▼

Wednesday, 4 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.01.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 January 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.

****

कथित संभाव्य खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता संघर्ष समितीनं, मध्यरा‍त्रीपासून बहात्तर तासांचा संप पुकारला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ३० संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. या संपाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिमंडलात आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती महावितरणनं दिली आहे.

दरम्यान, या संपाचा परिणाम औरंगाबादमधल्या ग्रामीण भागात जाणवत आहे. वैजापूर, गंगापूर तालुक्यात लासूर स्टेशन आणि सिद्धनाथ वडगाव इथला वीजपुरवठा सकाळच्या सुमारास विस्कळीत झाला होता, मात्र वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

लातूर जिल्ह्यातल्या लातूर, निलंगा, उदगीर या विभागातल्या अनेक भागात तांत्रिक अडचणींमुळे वीजपुरवठा खंडीत झाला आहे. जिल्ह्यातले जवळपास ९० टक्के वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

वाशिम जिल्ह्यातले ६०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. या संपामुळे वाशिम शहरासह ४३ गावांचा वीज पुरवठा रात्रीपासून खंडित झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका कोयना वीजनिर्मितीला देखील बसला आहे. ३६ मेगावॅट वीज निर्मितीचे दोन युनिट बंद झाले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

***

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मुंबईत आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार जगभर होण्यासह उद्योग कल्पनांच्या आदान-प्रदानासाठी जगभरातल्या मराठी भाषाप्रेमी आणि उद्योजकांसाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावेळी उपस्थित आहेत.

***

पुण्यात येत्या १६ आणि १७ तारखेला होत असलेल्या जी 20 परिषदेच्या बैठकांपैकी एक कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. त्यासाठीची तयारी विद्यापीठानं सुरू केली आहे. या अनुषंगानं विद्यापीठानं येत्या १३ आणि १४ जानेवारीला विशेष माहितीपर व्याख्यानाचं आयोजन केलं आहे. सामान्य नागरिकांनाही ऑनलाईन पद्धतीने हे व्याख्यान ऐकता येईल असं कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार यांनी सांगितलं.

***

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या माथला इथल्या शिवार सेवाभावी संस्थेचा २२ वा 'रूपाली दूधगावकर राष्ट्रीय पुरस्कार' प्रसिद्ध कवयित्री, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील यांना जाहीर झाला आहे. शिवार संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीधर भोंबे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सन्मानपत्र आणि २१ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या १२ जानेवारीला मुंबईत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

***

नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातल्या मुंढे गाव इथल्या जिंदाल पॉलिफिल्म कारखान्यात झालेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर संपूर्ण कारखान्याचं नूतनीकरण करून अग्नी प्रतिबंधक उपाययोजना केल्यानंतरच हा कारखाना सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं यासंदर्भात कारखान्याला तशी नोटीस बजावली असल्याचं, नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी सांगितलं. एक जानेवारीला जिंदाल कारखान्यात स्फोट होऊन दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला तर सतरा कामगार जखमी झाले होते.

***

महाराष्‍ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्‍थान असणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्‍यातल्या पाल इथल्या खंडोबा देवाची यात्रा उद्या सुरु होत आहे. उद्या सायंकाळी लाखो भाविकांच्‍या उपस्‍थितीत खंडोबा-म्‍हाळसा यांचा विवाह सोहळा होणार आहे. याच दिवशी वाई तालुक्‍यात मांढरदेव इथल्या काळूबाईची देखील यात्रा सुरु होत आहे. यात्रा कालावधीत मांढरदेव इथं पशुबळीस मनाई करण्‍यात आली आहे.

***

राज्य मिनी ऑलंपिक्स स्पर्धेकरता औरंगाबाद जिल्ह्याच्या हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांनी ही घोषणा केली. मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी आचल क्षीरसागर तर मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी इमरान शेख यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, या स्पर्धेच्या म्हाळुंगे बालेवाडी इथं काल दुसऱ्या दिवशी विविध क्रीडा प्रकारात कोल्हापूर संघानं आपलं वर्चस्व राखलं. कोल्हापूरची ऑलिम्पिकपटू नेमबाज तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या पुष्कराज इंगोले यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावलं. नागपुरात पार पडलेल्या स्पर्धेत बुहन्मुंबई आणि पुण्यानं बॅडमिंटन महिला सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठली.

//***********//

 

No comments:

Post a Comment