Friday, 27 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.01.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  27 January  2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ जानेवारी २०२३    सायंकाळी ६.१०

****

·      आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेचं, कामाचं योग्य नियोजन, एकाग्रता महत्वाची - पंतप्रधान नरेंद्र मोदी.

·      विषय आशयघन आणि प्रभावशाली असेल तर चित्रपट देशाच्या सीमापार प्रेक्षकांपर्यंत जातो- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचं मत.

·      जिल्हाध्यक्षाच्या राजीनाम्यानंतर अहमदनगर काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त.

·      ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झाला उपविजेतेपद.

·      एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल.

आणि

·      भारत-न्यूझीलंड दरम्यान रांचीत आज सात वाजता पहिला टी-ट्वेंटी क्रिकेट सामना.

****

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेचं, कामाचं योग्य नियोजन, एकाग्रता महत्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि त्यांच्या शंकांचं निरसन केलं.

कोणतंही काम करताना त्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक असल्याचं सांगताना पंतप्रधान म्हणाले –

अगर माँ की गतीविधीओं को ढंगसे ऑब्जर्व करोगे तो भी आपको एज ए स्टूडंट अपना टाईम मॅनेजमेंट का महत्व क्या होता है और टाईम मॅनेजमेंट माने दो घंटे, चार घंटे, तीन घंटे यह नहीं। मायक्रो मॅनेजमेंट चाहीए। किस विषय को कितना टाईम देना है, किस काम को कितना टाईम देना है और इतना बंधन भी नहीं डालने है की बस छह दिन तक यह करुंगाही नहीं, क्यूंकी मुझे पढना है। वरना आप थक जाओगे आप ढंगसे उसको डिस्ट्रीब्यूट किजिए समय को।

 

परीक्षा ही आयुष्यभर सुरु राहणार आहे, त्यामुळे एका परीक्षेत नक्कल करुन पास जरी झाले, तरीही आयुष्यभर नक्कल नाही चालणार. त्याउलट मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना कधीच अपयश येणार नाही, असं पंतप्रधान म्हणाले. स्मार्टली हार्ड वर्क म्हणजेच योग्य नियोजन करुन काम केल्यास नक्कीच यश मिळेल, असं त्यांनी सांगितलं.

पालकांनी आपल्या पाल्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, मात्र या अपेक्षा सामाजिक दबावाखाली ठेवल्या जात असतील, तर ते योग्य नाही, असं पंतप्रधान म्हणाले. पालकांच्या अपेक्षांना विद्यार्थ्यांनी आपली क्षमता आणि दृढ निश्चयाची जोड द्यावी, असं त्यांनी सांगितलं. परीक्षा हे जीवनाचं अंतिम ध्येय नाही, हे लक्षात ठेवून परीक्षेला सामोरं जावं, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर इथून परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात आभासी पद्धतीनं सहभागी झाले होते.

औरंगाबाद इथं होली क्रॉस शाळेत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे उपस्थित होते.

****

चित्रपट क्षेत्रात प्रांतीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट असा काही प्रकार नसतो, जर विषय आशयघन आणि प्रभावशाली असेल तर तो चित्रपट देशाच्या सीमापार प्रेक्षकांपर्यंत जातो, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत आज शांघाय सहकारी संघटनेच्या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. अशा प्रकारचे चित्रपट महोत्सव इतर देशातील चित्रपट उद्योगांशी संपर्क आणि सहकार्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करतात, असं ते म्हणाले. आता सामाईक इतिहास, संस्कृती, परंपरा आणि नागरीकीकरणावर आधारीत चित्रपटांची संयुक्तपणे निर्मिती करण्याची वेळ आली असल्याचंही मंत्री ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. या महोत्सवात या वर्षी १४ देशातील ५८ चित्रपट दाखवले जाणार आहेत. येत्या ३१ जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार असल्याचं ते म्हणाले.

****

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकांत आज ८७४ अंकांची घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही २८७ अंकांची घसरण झाली.

येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, पण त्या आधीच शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून येत्या २९ जानेवारीला रविवारी सकाळी ११ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा सत्त्यानवावा भाग असणार आहे.

****

अहमदनगरचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळुंखे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना समर्थन देत सोळुंखे यांनी काल राजीनामा दिला. अन्य काही पदाधिकाऱ्यांनीही तांबे यांना पाठिंबा दिल्याचं निदर्शनास आल्यानंतर प्रदेश काँग्रेसनं ही बरखास्तीची कारवाई केली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

****

भगवान बुद्धांच्या अस्थिधातू कलशासह आलेल्या धम्मपदयात्रेचं आज औरंगाबादमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी अस्थिधातू कलशाला अभिवादन केलं आणि या धम्मपदयात्रेत सहभाग घेतला. शहरातल्या जालना महामार्गावरुन मार्गक्रमण करत जात असलेल्या या धम्मयात्रेतल्या अस्थि कलशाला आणि भिक्खू संघाला अनुयायांनी मोठ्या संख्येनं ठिक ठिकाणी अभिवादन केलं. तसंच भिक्खू संघाद्वारे महापरित्राणपाठ आणि बोधीपूजा करण्यात आली. शहरानजिक तीसगाव इथल्या बोधीसत्व ध्यान साधना केंद्रात ही धम्मयात्रा आज मुक्कामी असणार आहे. आंतराराष्ट्रीय ११० बौद्ध भिक्खू संघ थायलंडची ही धम्मपद यात्रा परभणीहून निघाली असून मुंबईच्या चैत्यभूमीला जाणार आहे.

दरम्यान, या धम्मपदयात्रेनिमित्त वाहतूक कोंडी होवू नये म्हणून शहरातल्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता.

****

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीत आज भारताच्या रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात ब्राझीलच्या राफेल मॅटोस आणि लुईसा स्टेफनी या जोडीनं सानिया - रोहन जोडीचा सात - सहा, सहा - दोन असा पराभव केला.

दरम्यान, सानिया मिर्झाची ही शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. आपल्या कारकीर्दीची सुरूवात २००५ मध्ये याच मेलबर्नमधून केली होती, शेवटचे ग्रँडस्लॅम खेळण्यासाठी यापेक्षा चांगलं मैदान दुसरं कोणतंच असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया सानिया मिर्झानं सामना संपल्यानंतर दिली.

****

एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं अंतिम फेरी गाठली आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्युझीलंडनं निर्धारीत २० षटकांत नऊ बाद १०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं श्वेता सेहरावतनं फटकावलेल्या ६१ धावांच्या जोरावर पंधराव्या षटकातच दोन गडी गमावून हे लक्ष साध्य केलं.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातला स्पर्धेतला अन्य उपांत्यफेरीचा सामना थोड्या वेळापूर्वीच सुरु झाला आहे. यांत विजयी होणाऱ्या संघासोबत भारताचा येत्या रविवारी अंतिम सामना होईल.

****

भारत-न्यूझीलंड दरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना रांची इथं संध्याकाळी सात वाजता सुरू होईल.

****

जकार्ता इथं आयोजित इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. आज दुपारी झालेल्या या सामन्यात इंडोनेशियाच्या जोनाटन ख्रिस्टेनं सेनला पराभूत केलं. स्पर्धेतील महिला दुहेरीच्या प्रकारांतही आज भारताच्या तनीशा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा यांच्या संघाला जपानच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान, पुरुष एकेरीत एच एस प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत आणि प्रियांशू राजवत यांचं, तर महिला एकेरीत सायना नेहवालचं पहिल्या फेरीतच या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, सावदा परिसरात आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ३ पूर्णांक ३ रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. सदरच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत वा वित्तहानी झाली नसल्याचं प्रशासनानं सांगितलं. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याबाबत प्रशासन सतर्क असल्याचं जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी कळवलं आहे.

****

जी-ट्वेंटी स्टार्टअप सहभाग गटाची सुरुवातीची पहिली दोन दिवसीय बैठक उद्यापासून हैदराबादमध्ये सुरु होत आहे. या बैठकीत जी-ट्वेंटी देशांचे प्रतिनिधी, निरीक्षक देशांचे आमंत्रित सदस्य, बहुपक्षीय संघटनांचे प्रतिनिधी आणि भारतीय स्टार्टअप परिसंस्थेचे सदस्य सहभागी होत आहेत.

****

No comments:

Post a Comment