Friday, 6 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.01.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 January 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमध्ये सुरु असलेल्या राज्यांच्या मुख्य सचिवांच्या दुसर्या राष्ट्रीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. तीन दिवसीय हे संमेलन काल सुरु झालं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातल्या भागीदारीला अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं हे एक पाऊल आहे. या बैठकीत, राज्यांच्या सहभागाने वेगवान आणि शाश्वत आर्थिक विकास साधण्याविषयी चिंतन केलं जात आहे.

****

दर्पण दिन आज साजरा होत आहे. पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या मराठी भाषेतल्य पहिल्या वृत्तपत्राच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन केलं असून, पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

नाशिक मधल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या ५० पदाधिकार्यांनी आज बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत केलं. मागच्या सहा महिन्यात राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आमचं काम लोकांना आवडला असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून नवीन संकल्पना आणि नावीन्यता यावर विशेष लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल राज्यातल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना काही अडचणी येऊ शकतात. मात्र गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचं नियोजन करावं, विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा, सं आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचं परीक्षा वेळापत्रक, परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करणं, सीईटी प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणं, यासाठी सर्व विद्यापीठांनी नियोजन करावं, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या.

****

शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्त्वाचा आहे, तसंच शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणं आवश्यक आहे, असं भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या कोलकाता इथल्या केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेचे संचालक, डॉ. बसंत कुमार दास यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं भारतीय विज्ञान अधिवेशनात, शेतकरी विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्यासाठी यंदा पहिल्यांदाच शेतकरी विज्ञान काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. देश, परदेशातले शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन करतील आणि त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल असं अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी यावेळी सांगीतलं. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या, बीज माता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा भारतीय विज्ञान काँग्रेसच्या वतीनं सत्कार करण्यात आला.

****

विद्यापीठ अनुदान आयोग - युजीसीने भारतातील परदेशी उच्च शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि विनियम २०२३ च्या तरतुदी तयार केल्या आहे. यामध्ये विविध पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भारतातील परदेशी विद्यापीठांच्या संस्थांच्या प्रवेशाचे आणि कामकाजाचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. यावर येत्या १८ तारखेपर्यंत सूचना आणि अभिप्राय देता येतील, असं आयोगानं कळवलं आहे.

****

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या खाजगीकरणाच्या यादीबाबत निती आयोगाच्या नावावरचा बनावट संदेश सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही यादी प्रसिद्ध केली नसल्याचं आयोगाडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या सहाव्या भागात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान या महिन्याच्या एकोणतीस तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा सत्त्याणवावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिक नमो ॲप किंवा मायजीओव्ही खुल्या मंचावरून आपली मतं आणि विचार मांडू शकतात.

****

परभणीत मांजाच्या खरेदी-विक्री आणि साठा करणाऱ्या दुकानदारांविरुध्द जिल्हा पोलिस यंत्रणा विशेष मोहिम राबवणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक आर. रागसुधा यांनी या मोहिमेकरीता पथकं स्थापन केली असून यासंबंधी दोषी आढळण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.

 

//**********//

No comments:

Post a Comment