Thursday, 5 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.01.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०५ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जलसंरक्षणाच्या अभियानात नागरीक, सामाजिक संघटनांना देखील जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भोपाळ इथं पहिल्या दोन दिवसीय अखिल भारतीय जल परिषदेचं उद्घाटन आज झालं, त्यावेळी पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केलं. या परिषदेत जल प्रशासन या विषयावरील एका महत्त्वपूर्ण सत्राचं अध्यक्षस्थान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूषवणार आहेत. जलशक्ती मंत्रालयातर्फे आयोजित या परिषदेची संकल्पना वॉटर व्हिजन @2047 अशी आहे.

****

केंद्र सरकार आणि जागतिक बॅंकेच्या सहकार्याने राज्यातल्या १३ जिल्ह्यांतल्या एक हजार ४३३ गावांमध्ये, अटल भूजल योजना राबवण्यात येणार आहे. राज्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्त चिंतामणी जोशी यांनी ही माहिती दिली. येत्या काळात पडणाऱ्या पावसाचा थेंब अन् थेंब जमिनीत जिरवण्यासाठी गावागावांत लोकसहभागातून प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

औरंगाबाद इथं आजपासून ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोला प्रारंभ होत आहे. शेंद्रा इथल्या ऑरिक सिटीत येत्या आठ तारखेपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. मराठवाडा आणि औरंगाबादसह ऑरिकचा औद्योगिकदृष्ट्या जागतिक पातळीवर प्रचार करण्यासाठी, राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर - मासिआ यांच्या वतीनं, या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता, अशा काही माध्यमांनी दिलेल्या वृत्ताचं केंद्र सरकरानं खंडन केलं आहे. यासंदर्भातल्या बातम्या या एका खासगी कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणावर आधारीत आहे, या सर्वेक्षणाची पद्धत वैज्ञानिक नाही, तसंच त्यांची पद्धत आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त निकषांना धरून नाही असं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ३१ जुलै रोजी घेतलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल काल जाहीर झाला. निकाल परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

//*********//

No comments:

Post a Comment