▼

Monday, 2 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.01.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ जानेवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

अल्पबचत खात्यांवरचे वाढीव व्याजदर कालपासून लागू झाले. त्यानुसार राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर आता सात टक्के दरानं व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना आठ टक्के; किसान विकास पत्रावर सात पूर्णांक दोन दशांश टक्के; तर एक वर्षापर्यंतच्या अल्पबचत ठेवींवर सहा पूर्णाक सहा दशांश टक्के दरानं व्याज मिळणार आहे.

****

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन डिसेंबर महिन्यात एक लाख ४९ हजार कोटी रुपये इतकं झालं आहे. २०२१ च्या डिसेंबरच्या तुलनेत हे संकलन १५ टक्क्यांनी वाढल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. डिसेंबर २०२२ मध्ये केंद्रीय जीएसटी २६ हजार ७११ कोटी रुपये, राज्य जीएसटी ३३ हजार ३६७ कोटी रुपये, इंटिग्रेटेड म्हणजे मिश्र जीएसटी ७८ हजार ४३४ कोटी रुपये, तर सेस म्हणजे उपकर ११ हजार कोटी रुपये इतका जमा झाला आहे. या महिन्यात आयात केलेल्या वस्तूंमधून जमा झालेल्या महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्के वाढ झाली आहे, तर देशांतर्गत व्यवहारातून जमा झालेल्या महसुलात १८ टक्के वाढ झाली आहे.

****

शिक्षण उद्योग आणि नोकरी अशा धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत तरुणांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, असं आवाहन, लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे. काल नववर्षाच्या पहिल्या दिवशी लातूर इथं प्रभाग क्रमांक ५ मध्ये उभारलेल्या सार्वजनिक व्यायामशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. सध्या बैठी कामं वाढलेली असल्यामुळे नित्य व्यायाम गरजेचा असल्याचं मत गोजमगुंडे यांनी व्यक्त केलं.

****

परभणी जिल्हा पोलिस दलातल्या ७५ रिक्त जागांकरता आज पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस भरती प्रक्रिया होणार आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर. यांनी ही माहिती दिली.

****

राज्यातल्या नवीन खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी आजपासून १२ जानेवारीपर्यंत, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा आठ जिल्ह्यांमध्ये होणार असून, यात ३९ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. राज्यातले १० हजार ४५६ खेळाडू, या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

 

//*********//

No comments:

Post a Comment