Friday, 6 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 05.01.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  05 January  2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ जानेवारी २०२   सायंकाळी ६.१०

****

·      प्रत्येकाच्या मनात जलजागरुकतेची ज्योत पेटवण्यासाठी अभिनव पद्धती शोधण्याचं पंतप्रधानांचं आवाहन.

·      ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोमुळे स्थानिक उद्योगांना जागतिक पातळीवर ओळख मिळणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

·      नळदूर्गच्या अलियाबाद पुलाचं राष्ट्रीय स्मारक तसंच हुतात्मा बचिंतरसिंग यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करणार-केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांचं आश्वासन.

आणि

·      मराठी पत्रकार परिषदेचे वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर.

****

प्रत्येक नागरिकाच्या मनात जलजागरुकतेची ज्योत पेटवणं अनिवार्य झालं असून, त्यासाठी अभिनव पद्धती शोधण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भोपाळ इथं पहिल्या दोन दिवसीय अखिल भारतीय जल परिषदेचं उद्घाटन आज झालं, त्यावेळी पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केलं. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी जल जीवन अभियान हे राज्याच्या विकासाचे प्रमुख मापदंड असून, नागरीक, सामाजिक संघटनांनी जलसंधारणाशी संबंधित मोहिमांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पाणी बचतीसाठी केंद्र सरकारने अटल भूजल संरक्षण योजना सुरु केली असून, या योजनेला आणखी व्यापक करण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले.

****

ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल, शिवाय स्थानिक उद्योगांना जागतिक पातळीवर ओळख मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद इथं ऑरिक या औद्योगिक नगरीत आज या प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारोहात मुख्यमंत्री दूरदृश्यसंवाद यंत्रणेच्या माध्यमातून बोलत होते. ते म्हणाले –

वस्तूंची मागणी, रोजगार निर्मिती आणि उत्पादन या तिन्ही बाबत राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. याला सरकारचं उद्योगपूरक धोरणदेखील कारणीभूत आहे. या प्रदर्शनामुळे केवळ करोडो रुपयांची उलाढाल होणार नाही, तर स्थानिक उद्योगांना देशात आणि देशाबाहेरही ओळख मिळवण्यास मदत होईल, असा विश्वास मला वाटतो.

केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी या वेळी बोलताना, देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचं लक्ष्य गाठण्यात एमएसएमईची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

मी एम एस एम ई बद्दल थोडंसं बोलणार आहे. कारण उद्योग हा अत्यंत महत्वाचा आहे. उद्योगांमुळे उत्पन्न वाढतं. देशाच्या तीस टक्के जीडीपी हा एम एस एम ई मुळे आहे. त्याचबरोबर जॉब क्रियेशनमध्ये एम एस एम ई महत्वाची आहे. सहा करोड जॉब एम एस इम ई मुळे मिळतात. आणि आपल्या देशाची फाईव्ह ट्रिलिलन जर बनवायची असेल तर एम एस एम ई चा अत्यंत महत्वाचा रोल असणार आहे.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलेल्या भाषणात लघु उद्योजकांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जातील, असं आश्वासन देत, विकासाच्या बाबतीत मराठवाडा मागे राहणार नाही, असं नमूद केलं. हे प्रदर्शन राज्यातल्या इतर शहरातूनही भरवलं जावं, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. ते म्हणाले –

तुमच्या शक्य असलेल्या सगळ्या मागण्या या शिंदे-फडणवीस सरकारकडनं मान्य केल्या जातील. या मराठवाड्याच्या भूमीतनं, या एक्स्पोमधनं अनेक उद्योजक निर्माण होऊ शकतात एवढी ताकत या एक्स्पोमध्ये आहे. आणि म्हणून हे मुंबईला झालं पाहिजे, पुण्याला झालं पाहिजे, नागपुरला देखील झालं पाहिजे, आमच्या कोकणामध्ये झालं पाहिजे. आणि नक्की उद्योग विभाग काय आहे, कशा पद्धतीनं इंडस्ट्री चालते, हे ग्रामीण भागातल्या उद्योजकांना देखील कळलं पाहिजे.

तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातल्या विविध शहरांमधून साडे सहाशेपेक्षा अधिक उद्योजकांनी आपापले स्टॉल उभारले आहेत.

****

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई शहर भेटीवर असून त्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी झालेल्या संभाषणात योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या इथं महाराष्ट्र भवन उभारण्यास जागा देण्याची तयारी दर्शवली. आदित्यनाथ यांनी राजभवनात असलेल्या क्रांतिगाथा या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली तसंच संग्रहालयात असलेल्या शिवरायांच्या स्मारकाला अभिवादन केलं. संग्रहालयातील सर्व क्रांतिकारकांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

****

महाराष्ट्रातली गुंतवणूक भाजपशासित उत्तर प्रदेशात पाठवण्याचा सध्याच्या सरकारचा कुटील डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भाजपशासित राज्यातील गुंतवणूक वाढावी आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी व्हावं यासाठीच महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं, असा आरोपही पटोले यांनी केला. मुंबईत चित्रपटसृष्टीशी संबंधित उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याच्या प्रयत्नांना राज्य सरकार मदत करत असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. 

****

लव्ह जिहाद विरुद्ध भाजप शासित राज्यात करण्यात येत असलेले कायदे हे घटनेतील हक्काचे उल्लंघन करणारे असल्याने बेकायदेशीर आहेत असा दावा ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन एमआयएमचे नेते असुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. सध्या देशपातळीवर लव्ह जिहाद विरुध्द कायदा करण्यासाठी काढण्यात येणारे मोर्चे कायदेशीर नसल्याचं ते यावेळी म्हणाले. तसंच देशात लव्ह जिहाद पेक्षाही बेरोजगारी-महागाई असे अनेक प्रश्न असून सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्याचा साक्षीदार असलेल्या नळदूर्ग इथल्या ऐतिहासिक अलियाबाद पुलाला राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता मिळावी, तसंच या पुलाच्या रक्षणासाठी हुतात्मा झालेले सैनिक बचिंतरसिंग यांचं याठिकाणी भव्य स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे. ते आज उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग इथल्या अलियाबाद पुलाला भेट दिल्यानंतर बोलत होते. याचबरोबर त्यांनी हुतात्मा सैनिक बचिंतरसिंग यांच्या प्रतिमेचं पूजन करुन त्यांना अभिवादन केलं.

****

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर निश्चित तोडगा निघेल, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांनी वर्तवला आहे. सोलापूर इथं ते पत्रकारांशी बोलत होते. आगामी काळात देशात समान नागरी कायदा येणार असल्याचं सूतोवाचही त्यांनी यावेळी केलं. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याकडे जुन्या विषयांवर भाष्य करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाटीप्पणी करण्याशिवाय दुसरं काही काम नसल्याची टीका मंत्री मिश्रा यांनी केली. काँग्रेसमुक्त भारत हे फक्त भाजपचं नव्हे तर जनतेचं अभियान असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात औरंगाबाद विभागातील पैठण, लातूर विभागातल्या औंढा नागनाथ यासह मोहाडी, धामणगाव, अमळनेर, जत, महाड, पुरंदर हे तालुका पत्रकार संघ मानकरी ठरले आहेत. स्मृतीचिन्ह, आणि मानपत्र, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा लातूर जिल्ह्यात चाकूर इथं लवकरच होणार असल्याचं, परिषदेकडून सांगण्यात आलं आहे.

****

शांकंभरी नवरात्र महोत्सवातील आजच्या सातव्या माळेनिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. तसंच आज दुपारी शतचंडी होमहवनला आरंभ झाला त्यानंतर दुर्गासप्तशती पठणाचा कार्यक्रम झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

****

औरंगाबाद महानगरपालिकेतल्या सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानदा कुलकर्णी यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं, त्या ६८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी औरंगाबाद इथं प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत आहेत.

****

औरंगाबाद इथल्या एन्व्हार्यमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अकॅडेमी आणि एमआयटी संस्थेच्या वतीनं उद्यापासून नवव्या पक्षी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या तीन दिवसीय महोत्सवाचं उद्धाटन उद्या सकाळी अकरा वाजता एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. या पक्षी महोत्सवाअंतर्गत परवा सात तारखेला सुखना धरण परिसरात पक्षी निरीक्षण तर आठ जानेवारीला जायकवाडी पक्षी अभारण्यात पक्षी निरीक्षण होणार असल्याची माहिती आयोजक डॉ.दिलीप यार्दी यांनी दिली आहे.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज पुण्यात खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत परवा मुंबईत झालेला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.

****

No comments:

Post a Comment