Friday, 6 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 06.01.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  06 January  2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ जानेवारी २०२   सायंकाळी ६.१०

****

·      महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी जगभरातल्या मराठी माणसांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन.

·      दर्पण दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन.

·      वृक्ष लागवडीतून पक्ष्यांचं अधिवास क्षेत्र वाढवण्याची गरज पर्यावरण तज्ज्ञ विजय दिवाण यांच्याकडून व्यक्त; औरंगाबाद इथं नवव्या पक्षी महोत्सवाला प्रारंभ.

आणि

·      जालना-औरंगाबादसह अनेक शहरांतून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना जालना पोलिसांकडून अटक.

****

महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी जगातल्या मराठी माणसांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. मुंबईत वरळी इथं मराठी तितुका मेळवावा या पहिल्या विश्व मराठी संमेलनातील कार्यक्रमात ते आज बोलत होते. आत्मनिर्भर भारत निर्माणा सोबतच शक्तिशाली अर्थव्यवस्था निर्माण करण्यात विदेशात असलेल्या भारतीयांचं योगदान मोठं असल्याचं सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी राज्यात गुंतवणूक करुन उद्योजकता वाढवणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तसंच राज्य सरकारनं विविध क्षेत्रांचा अभ्यास करून त्यांच्या विकासासाठी कालबद्ध नियोजन करावं असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, मराठी भाषा आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसी अंतर्गत देशात विद्यालयांना शुल्क रचना आणि प्रवेश प्रक्रिया ठरवण्याची मुभा असेल असं युजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी सांगितलं आहे आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, युजीसीनं भारतात परदेशी उच्च शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि विनियम २०२३ साठीच्या तरतुदी तयार केल्या आहेत. यामध्ये विविध पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भारतातील परदेशी विद्यापीठांच्या संस्थांच्या प्रवेशाचे आणि कामकाजाचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. यावर येत्या १८ तारखेपर्यंत सूचना आणि अभिप्राय देता येतील, असं आयोगानं कळवलं आहे.

****

राज्याच्या शाश्वत विकासात पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज मुंबईत पत्रकारिता पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. समाजात अंमली पदार्थांचा वाढता वापर, दहशतवाद, रोजगार, बदललेल्या कुटुंब व्यवस्था या समस्यांचा वेध घेऊन माध्यमांनी वस्तुनिष्ठ आणि मार्गदर्शक भूमिका मांडायला हवी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

दर्पण दिन आज साजरा होत आहे. पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या मराठी भाषेतल्या पहिल्या वृत्तपत्राच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन केलं असून, पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पत्रकारितेने समाजाला दिशा देण्याचं काम केलं, असं भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी म्हटलं आहे. दर्पण दिनानिमित्तानं मुंबईत भाजप कार्यालयात पत्रकार गौरव सोहळ्यात लोणीकर बोलत होते. दर्पण दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात युवा मोर्चाच्या वतीने आज चार हजारावर पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.

राज्यभरात ठिकठिकाणी दर्पण दिनानिमित्त जांभेकरांना अभिवादनासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. सिंधुदुर्ग इथं आकाशवाणीचे वार्ताहर निलेश जोशी यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लातूर जिल्हा माहिती कार्यालयात माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांच्या हस्ते जांभेकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली, तर बीड इथं माहिती अधिकारी किरण वाघ यांनी तर परभणी इथं माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

लम्पी त्वचा रोगावर प्रतिबंधक लसीचं उत्पादन पुण्यात होणार आहे. केंद्रीय संस्थांनी विकसित केलेल्या या लसीचं तंत्रज्ञान पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आलं आहे. ‘लम्पी प्रोव्हॅक’ असं या लसीचं नाव असेल, या लसीचं १० वर्षे व्यावसायिक उत्पादन घेण्याचे अधिकार महाराष्ट्राला मिळाले आहेत.

****

सोमय्या कुटुंबियांवर शौचालय घोटाळ्याचा आरोप केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं, मात्र राऊत शिवडी न्यायालयासमोर हजर झाले. त्यामुळे हे अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आलं. या प्रकरणी शिवडी न्यायालयात २४ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

****

देशातील महिलांनी स्वबळावर विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे, त्यामुळे आता त्यांच्या कर्तृत्वावर चर्चा व्हावी, असं आवाहन कोलकाता इथल्या भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या संचालक डॉ.द्रिती बॅनर्जी यांनी केलं आहे. नागपुरात भारतीय विज्ञान काँग्रेसध्ये घेण्यात आलेल्या महिला विज्ञान काँग्रेसच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.

दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं मत सीएसआयआरचे माजी संचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केलं. भारतीय विज्ञान काँग्रेस मध्ये विज्ञान आणि समाज या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन हे शून्यावर आणण्यासाठी भारतानं शर्थीचे प्रयत्न सुरु केले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यासाठी पर्यायी उर्जा स्त्रोत निर्माण करणं, तसंच पर्यावरणपूरक यंत्रणा निर्मिती करणं अशा दोन्ही पर्यायांवर सध्या कामं सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या सहाव्या भागात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान या महिन्याच्या एकोणतीस तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा सत्त्याणवावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिक नमो ॲप किंवा मायजीओव्ही खुल्या मंचावरून आपली मतं आणि विचार मांडू शकतात.

****

पक्षी संवर्धनासाठी वृक्ष लागवड करुन पक्ष्यांचं अधिवास क्षेत्र वाढवण्याची गरज पर्यावरण तज्ज्ञ विजय दिवाण यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद इथं एन्व्हार्यमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अकॅडेमी आणि एमआयटी संस्थेच्या वतीनं नवव्या पक्षी महोत्सवाला आज मान्यवरांच्या हस्ते पृथ्वी पूजनाने प्रारंभ झाला, त्यावेळी दिवाण बोलत होते. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ.दिलीप यार्दी यांनी आपल्या भाषणात पक्षी निरीक्षण हा चैनीचा नव्हे तर अभ्यासाचा विषय असल्याचं सांगितलं. औरंगाबाद शहरात ३० लाख झाडांची आवश्यकता असून सर्वेक्षणात फक्त चार लाख झाडं निदर्शनास आल्याचं यार्दी यांनी सांगितलं. या तीन दिवसीय पक्षी महोत्सवाअंतर्गत उद्या सात तारखेला सुखना धरण परिसरात तर आठ जानेवारीला जायकवाडी पक्षी अभारण्यात सकाळी सहा ते नऊ या वेळेत पक्षी निरीक्षण होणार असल्याची माहिती डॉ. यार्दी यांनी यावेळी दिली.

****

जालना आणि औरंगाबाद सह अनेक शहरांतून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना जालना पोलिसांनी अटक केली आहे. शेख मोहसीन आणि मुस्ताक आरेफ अशी या दोघांची नावं आहेत. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी बारा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

****

औरंगाबाद इथं आज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसदर्भात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, किमान वेतन भत्ता, विशेष महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी, व्यावसायिक कर, राज्य कामगार विमा, साप्ताहिक सुट्टी, बोनस, सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला आदी मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलं.

****

लातूर शहरात १९ ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. नागरिकांनी दुसरा डोस तसंच खबरदारीचा तिसरा डोस घ्यावा, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद इथं मोबाईल मध्ये महावितरण ॲप डाऊनलोड करण्याऱ्यांची संख्या ५० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली.हे ॲप वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या २८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. या ॲपमुळं ग्राहकांना नवीन वीज जोडणी घेणं, वीज बील भरणं आदी सुविधा सहजपणे उपलब्ध होत आहेत. मागील वर्षी या ॲपच्या माध्यमातून १५८ कोटी रुपयांची वीजबीलं भरण्यात आली आहेत.

****

दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या ९२ वाव्या जयंतीनिमित्त आज औरंगाबाद इथं ममता दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मीना ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

No comments:

Post a Comment