▼

Wednesday, 4 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.01.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 January 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      विज्ञानाच्या प्रगतीत महिलांना सहभागी करून घेणं आवश्यक-शतकोत्तर आठव्या विज्ञान अधिवेशनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      अग्निवीरांना शिक्षण सुरु ठेवण्यासंदर्भात संरक्षण दलाचे विविध मंत्रालयांसोबत सामंजस्य करार

·      चित्रपटगृह मालकांना खाद्यपदार्थांबाबत सर्व निर्णयाचे अधिकार-सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्टीकरन

·      मार्डचा संप मागे तर वीज वितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू

·      विमुद्रीकरण हे आर्थिक हत्याकांड-शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा आरोप, तर विमुद्रीकरणावर टीका करणाऱ्यांनी देशाची माफी मागावी-भाजपची मागणी

·      थोर समाज सुधारक आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सर्वत्र विविध कार्यक्रमांतून अभिवादन

आणि

·      पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय

****

महिलांच्या सक्षमीकरणासह त्यांना विज्ञानाच्या प्रगतीत सहभागी करून घेणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शतकोत्तर आठव्या भारतीय विज्ञान अधिवेशनाचं उद्घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावर्षीच्या विज्ञान काँग्रेसची संकल्पना ‘महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ अशी आहे. पुढच्या २५ वर्षात भारत ज्या उंचीवर असेल, त्यात देशातल्या वैज्ञानिकांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

अग्निपथ योजना सशस्त्र दलांमध्ये आधुनिक बदल आणणारी योजना असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण, शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजगता मंत्रालयं आणि लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये सामंजस्य करार झाला, या कार्यक्रमात संरक्षण मंत्री दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. या कराराअंतर्गत सशस्त्र दलांमध्ये काम करताना अग्निवीरांना शिक्षण सुरु ठेवण्याची सुविधा मिळणार आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून बारावी आणि पदवी प्रमाणपत्र तसंच कौशल्य विकास प्रमाणपत्र देखील अग्निवीरांना प्राप्त करता येईल.

****

सरकारच्या विचाराधीन असलेल्या प्रकरणाबाबत एखाद्या मंत्र्यानं केलेलं वक्तव्य हे सरकारचं मत ठरू शकत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. लोकसेवकांच्या अभिव्यक्तीवर काही प्रतिबंध लावता येऊ शकतात का, या प्रश्नासंदर्भात बोलताना न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. सरकार ही सामुदायिक जबाबदारी आहे असं मान्य करूनही, एखाद्या मंत्र्याचं वक्तव्य हे त्याचं एकट्याचं मत असू शकतं, कोणत्याही नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रतिबंध लावला जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

****

खाद्यपदार्थ विक्रीबाबतच्या अटी-शर्ती ठरवण्याचे अधिकार चित्रपटगृहाच्या मालकांना असून, बाहेरील अन्नपदार्थ चित्रपटगृहात आणण्याबाबतचा निर्णयही तेच घेऊ शकतात, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. जुलै २०१८ मध्ये जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाने दिलेला, मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृहांनी प्रेक्षकांना त्यांच्याकडील अन्नपदार्थ आणि पाणी आत आणण्यास प्रतिबंध करू नये, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला. चित्रपटगृह हे खासगी संपत्ती असल्यानं, त्याला अटी आणि शर्ती लावण्याचा अधिकार आहे, मात्र त्या सार्वजनिक हित, सुरक्षा आणि समाजकल्याण याच्याविरोधात असू नयेत, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या पीठाने नमूद केलं.

****

दरम्यान सर्वोच्च न्यायालयात काल मध्यप्रदेशातल्या एका धर्मांतर प्रकरणी सुनावणी झाली, प्रत्येक धर्मांतर बेकायदा किंवा अवैध म्हणता येणार नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.

****

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, यू आय डी ए आय नं, कुटुंबप्रमुखाच्या परवानगीनं आधार कार्डवरचा आपला पत्ता ऑनलाईन अपडेट करू शकण्याची विशेष सुविधा सुरू केली आहे. कुटुंबप्रमुखासोबत नातं दर्शवणारा, शिधापत्रिका, गुणपत्रिका, विवाह प्रमाणपत्र यासारखा दस्तावेज सादर करून अर्जदाराला आपला आधारकार्डवरचा पत्ता ऑनलाईन अपडेट करता येईल.

****

पुणे जिल्ह्यातल्या चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं काल कर्करोगानं निधन झालं, ते ५९ वर्षांचे होते. जगताप हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनानं राजकीय क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.

****

राज्यातल्या निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड ने विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप काल मागे घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून संघटनेच्या मागण्यांबाबत तोडगा निघाला. महाजन यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले....

‘‘मी त्यांना शब्द दिलेला आहे की, आपण या दोन तीन दिवसांपासून माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावू. संबंधित अधिकाऱ्यांना बोलावू. तुमचे जे प्रश्न आहेत, निश्चित त्याबाबतीमध्ये सकारात्मक निर्णय आपण त्या ठिकाणी करून घेऊ. कुठेही डॉक्टरांची अव्यवस्था व्हावी किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे, असं कधी याठिकाणी होणार नाही, झालेलं नाही. परंतू खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज वसतीगृहांची, खोल्यांची गरज त्यांच्यासाठी आहे. परंतू ती आता तात्काळ कशी मार्गी लागेल लवकरात लवकर, त्यामुळे मिशन मोडमध्ये आम्ही हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि लवकरच हा प्रश्न आम्ही मार्गी लावू. आणि सर्व सकारात्मक चर्चा आमची याबाबतीत त्यांच्यासोबत झालेली आहे. आणि त्यांनी सुद्‌धा मान्य केलेलं आहे. आणि आपला संप जो आहे, हा त्यांनी मागे घेतलेला आहे.’’

****

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने राज्यात अडीच हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना चालना दिली असून, राज्यात ५४६ मेगावॅटचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यरत झाले आहेत. महावितरण कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली. ९० हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. याशिवाय सुमारे एक हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीच्या विविध प्रकल्पांच्या निर्मितीचं काम वेगवेगळ्या टप्प्यांवर सध्या सुरू असून, वर्षभरात हे प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित आहे.

****

कथित संभाव्य खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता संघर्ष समितीनं, मध्यरा‍त्रीपासून बहात्तर तासांचा संप पुकारला आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत, महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ३० संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरू ठेवू, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान, या संपाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या सगळ्या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेतली जात आहे. वीजपुरवठ्यासंदर्भात काही तक्रारी असल्यास मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या, एक नऊ एक दोन, या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधावा, असं महावितरणनं म्हटलं आहे.

****

विमुद्रीकरण हे आर्थिक हत्याकांड होतं, असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने याबाबत नुकताच चार विरुद्ध एक अशा मताने निर्णय सुनावला. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात राऊत यांनी हा आरोप केला. ते म्हणाले...

‘‘नोटबंदीनंतर जो उद्रेक झाला, मी हत्याकांड म्हणेन, हे आर्थिक हत्याकांड होतं या देशातलं. हजारो लोकं बँकाच्या रांगेत मरण पावले. नोटबंदीमुळे बेरोजगारी जी निर्माण झाली, त्याच्यामुळे लाखो लोकांनी रोजगार गमावला, लाखोंनी आत्महत्या केल्या. त्याच्यामुळे या आर्थिक हत्याकांडाला जबाबदार कोण याचं उत्तर न्यायालयानं दिलं नाही. नोटबंदी वैध कशी हा प्रश्न लोकांच्या मनात आहे. आणि म्हणून न्यायमूर्ती नागारत्ना यांनी जे रीसेंट नोट त्यांची जी आहे, चार आणि एक असं जे आहे, आम्ही त्या एकच्या बाजुने आहोत.’’

विमुद्रीकरणाची संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवल्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात सातत्याने मोहीम चालवणाऱ्या नेत्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपनं केली आहे. भाजपचे नेते विश्वास पाठक यांनी काल मुंबईत भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे बनावट चलन, काळा पैसा आणि कर चोरीला आळा बसला, रोखरहित व्यवहार वाढले, दहशतवाद्यांचा निधीपुरवठा तोडला गेल्याने काश्मीरमध्ये होणारी दगडफेक थांबली, आणि विमुद्रीकरणावेळी जगात ११ व्या स्थानावर असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली, या सगळ्या बदलांचं श्रेय विमुद्रकीरणालाच द्यावं लागेल, असंही विश्वास पाटील यांनी नमूद केलं.

****

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्र आज आणि उद्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज ते उस्मानाबाद तालुक्यातल्या वाघोली इथं केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. तर उद्या नळदुर्ग इथं, देशातले पहिले अशोक चक्र मिळालेले बचीन्तर सिंग यांना अभिवादन करणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या सहाव्या भागात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान या महिन्याच्या एकोणतीस तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा सत्त्याणवावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिक नमो ॲप किंवा मायजीओव्ही खुल्या मंचावरून आपली मतं आणि विचार मांडू शकतात.

****

देशातल्या पहिल्या शिक्षिका आणि थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमातून काल त्यांना अभिवादन करण्यात आलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात नायगाव या सावित्रीबाईंच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाला अभिवादन केलं, त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना, महापुरुषांच्या वास्तुंचं जतन करण्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं वास्तव्य असलेल्या पुण्यातल्या भिडे वाड्यात त्यांचं स्मारक उभारणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सहकार मंत्री अतुल सावे, मंत्री शंभुराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांनी सावित्रीबाईंना अभिवादन केलं.

मंत्रालयात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड सह सर्वच ठिकाणी सावित्रीबाईंना विविध कार्यक्रमातून आदरांजली अर्पण करण्यात आली.

****

राज्यात पहिली ते चौथीत शिकणाऱ्या पात्र लाभार्थी विद्यार्थिनींना नियमित शाळेत येण्यासाठी दिल्या जाणाऱ्या दैनंदिन एक रुपया प्रोत्साहनपर अनुदानात वाढ करून ते प्रतिदिन किमान २० रुपये करावं, अशी मागणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सादर केलं.

****

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं दोन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आहे. काल मुंबईत झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत वीस षटकांत पाच बाद १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला श्रीलंकेचा संघ विजयासाठी अखेरच्या चेंडूपर्यंत खेळूनही १६० धावांवर सर्वबाद झाला. सहा षटकार आणि एका चौकाराच्या सहाय्याने ४१ धावा करणारा दीपक हुडा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पदापर्णाच्या सामन्यात चार षटकांत २२ धावा देऊन चार बळी घेणारा भारताचा गोलंदाज शिवम मावी तसंच सामन्यात तीन षटकार आणि तीन चौकारांच्या सहाय्यानं सर्वाधिक ४५ धावा करणारा श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याचाही यावेळी गौरव करण्यात आला.

****

लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा व्हावा या मागणीसाठी उस्मानाबाद इथं काल सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजनही करण्यात आलं. महिलांच्या शिष्टमंडळानं, या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.

****

राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमात लातूर जिल्ह्यानं पहिला क्रमांक मिळवला आहे. या कार्यक्रमांतर्गत, घरोघरी जाऊन साथरोगासाठी सर्वेक्षण करणं, सगळ्या स्तरावरचे वैद्यकीय अधिकारी तसंच प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी आपली माहिती देणं, या तीनही स्तरांवर लातूर जिल्ह्यानं उत्तम काम केल्यामुळे या उपक्रमात राज्यातून लातूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे.

****

‘बालविवाहमुक्त परभणी‘ चळवळीत लोकसहभाग वाढावा, यासाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मान्यवरांच्या हस्ते चळवळीच्या बोधचिन्हाचं आणि घोषवाक्याचं अनावरण करण्यात येणार आहे.

****

तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात काल जलयात्रा मिरवणुकीचा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यानंतर भवानीमातेची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली. रात्री मंदिरात छबिना आणि प्रक्षाळपूजा झाल्यानंतर पाचव्या माळेच्या धार्मिक विधींची सांगता झाली.

****

नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज नांदेडहून तिच्या नियमित वेळी म्हणजे सकाळी साडेनऊला निघण्याच्या ऐवजी अडीच तास उशीरा, दुपारी बारा निघणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.

****

जैन समाजाचं पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर इथं काल सकल जैन समाजातर्फे मूकमोर्चा काढण्यात आला.

****

No comments:

Post a Comment