करणं हे कोणालाही न परवडणारं आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही भूमिका मांडली. अशा प्रकारच्या वक्तव्याचा निषेध करणारं पत्र कर्नाटक सरकारला पाठवलं जाईल, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले...

 

मुंबईवर दावा सांगणं हे खपवून घेतलं जाणार नाही. त्याबद्दल त्याचा निषेध आम्ही याठिकाणी करतो. तशा प्रकारचं निषेधाचं पत्र आम्ही त्यांना पाठवू. त्यांनी अशा प्रकारे जे काही गृहमंत्र्यांसमोर ठरलं आहे, त्याचं उल्लंघन करणं हे दोन राज्यांच्या बायलॅटरल रिलेशनकरता योग्य नाही. हे त्यांना अतिशय कडक शब्दात सांगण्यात येईल. आणि यासोबतच माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांच्यादेखील निदर्शनास आणून देण्यात येईल.

****

टीईटी घोटाळ्यासंदर्भात अजित पवार यांचा प्रश्न मांडण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नकार दिला. मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला असून, सरकार त्यांना पाठिशी घालत आहे, त्यांच्यावर काही कारवाई करत नसल्याचं सांगत विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान, टीईटी घोटाळा हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मागील सरकारच्या काळात जो टीईटी घोटाळा झाला, त्यात अपात्र कंपन्या पात्र करण्यात आल्या, याबाबत उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

****

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात मॉडेल स्कूल योजना राबवण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल विधान परिषदेत दिली. ते याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते. ही मॉडेल स्कूल सेंट्रल बोर्ड पद्धतीने कार्यरत असतील.

दरम्यान, शालेय पोषण आहार योजनेबद्दल असलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, अशी माहिती केसरकर यांनी काल विधानसभेत दिली. राज्यात लवकरच शिक्षक पदभरती प्रकिया सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सद्यस्थितीत ५० टक्के शिक्षक भर्ती पवित्र पोर्टलद्वारे केली जाणार असून, सर्व परीक्षांचा निकाल मार्चमध्ये लागल्यानंतर आणि आधार संलग्नीकरण पूर्ण झाल्यानंतर ८० टक्के भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं केसरकर म्हणाले.

राज्यातल्या सर्व महानगरपालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांची १०० टक्के आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी, एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

****

पैठणी तयार होऊ शकते इतका चांगला रेशीम धागा मराठवाड्यात तयार होऊ शकतो, त्यामुळे तुतीच्या प्रकल्पाला चालना देण्याची गरज असल्याचं, माजी मंत्री राजेश टोपे यांनी काल विधानसभेत सांगितलं. तालुका औद्योगिक विकास महामंडळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा सुधारल्याशिवाय रोजगार उपलब्ध होऊ शकणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. मराठवाड्याच्या विकासासाठी सर्व गोष्टी बाजूला ठेवून एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं.

****

गायरान भूखंड वाटप प्रकरणात झालेले आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी फेटाळून लावले. आपण सद्सदविवेक बुद्धीने हा निर्णय दिला, असं त्यांनी विधानसभेत सांगितलं. ते म्हणाले...

 

साकल्याने, सहानुभूतीपूर्वक विचार करून मी सद्‌सद्‌विवेकबुद्‌धीने याप्रकरणी न्याय निवाडा दिला आहे. यामध्ये कोणताही हेतूपुरस्सर निर्णय घेतलेला नाही. माझ्या आदेशाच्या पूर्वस्थितीत अर्जनियमन देखील कायम करण्यात आलेलं आहे. त्यात कोणत्याही संस्थेचं हित निर्माण झालेलं नाही. तसेच माझ्या आदेशामुळे आजपर्यंत कोणताही फायदा किंवा नुकसान झालेलं नाही. शासनाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही ही बाब दिसून येते.

 

दुसरीकडे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी माजी मंत्री सुभाष देसाई यांच्यावर एक हजार कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. राज्यभरात औद्योगिक भूखंड रुपांतर प्रकरणात हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप खासदार जलील यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले..

 सुभाष देसाई साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जे इंडस्ट्रियल लँडचा कन्व्हर्जन त्यांनी केलेला आहे, मागचा त्यांचा जो काळ होता आणि विशेषतः जाता जाता त्यांच्या दोन वर्षामध्ये ते संपूर्ण महाराष्ट्राच्या आपण आकडा काढला तर रफली ते एक हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होऊ शकतो जे सुभाष देसाई साहेबांनी केलेला आहे लँड कन्व्हर्जनमध्ये.

 

औरंगाबाद इथं चिकलठाणा औद्यागिक वसाहतीत ५२ भूखंडांचा वापर बदलण्यात आला आहे. या प्रकरणात सुभाष देसाई यांचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप जलील यांनी केला. राज्यात आत्तापर्यंत ३२ हजार एकर जमीनीचं गेल्या पंधरा वर्षात अशा प्रकारे रुपांतरण झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, खासदार जलिल यांचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचं, सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. हा आरोप करताना त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाही, जलिल यांनी माफी मागावी अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा केला जाईल, असं देसाई म्हणाले.

****

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या समारोप होणार असल्याचं संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संगितलं. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं, ते म्हणाले.

****

माजी मंत्री अनिल देशमुख यांची काल कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली. सुमारे चौदा महिन्यांपासून ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात होते. देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे आदी ज्येष्ठ नेते, देशमुख यांचे कुटुंबीय तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत ऑर्थररोड कारागृहासमोर गर्दी केली होती.

****

औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता सखाराम पानझडे यांच्या विविध गैरकारभार प्रकरणी प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी केली जाईल, असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. विधानसभेत सदस्य प्रशांत बंब यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, स्थापत्य पदविकाधारक असतानाही शासकीय नियमाचं उल्लंघन करत शहर अभियंता पदापर्यंत पदोन्नती मिळवणं, सेवानिवृत्त झाल्यानंतर गैरमार्गाने करार पद्धतीवर स्वतःची नेमणूक करून घेणं, आदी गैरप्रकारांकडे सदनाचं लक्ष वेधलं.

****

बुलडाणा इथले भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. मोताळा इथले वकील अनंत देशमुख यांच्यामार्फत ही लाच स्वीकारली जात होती. याप्रकरणी लिपीक नागोराव खरात यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद विभागातल्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी सर्व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत, ‘जागेवरच निवड संधी ही मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी प्रत्येक जिल्हा कार्यालयामध्ये उपलब्ध रिक्तपदे यांची माहिती देण्यात येईल तसंच याच वेळी नियोक्त्यांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. या संधीचा लाभ इच्छुक उमेदवारांनी घ्यावा, असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्र, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसंच विभागीय आयुक्तालयाकडून करण्यात आलं आहे.

****

राज्य परिवहन महामंडळाकरता नवीन बसेस घेण्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त ७०० कोटी रुपये महामंडळाला देण्यात आले आहेत. ग्रामीण तसंच शहरी भागात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत असून, यासाठी ग्रामीण भागात १७० ठिकाणी बस चार्जिंग स्टेशन उभारण्याचं प्रस्तावित असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.

****

राज्यातल्या साखर कारखान्यांची वाहतूकदार, मुकादम, ऊस तोडणी कामगारांकडून फसवणूक होऊ नये म्हणून साखर आयुक्तालयाने तयार केलेल्या महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार ॲपमध्ये, गेल्या दोन वर्षातील माहिती संकलित केली आहे. राज्यात २००४ ते २०२० पर्यंत सुमारे ४० कोटी रुपयांची फसवणूक मुकादमाकडून झाल्याची माहिती ॲपद्वारे प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखानदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत येत्या ९ तारखेला बैठक घेण्यात येईल असं सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधान सभेत सांगितलं.

****

पीक विम्यासह सततच्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विधानसभेचं लक्ष वेधलं. कृषीमंत्री हे मराठवाड्यातले असल्यानं त्यांनी या बाबीचा गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

****

अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याबाबत जिल्ह्याची माहिती आल्यानंतर केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवणार असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितलं. सदस्य गोपीचंद पडळकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

****

बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या एका डॉक्टरचे सायबर गुन्हेगारांनी ७५ हजार रुपये लंपास केले. ऑनलाईन शॉपिंग कंपनीकडून आलेलं पार्सल परत करण्यासाठी या डॉक्टरांनी इंटरनेटवरून कस्टमर केयर नंबर मिळवला. त्यावर संपर्क साधून दिलेल्या सूचनेनुसार प्रक्रिया केल्यावर आपल्या बँक खात्यातून ७५ हजार रुपये लंपास केल्याचं डॉक्टरच्या लक्षात आलं. याप्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार सावधपणे करणं आवश्यक आहे.

****

औषध दुकानदारांनी अंमली पदार्थाचा अंश असणाऱ्या औषधांची विक्री करताना रुग्णांचं आधारकार्ड आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या चिठ्ठीची खातरजमा करुन विक्री करावी, असे निर्देश औरंगाबादचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिले आहेत. काल या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. व्यसनाधिनता वाढू नये यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून अंमली पदार्थाच्या विक्रीला प्रतिबंध करण्याबरोबरच औषधी विक्री केंद्रावर भेटी देवून अहवाल मागवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****


 

 

No comments:

Post a Comment