▼

Wednesday, 4 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 04.01.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  04 January  2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ जानेवारी २०२३   सायंकाळी ६.१०

****

·      वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा विचार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट-कर्मचाऱ्यांचा संप मागे.

·      शेतीच्या विविध योजनांसाठी इस्रोचं तंत्रज्ञान लाभदायक-संचालक एस सोमनाथ यांची माहिती.

·      साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांची मालमत्ता ईडीकडून जप्त.

आणि

·      पांगरी फटाका कारखाना स्फोट प्रकरणी कारखाना मालकाला अटक; चार दिवसांची पोलिस कोठडी.

****

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता संघर्ष समितीनं, पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या ३२ संघटनांसोबत आज बैठक घेतली. वीज कंपन्याचं खाजगीकरण करण्याचा राज्य सरकारचा कुठलाही विचार नसून, या कंपन्यामध्ये ५० हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले –

राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खाजगीकरण करायचं नाही. याउलट पुढच्या तीन वर्षांमध्ये पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ॲसेट्‌समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे. त्यामुळे त्याचं खाजगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही.

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मुंबईत आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार जगभर होण्यासह उद्योग कल्पनांच्या आदान-प्रदानासाठी जगभरातल्या मराठी भाषाप्रेमी आणि उद्योजकांसाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. मुंबईतला मराठी टक्का कमी होणार नाही, यासाठी आमचं सरकार प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –

मराठी मातीचा आणि मराठी संस्कृतीचा विचार नेहमीच विश्वाला कवेत घेत आलेला आहे. मुंबई-महाराष्ट्र मिळवण्यासाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिलं, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळे मुंबईत मराठी भाषेची, मराठी भाषिकांची पीछेहाट होणार नाही, मुंबईवर मराठी ठसा आणि मुंबईतला मराठी टक्का कायम रहावा यासाठी देखील आमचं सरकार याठिकाणी नेहमी प्रयत्न करतंय.

****

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का दिला जात नाही, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विचारला आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या विश्वमराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ते गोंदियात पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षात असताना भाजपकडून सतत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी केली जात होती. आता केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना मराठीला अभिजात दर्जा का दिला जात नाही, असं पटोले यांनी विचारलं.

****

पीक व्यवस्थापन तसंच नुकसान भरपाईसह इतर योजनांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोद्वारे विकसित तंत्रज्ञान लाभदायक असल्याचं, इस्रोचे संचालक एस सोमनाथ यांनी सांगितलं आहे. नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सुरू असलेल्या एकशे आठव्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सोमनाथ यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. अंतराळातले ८० टक्के उपग्रह कार्यरत नाहीत, त्यांची नोंद घेणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. गगनयान मिशनसाठी संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशा चाचण्या झाल्यानंतरच या संदर्भातील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सोमनाथ यांनी दिली.

****

शासकीय प्रसार माध्यमांमध्ये सुधारणांसाठी ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्क डेव्हलपमेंट स्कीम-BIND ला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. या योजनेद्वारे सरकारी प्रसार माध्यमांना प्रसारण, पायाभूत सुविधा आणि वृत्त सामग्री सुधारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. नवीन योजनेंतर्गत दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्र तसंच प्रसारण उपकरणांचे आधुनिकीकरण आणि डिजिटलीकरण केलं जाईल. यासाठी मंत्रिमंडळाने २०२५-२६ पर्यंत दोन हजार ५३९ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानासाठी १९ हजार ७४४ कोटी रुपयांना मंजुरी दिली असल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं. देशाला ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन, वापर आणि निर्यातीचे प्रमुख केंद्र बनवणं हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. याअंतर्गत दरवर्षी पन्नास लाख टन ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन केले जाईल यामुळे कार्बन उत्सर्जनात दरवर्षी पाच कोटी मेट्रिक टन कपात होईल, असंही ठाकूर यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ३१ जुलै रोजी घेतलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात इयत्ता पाचवीचे तेवीस पूर्णांक नव्वद टक्के विद्यार्थी, तर आठवीचे बारा पूर्णांक त्रेपन्न टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. सदर निकाल परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

****

सक्तवसूली संचालनालय ईडीने काळा पैसा वैध केल्या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांची १० कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. पर्यावरण मंत्रालयाने अनिल परब, साई रिसॉर्ट, सी शंख रिसॉर्ट आणि इतरांविरुद्ध दापोली न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.

****

छत्रपती संभाजी महाराजांबाबत आपण काहीही वादग्रस्त विधान केलेलं नाही असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे. संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते त्यांना धर्मवीर म्हणण्याची आवश्यकता नाही या पवार यांच्या विधानावर राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मात्र आपण आजही आपल्या विधानावर ठाम असल्याचं पवार यांनी सांगितलं.

****

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्यानं, त्यांना दिल्लीतल्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला काल रात्री अपघात झाला. यात मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला आहे. काल रात्री साडे बाराच्या सुमारास परळी शहरात वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं मुंडे यांनी सामाजिक माध्यमांवरून सांगितलं. पुढील उपचारासाठी मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

****

क्रिकेटपटू ऋषभ पंत याला आज दुपारी पुढील उपचारासाठी मुंबईला आणण्यात आलं आहे. गेल्या महिन्याच्या ३० तारखेला दिल्ली-डेहराडून महामार्गावर कार अपघातात जखमी झालेल्या क्रिकेटपटू पंतवर डेहराडून इथं रुग्णालयात उपचार सुरू होते.

****

सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातल्या पांगरी इथं फटाक्याच्या कारखान्याचा मालक युसूफ हाजू मणियार याला न्यायालयानं चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिराळे हद्दीतील मणियार याच्या फटाका कारखान्याला रविवारी आग लागून चार महिला जखमी झाल्या, तर दोन जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विनापरवाना बेकायदेशीर फटाक्याचे गोदाम तयार करून त्यात स्फोटकांचा साठा करून तिथे काम करणाऱ्या मजूरांच्या सुरक्षेबाबत जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केल्याप्रकरणी त्याच्यासह भागीदार पाटेकर यांच्याविरोधात पांगरी पोलिसांत सदोष मनुष्यवधासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

****

नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीनं ग्रामपंचायतींसाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवर चित्रपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत १५ जानेवारीपर्यंत तीन ते चार मिनिटांची चित्रफित तयार करून ती माय जीओव्ही पोर्टलवर अपलोड करावी, तसंच जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी यात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील राष्ट्रीय स्तरावरील विभागनिहाय तीन उत्कृष्ट चित्रपटांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि पाच लाख रुपये, तीन लाख रूपये आणि दोन लाख रूपयांची अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय रोख पारितोषिकं देण्यात येणार आहे.

****

राज्य मिनी ऑलिम्पिक्स स्पर्धेकरता औरंगाबाद जिल्ह्याच्या हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांनी ही घोषणा केली. मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी आंचल क्षीरसागर तर मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी इमरान शेख यांची निवड करण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment