▼

Tuesday, 3 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 03.01.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 January 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ जानेवारी २०२३    सायंकाळी ६.१०

****

·      विज्ञानाच्या प्रगतीत महिलांना सहभागी करून घेणं आवश्यक - शतकोत्तर आठव्या विज्ञान अधिवेशनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन.

·      सरकारच्या विचाराधीन प्रकरणाबाबत एखाद्या मंत्र्याचं वक्तव्य हे सरकारचंच मत असं नाही - सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा.

·      विमुद्रीकरण हे आर्थिक हत्याकांड-शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा आरोप तर विमुद्रीकरणावर टीका करणाऱ्यांनी देशाची माफी मागावी - भाजपची मागणी.

आणि

·      थोर समाज सुधारक आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सर्वत्र विविध कार्यक्रमांतून अभिवादन.

****

महिलांच्या सक्षमीकरणासह त्यांना विज्ञानाच्या प्रगतीत सहभागी करून घेणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शतकोत्तर आठव्या भारतीय विज्ञान अधिवेशनाचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावर्षीच्या विज्ञान काँग्रेसची संकल्पना ‘महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ अशी आहे. वैज्ञानिकांनी ऊर्जा आवश्यकतेच्या शोधासाठी काम केलं तर देशाला त्यांनी मदत होईल, असं पंतप्रधान म्हणाले. एकविसाव्या शतकात भारताकडे डेटा आणि तंत्रज्ञान या दोन बाबी विपुल प्रमाणात उपलब्ध असून, भारताला वैज्ञानिक क्षेत्रात उंचीवर नेण्याची ताकद या दोन्हीत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

“प्राईड ऑफ इंडिया” म्हणजेच ‘शान भारताची’ हे प्रदर्शन या कार्यक्रमाचं खास आकर्षण आहे. या प्रदर्शनात भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं समाजासाठीचं महत्त्वपूर्ण योगदान, तसंच वैज्ञानिक क्षेत्रातील ठळक घडामोडी, प्रमुख उपलब्धी प्रदर्शित केल्या आहेत.

****

सरकारच्या विचाराधीन असलेल्या प्रकरणाबाबत एखाद्या मंत्र्यानं केलेलं वक्तव्य हे सरकारचंच मत आहे, असं म्हणता येत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. लोकसेवकांच्या अभिव्यक्तीवर काही प्रतिबंध लावता येऊ शकतात का, या प्रश्नासंदर्भात बोलताना न्यायालयानं हे मत व्यक्त केलं आहे. सरकार ही सामुदायिक जबाबदारी आहे असं मान्य करूनही, एखाद्या मंत्र्याचं वक्तव्य हे त्याचं एकट्याचं मत असू शकतं, संविधानाच्या एकोणीसाव्या परिच्छेदाच्या दुसऱ्या कलमांतर्गत ठरलेले प्रतिबंध सोडून, कोणत्याही नागरिकाच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या अधिकारावर प्रतिबंध लावला जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

****

विमुद्रीकरण हे आर्थिक हत्याकांड होतं, असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं याबाबत नुकताच चार विरुद्ध एक अशा मताने निर्णय सुनावला. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात राऊत यांनी हा आरोप केला. ते म्हणाले –

नोदबंदीनंतर जो उद्रेक झाला, मी हत्याकांड म्हणेन, हे आर्थिक हत्याकांड होतं या देशातलं. हजारो लोकं बँकाच्या रांगेत मरण पावले. नोटबंदीमुळे बेरोजगारी जी निर्माण झाली, त्याच्यामुळे लाखो लोकांनी रोजगार गमावला, लाखोंनी आत्महत्या केल्या. त्याच्यामुळे या आर्थिक हत्याकांडाला जबाबदार कोण याचं उत्तर न्यायालयानं दिलं नाही. नोटबंदी वैध कशी हा प्रश्न लोकांच्या मनात आहे. आणि म्हणून न्यायमूर्ती नागारत्ना यांनी जे रीसेंट नोट त्यांची जी आहे, चार आणि एक असं जे आहे, आम्ही त्या एकच्या बाजुने आहोत.

 

विमुद्रीकरणाची संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवल्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात सातत्याने मोहीम चालवणाऱ्या नेत्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपनं केली आहे. भाजपचे नेते विश्वास पाठक यांनी मुंबईत भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे बनावट चलन, काळा पैसा आणि कर चोरीला आळा बसला, रोखरहीत व्यवहार वाढले, दहशतवाद्यांचा निधीपुरवठा तोडला गेल्याने काश्मीरमध्ये होणारी दगडफेक थांबली, देशाची अर्थव्यवस्था ३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढली आहे. अर्थसंकल्पाचा आकार १५ लाख कोटींवरून ४० लाख कोटींवर पोहोचला. आणि विमुद्रीकरणावेळी जगात ११ व्या स्थानावर असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली, या सगळ्या बदलांचं श्रेय विमुद्रकीरणालाच द्यावं लागेल, असंही विश्वास पाटील यांनी नमूद केलं.

****

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण - यूआयडीएआय नं, कुटुंबप्रमुखाच्या परवानगीनं आधार कार्डवरचा आपला पत्ता ऑनलाईन अपडेट करू शकण्याची विशेष सुविधा सुरू केली आहे. कुटुंबप्रमुखासोबत नातं दर्शवणारा, शिधापत्रिका, गुणपत्रिका, विवाह प्रमाणपत्र यासारखा दस्तावेज सादर करून अर्जदाराला आपला आधारकार्डवरचा पत्ता ऑनलाईन अपडेट करता येईल. वेगवेगळ्या कारणांनी आपल्या मूळ ठिकाणाहून वेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या तसंच स्वत:च्या नावावर कागदपत्रं नसलेल्या व्यक्तींना या सुविधेचा फायदा होणार आहे.

****

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता संघर्ष समितीनं आज मध्यरा‍त्रीपासून बहात्तर तासांचा संप पुकारला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिमंडळात आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती महावितरणनं दिली आहे. या व्यवस्थेतून औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या सगळ्या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेतली जात आहे, असं महावितरणनं कळवलं आहे. वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी आणि ग्रामीण भागातल्या वीजग्राहकांनी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या १ ९ १ २ या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधावा, असं महावितरणनं म्हटलं आहे.

****

देशातल्या पहिल्या शिक्षिका आणि थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमातून त्यांना अभिवादन करण्यात आलं.

महापुरुषांच्या वास्तुंचं जतन करण्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज सातारा जिल्ह्यात नायगाव या सावित्रीबाईंच्या जन्मगावी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्मारकाला अभिवादन केलं, त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना, महापुरुषांच्या वास्तुंचं जतन करण्याची ग्वाही दिली. सहकार मंत्री अतुल सावे, मंत्री शंभुराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी सावित्रीबाईंना अभिवादन केलं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं वास्तव्य असलेल्या पुण्यातल्या भिडे वाड्यात त्यांचं स्मारक उभारणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

औरंगाबाद शहरात औरंगपुरा इथल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीबा फुले यांच्या पुतळ्याला सर्व पक्ष आणि संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभागाच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज ऑनलाईन व्याख्यानमाला घेण्यात आली.

हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कळमनुरी तालुक्यात कवडा इथल्या सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात सावित्रीबाई फुले यांचं रांगोळीच्या माध्यमातून भव्य चित्र साकारलं. 

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर ग्रामीण रुग्णालयात, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलं.

****

लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा व्हावा या मागणीसाठी उस्मानाबाद इथे आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या सुरुवातीला कथित लव्ह जिहादच्या वाढत्या घटना, त्यांची तीव्रता आणि दुष्परिणाम याबाबतीत जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजनही करण्यात आलं. महिलांच्या शिष्टमंडळानं, धर्मांतर आणि लव्ह जिहादविरोधी कायदा व्हावा या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. या मोर्चात महिला, शालेय विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जैन समाजाचं पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर इथे आज सकल जैन समाजातर्फे मूकमोर्चा काढण्यात आला. सम्मेद शिखरजी पवित्र स्थळ आहे, त्याचं पर्यटन स्थळ होणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या मोर्चात जैन समुदाय मोठ्या संख्येनं, सहकुटुंब सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment