▼

Thursday, 5 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.01.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 January 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      औरंगाबाद इथं आजपासून ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोला प्रारंभ

·      शेतीच्या विविध योजनांसाठी इस्रोचं तंत्रज्ञान लाभदायक-संचालक एस सोमनाथ यांची माहिती

·      मुंबईतला मराठी टक्का कमी होऊ देणार नाही-विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा विचार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट-संप मागे

·      साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

·      उस्मानाबाद जिल्ह्यात भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची मागणी

आणि

·      उत्तरेकडील थंड वारे दाखल झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

****

औरंगाबाद इथं आजपासून ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोला प्रारंभ होत आहे. शेंद्रा इथल्या ऑरिक सिटीत येत्या आठ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. मराठवाडा आणि औरंगाबादसह ऑरिकचा औद्योगिकदृष्ट्या जागतिक पातळीवर प्रचार करण्यासाठी, राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर - मासिआ यांच्या वतीनं, या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या एक्स्पोमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उद्योजक सहभागी होणार असून, विविध विषयांवरच्या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यासाठी १९ हजार ७४४ कोटी रुपये निधीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. शासकीय प्रसार माध्यमांमध्ये सुधारणांसाठी ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्क डेव्हलपमेंट स्कीम - BIND ला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या योजनेद्वारे सरकारी प्रसार माध्यमांना प्रसारण, पायाभूत सुविधा आणि वृत्त सामग्री सुधारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल, असं ठाकूर यांनी सांगितलं. यासाठी मंत्रिमंडळाने २०२५-२६ पर्यंत दोन हजार ५३९ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे.

****

पीक व्यवस्थापन तसंच नुकसान भरपाईसह इतर योजनांमध्ये, भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोद्वारे विकसित तंत्रज्ञान लाभदायक असल्याचं, इस्रोचे संचालक एस सोमनाथ यांनी सांगितलं आहे. नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सुरू असलेल्या, एकशे आठव्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सोमनाथ यांनी, पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. अंतराळातले ८० टक्के उपग्रह कार्यरत नाहीत, त्यांची नोंद घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. गगनयान मिशनसाठी संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशा चाचण्या झाल्यानंतरच या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सोमनाथ यांनी दिली.

****

आजची बालकं उद्याची ‘यंग सायंटिफीक ब्रिगेड’ असून, या बालकांमधली जिज्ञासा आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय विज्ञान काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचं, भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॅा.विजयलक्ष्मी सक्सेना यांनी सांगितलं आहे. भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये राष्ट्रीय बाल शास्त्रज्ञ संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. १० ते १७ वर्षे वयोगटातल्या बालवैज्ञानिकांनी यावेळी विविध प्रयोग सादर केले.

****

विज्ञान काँग्रेसमध्ये काल दुसऱ्या दिवशी ‘हृदयविकार आणि मधुमेह या विषयातील नवीन संशोधन’ याविषयावर चर्चासत्र झालं. डॉ शंतनू सेनगुप्ता यांनी यावेळी बोलताना, नव्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या हृदयविकार आणि मधुमेह, या विकारांमध्ये नव्यानं झालेल्या संशोधनातून, नवीन घातक घटक निदर्शनास आलं आहे, हे घटक वेळीच ओळखून रुग्णांनी आपला बचाव करावा, असं आवाहन केलं.

****

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मुंबईत विश्व मराठी संमेलन घेण्यात आलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या तीन दिवसीय संमेलनाचं उद्घाटन झालं. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार जगभर होण्यासह, उद्योग कल्पनांच्या आदान-प्रदानासाठी जगभरातल्या मराठी भाषाप्रेमी आणि उद्योजकांसाठी, हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. मुंबईतला मराठी टक्का कमी होणार नाही, यासाठी आमचं सरकार प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

“मराठी मातीचा आणि मराठी संस्कृतीचा विचार नेहमीच विश्वाला कवेत घेत आलेला आहे. मुंबई-महाराष्ट्र मिळवण्यासाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिलं, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळे मुंबईत मराठी भाषेची, मराठी भाषिकांची पिछेहाट होणार नाही, मुंबईवर मराठी ठसा आणि मुंबईतला मराठी टक्का कायम रहावा यासाठी देखील आमचं सरकार याठिकाणी नेहमी प्रयत्न करतंय.’’

विश्व मराठी संमेलनाला राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातल्या नव्या शहरांमध्ये हे संमेलन भरवण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

परदेशातल्या ४९८ मराठी मंडळांचे प्रतिनिधी, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ४७० प्रतिनिधी, तसंच १६४ नामवंत साहित्यिक, या संमेलनात सहभागी झाले आहेत. मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या जात्यावरच्या ओव्या, लेझीम पथक, मराठी वेशभुषा, रांगोळीने सजलेले तुळशी वृंदावन, पुस्तक विक्रीसाठी वेगवेगळी दालनं, तसंच महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ही या संमेलनाची ठळक वैशिष्ट्यं आहे.

****

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता संघर्ष समितीनं, पुकारलेला संप काल मागे घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या ३२ संघटनांसोबत काल बैठक घेतली. वीज कंपन्याचं खाजगीकरण करण्याचा राज्य सरकारचा कुठलाही विचार नसून, या कंपन्यामध्ये ५० हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...

“राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खाजगीकरण करायचं नाही. याउलट पुढच्या तीन वर्षामध्ये पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ॲसेट्‌समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे. त्यामुळे त्याचं खाजगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही.’’

वीज कर्मचारी आणि अधिकारी कृती समितीचे पदाधिकारी संजय ठाकूर यांनी राज्यशासनाच्या आश्वासनानंतर संप मागे घेत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले...

“तुमचं जे प्रोपोजल आहे, ते प्रपोजल द्या. त्याच्यामध्ये कुठलंही इंटेशन ज्याच्या अनुषंगाने कुठलंही प्रायव्हटाजेशन होईल, कुठलंही प्रायव्हटायजेशन प्रोमोट करायची अशा प्रकारची भूमिका अजिबात राज्य शासनाची अशी भूमिका साहेबांनी सांगितलेली आहे. आणि अशा प्रकारची भूमिका असल्यानंतर आम्हीसुद्धा, सर्व बत्तीस संघटना असतील, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या संघटना असतील यांनी या ठिकाणी विचारविनीमय केला. आणि साहेबांनी जाहीररीत्या इथं जे निर्णय घेतले, त्या निर्णयाच्या बाबतीत आम्हीसुद्धा पॉझिटीव्ह निर्णय घेऊन हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतोय.’’

****

पीपल्स रिपब्लिकन पार्टीने बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत युती करण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजी महाराजांबाबत आपण काहीही वादग्रस्त विधान केलेलं नाही, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणण्याची आवश्यकता नाही, असं पवार यांनी म्हटलं होतं, त्या विधानावर राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मात्र आपण आजही आपल्या विधानावर ठाम असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी रात्री परळीत अपघात झाला. यात मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला आहे. वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं मुंडे यांनी सामाजिक माध्यमांवरून सांगितलं. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

क्रिकेटपटू ऋषभ पंत याला काल मुंबईत कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आणण्यात आलं. गेल्या महिन्याच्या ३० तारखेला दिल्ली-डेहराडून महामार्गावर कार अपघातात जखमी झालेल्या पंतवर डेहराडून इथं रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला झालेल्या इतर जखमा भरल्या असून त्याची प्रकृतीही स्थिर असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुंबईत त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

****

सक्तवसूली संचालनालय - ईडीने काळा पैसा वैध केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांची, १० कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. पर्यावरण मंत्रालयाने अनिल परब, साई रिसॉर्ट, सी शंख रिसॉर्ट आणि इतरांविरुद्ध दापोली न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.

****

सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातल्या पांगरी इथं फटाक्याच्या कारखान्याचा मालक युसूफ मणियार याला न्यायालयानं, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिराळे हद्दीत असलेल्या मणियार याच्या फटाका कारखान्याला रविवारी आग लागून चार महिला जखमी झाल्या, तर दोन जणांचा मृत्यू झाला.

****

उस्मानाबादचं धाराशिव नामांतर करण्यावर केंद्र सरकार लवकरच शिक्कामोर्तब करेल, असं केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी सांगितलं आहे. ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘सबका साथ सबका विकास सबका प्रयास’यावर आधारित देशाच्या प्रगतीसाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता मिश्रा यांनी व्यक्त केली. भाजप कार्यकर्त्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केलं.

उस्मानाबाद जिल्ह्यात भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची मागणी, जिल्ह्यातल्या एकविध क्रीडा संघटनेच्या वतीनं भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी राज्यमंत्री मिश्रा यांच्याकडे केली आहे. मिश्रा यांनी काल उस्मानाबाद इथं राष्ट्रीय खो खो पटू निकिता पवार यांच्या घरी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी डॉ जाधव यांनी या मागणीचं निवेदन मंत्र्यांना सादर केलं.

****

उत्तरेकडील थंड वारे दाखल झाल्याने राज्यातल्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात घटच अपेक्षित असल्याची माहिती महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. दरम्यान, औरंगाबादमध्ये काल ११ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.

****

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन पुणे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. काल स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योतीच्या रॅलीचं काल पुण्याच्या एस एस पी एम एस महाविद्यालयाच्या प्रागंणात आगमन झालं. मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे या आठही जिल्ह्यातून आलेल्या क्रीडाज्योती आज एकत्र येऊन महाविद्यालयाच्या प्रागंणात सकाळी दहा वाजता मुख्य क्रीडाज्योत रॅलीला सुरूवात होईल. 

****

दरम्यान, राज्य मिनी ऑलंपिक्स स्पर्धेकरता औरंगाबाद जिल्ह्याच्या हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांनी ही घोषणा केली. मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी आंचल क्षीरसागर तर मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी इमरान शेख यांची निवड करण्यात आली आहे.

****

श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत दुसरा सामना आज पुण्यात खेळला जाणार आहे. सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत परवा मुंबईत झालेला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.

या सामन्यात उमरान मलिकने १५५ किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजीचा नवा विक्रम केला. या विक्रमामुळे तो भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे संजू सॅमसन या मालिकेत खेळू शकणार नाही, त्याच्या ऐवजी जीतेश शर्मा याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याची सूचना, लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिले आहेत. काल नांदेड इथं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या कायद्याच्या अंतर्गत शासकीय पातळीवरून दिल्या जाणाऱ्या सेवा अधिसूचित केलेल्या आहेत. तालुका पातळीवरील सर्व यंत्रणानी या सेवा देतांना प्रकरणं प्रलंबित राहणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं शिंदे यांनी सांगितलं.

****

सर्वसामान्य नागरिकांना नदीसाक्षर बनवण्यासह मांजरा नदीचं प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या जाणार आहेत, अशी माहिती, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे. ‘चला जाणुया नदीला उपक्रमांतर्गत, जिल्ह्यात ११ जानेवारीपासून मांजरा नदी जलसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून जलसाक्षरता, स्वच्छताविषयी जनजागृती करण्यासह विविध सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

****

औरंगाबाद इथं मोबाइल फोनचं बनावट साहित्य विकणाऱ्या पाच दुकानांवर पोलिसांनी काल कारवाई केली. पुण्यातल्या एका कंपनी मालकाने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. या पाचही दुकानातून मोबाईल फोनच्या कव्हरसह सुमारे पाच लाखाहून अधिक किंमतीचं बनावट साहित्य जप्त करण्यात आलं.

****

No comments:

Post a Comment