▼

Tuesday, 3 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.01.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 January 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.

****

महिलांच्या सक्षमीकरणासह त्यांच्या भागीदारीने त्यांना विज्ञानाच्या प्रगतीत सामील करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शतकोत्तर आठव्या भारतीय विज्ञान अधिवेशनाचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विज्ञान - तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. यावर्षीच्या विज्ञान काँग्रेसची संकल्पना ‘महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ अशी आहे. पुढच्या २५ वर्षात भारत ज्या उंचीवर असेल, त्यात देशातल्या वैज्ञानिकांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असं पंतप्रधान म्हणाले. वैज्ञानिकांनी संपूर्ण मानवतेसाठी आणि भारताच्या वाढत्या गरजांसाठी महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर काम करावं, जर वैज्ञानिकांनी ऊर्जा आवश्यकतेच्या शोधासाठी काम केलं तर देशाला त्याची मदत होईल, असं ते म्हणाले. एकविसाव्या शतकात भारताकडे डेटा आणि तंत्रज्ञान या दोन बाबी विपुल प्रमाणात उपलब्ध असून, भारताला वैज्ञानिक क्षेत्रात उंचीवर नेण्याची ताकद या दोन्हीत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विज्ञानाचा उपयोग संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यात तसंच भारताला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्यात करत असल्याचं नमूद केलं.

या अधिवेशनातून निघालेल्या विचार मंथनातून महिला सशक्तीकरणाचं ध्येय साधलं जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

"प्राईड ऑफ इंडिया" म्हणजेच ‘शान भारताची’ हे प्रदर्शन या कार्यक्रमाचं खास आकर्षण आहे. या प्रदर्शनात भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं समाजासाठीचं महत्त्वपूर्ण योगदान, तसंच वैज्ञानिक क्षेत्रातील ठळक घडामोडी, प्रमुख उपलब्धी प्रदर्शित केल्या आहेत.

****

भारताच्या पहिल्या शिक्षिका आणि थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं आहे. सावित्रीबाई यांचं जीवन महिलांना शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी समर्पित होतं, सामाजिक सुधारणा आणि समाजसेवेमध्ये त्यांनी दिलेलं योगदान तितकंच प्रेरणादायी असल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

औरंगाबाद शहरात औरंगपुरा इथल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीबा फुले यांच्या पुतळ्याला सर्वपक्ष, संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे.

****

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं येत्या पाच जानेवारी पसून देशभरातल्या जलसंपदा विभागाशी संबंधित राज्य मंत्र्यांची दोन दिवसीय अखिल भारतीय परिषद आयोजित केली आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ इथं आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेची संकल्पना, ‘व्हिजन@२०४७’ ही आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत या परिषदेचं उदघाटन करतील. राज्यांच्या भागधारकांकडून त्यांचा दृष्टिकोन जाणून घेणं, आणि जल शक्ती मंत्रालयाच्या योजनांची माहिती त्यांना देणं, हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे.

****

भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज कर्करोगानं निधन झालं, ते ५९ वर्षांचे होते. जगताप हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनानं राजकीय क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जगताप यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. 

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतल्या  निवासी डॉक्टरांचा आज दुसर्या दिवशीही संप सुरुच आहे. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. प्रशासनानं कुठलंही लेखी आश्वासन अजून दिलं नाही. मागण्यांसदर्भात ठाम असून, त्या मान्य न झाल्यास सर्वच सेवा बंद करण्याचा इशारा मार्ड संघटनेनं दिला आहे.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पाहिला सामना आज मुंबईत खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

येत्या काही दिवसांत पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दाट धुकं आणि थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्यातही तापमानात लक्षणीय घट झाली असून, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहील, असं पुणे वेधशाळेनं सांगितलं आहे.

//**********//

No comments:

Post a Comment