▼

Thursday, 2 February 2023

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 02.02.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  02 February  2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ फेब्रुवारी २०२३   सायंकाळी ६.१०

****

·      शेतकरी, कष्टकऱ्यांना सुखी - समृद्ध करण्यावर राज्य सरकारचा भर - मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही.

·      औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये महाविकास आघाडीचे विक्रम काळे आघाडीवर, कोकण मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी.

·      राज्यातल्या बाल सुधारगृहांमध्ये कौशल्यपूर्ण शिक्षणाचं केंद्र सुरू करणार-मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची माहिती.

आणि

·      हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं एक कोटी १४ लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त.

****

शेतकरी, कष्टकऱ्यांना सुखी - समृद्ध करण्याबरोबर आवश्यक त्या सवलती देण्यासाठी राज्यशासन वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या उपस्थितीत आज जालना जिल्ह्यातल्या वाटूर इथं ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेचा शेतकरी मेळावा झाला, त्यावेळी शिंदे बोलत होते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला राज्य सरकार प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –

मराठवाडा विदर्भ या ठिकाणी आपल्याला माहित आहे आत्महत्याग्रस्त हा सगळा भाग आहे. आणि म्हणून आत्महत्या कमी करणं हे या सरकारचं प्राधान्य आहे. आणि म्हणून शेतकरी हा आपला मायबाप आहे. अन्नदाता आहे. तो जगला पाहिजे, वाचला पाहिजे ही भूमिका आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून अतिशय महत्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रीड आम्ही सुरु केलं. ते ही मागच्या काळामध्ये दुर्दैवाने बंद झालं. आपलं सरकार आल्यानंतर मी आणि देवेंद्रजी आम्ही दोघंचं होतो मंत्रिमंडळामध्ये आम्ही पहिला निर्णय घेतला मराठवाडा वॉटरग्रीडचा आणि त्याला देखील प्राधान्य दिलं जाईल.

जालना जिल्ह्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प असून त्याचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली. जलतारा अभियानामुळं सिंचनक्षेत्रात क्रांती घडेल, असा विश्वास श्री श्री रवीशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. 

****

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे हे वीस हजार ७८ मत घेऊन आघाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार सुर्यकांत संग्राम विश्वासराव हे १३ हजार ५४३ मत घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरण पाटील यांना १३ हजार ४८९ मतं मिळाली आहेत. दोन हजार ४८५ मतपत्रिका बाद झाल्या आहेत. शिक्षकांनी यामध्ये अनेक मत पत्रिकांवर जुनी सेवा निवृत्ती वेतन लागू करा अशी मागणी केल्याचं निदर्शनास आलं आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी आता सुरू आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. त्यांना २० हजार ६४८ मतं मिळाली आहेत. ते ९ हजार सहाशे ८६ मतांनी विजयी झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना १० हजार ९९७ मतं मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनाजी पाटील यांना एक हजार चारशे ९० मतं मिळाली आहेत. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातले महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेद्वार सुधाकर आडबाले विजयी झाले आहेत, मात्र त्यांची अधिकृत घोषणा बाकी आहे. तर अमरावती विभागात महाविकास आघाडीचे उमेद्वार धीरज लिंगाडे हे आघाडीवर आहेत. नाशिक पदवीधर विभागात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे आघाडीवर आहेत.

****

राज्यातल्या बाल सुधारगृहांमध्ये कौशल्यपूर्ण शिक्षणाचं केंद्र सुरू करणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि महिला आणि बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. त्यांनी आज मुंबईतल्या डोंगरी, उमरखाडी इथं कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन केलं, त्यावेळी लोढा बोलत होते. बालकांना शिक्षणासोबतच आवश्यक कौशल्य विकसित होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि महिला आणि बालविकास विभाग प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. मानखुर्द इथल्या बालगृहामध्ये फॅशन डिझायनिंग, फ्रेम डिझाईनिंग, संगणकाचं कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार असल्याचं लोढा यावेळी म्हणाले.

****

‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीत गायनाबाबतची नियमावली राज्य शासनानं जाहीर केली आहे. या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आलं आहे. या गीताचा कालावधी सुमारे १ मिनिट ४१ सेकंद असणार आहे. सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे.

****

महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी या वर्षीपासून एक कोटी रूपये एवढ्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी याची माहिती दिली आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांसाठी ही बाब मनोबल वाढवणारी ठरेल, असंही महाजन म्हणाले. यापूर्वी १८ लाख २५ हजार रुपये निधीची तरतूद होती.

****

पंढरपूर इथंल्या संत निळोबा सेवा मंडळ मठामध्ये आलेल्या भाविकांनी काल एकादशीच्या निमित्ताने भगर खाल्ल्यामुळे १३७ भाविकांना विषबाधा झाली आहे. हे भाविक नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातले असून त्यांच्यावर पंढरपूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनानं विषबाधा झालेल्या भाविकांची भेट घेतली असून, मठामध्ये तयार करण्यात आलेल्या भगरीचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं पोलिसांनी एक कोटी १४ लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे. औंढा नागनाथ इथं ग्रामीण रुग्णालय परिसरात गस्तीवेळी पोलिसांनी ही कारवाई केली. काही जण आपापसात भांडत असल्याचं दिसल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये खऱ्या नोटा घेऊन बनावट नोटा देणारी टोळी पोलिसांच्या तावडीत सापडली. ताब्यात घेतलेल्या आरोपींमधे लातूर, औरंगाबाद, नांदेड, खामगाव इथल्या तसंच बाहेरच्या राज्यांतल्या आरोपींचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या सूचना औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांनी औरंगाबाद ग्रामीण विभाग एक आणि दोन तसंच कन्नड, वैजापूर या ठिकाणी सुमारे ८०० अभियंते आणि जनमित्रांशी संवाद साधला, त्यावेळी या सूचना केल्या. ग्राहकांना सुरळीत विद्युत सेवा देतानाच वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. ग्राहकांना गतीमान सेवा आणि सुरळीत विद्युतपुरवठा करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावं. कृषी पंपाच्या प्रलंबित वीज जोडण्या देण्याबाबत राज्य शासनानं निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे ३१ मार्च २०२२ पर्यंत जे ग्राहक पैसे भरून प्रलंबित आहेत, त्यांना तातडीनं वीजजोडण्या देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. 

****

औरंगाबाद इथल्या महाराष्ट्र राज्य कामगार रुग्णालयासंबंधी कामगारांच्या विविध समस्या दूर करण्याची मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. कामगार रुग्णांना वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते, वैद्यकीय कर्मचारी अधिकारी वेळेवर हजर राहत नाहीत, अशी तक्रार पक्ष कार्यकर्त्यांनी केली आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयातून वैद्यकीय उपचार घेतलेल्या रुग्णांच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करावा या आणि अन्य मागण्यांचं निवेदन आज माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांच्या शिष्टमंडळानं रुग्णालय प्रशासनाला दिलं.

****

औरंगाबाद इथले उद्योजक, बहुभाषिक ब्राह्मण संघटनेचे मुख्य समन्वयक विजय मनोहर हुलसुरकर यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते. प्रतापनगर स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वस्त्रोद्योग विषयात अभियंता पदवीधारक हुलसुरकर यांनी औरंगाबाद इथं स्वतःचा उद्योग सुरू केला होता. तत्कालीन तरुण उद्योजक संघटनेचे सलग चार वेळा त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं.

****

नाशिक इथले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगारे यांचं काल रात्री अपघाती निधन झालं. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमाराला एका सहकाऱ्यासह ते निफाडला वाहनाने जात असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेने हा अपघात घडला, यात मानस यांचा मृत्यू झाला तर त्यांचा सहकारी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

****

धुळे इथं गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून पिस्तुल आणि जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

****

No comments:

Post a Comment