▼

Friday, 3 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.02.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 February 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन जागांवर महाविकास आघाडीचा तर एका जागेवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा विजय,

·      नाशिकमधून अपक्ष सत्यजित तांबे विजयी तर अमरावती पदवीधर मतदारसंघात दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु

·      औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून सलग चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांचा विजय

·      जालना जिल्ह्यात वाटूरमध्ये जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ, मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला राज्य सरकारचं प्राधान्य असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      पैठण तालुक्यात साडे बाविस हेक्टर्स क्षेत्रात लिंबूवर्गीय फळ समूह आणि उत्कृष्टता केंद्राची उभारणी करण्यात येणार

·      पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार- नाना पटोले  

·      ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून वर्धा इथं प्रारंभ

·      खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळेला रौप्यपदक, तर स्वराज भोंडवेला कांस्यपदक

आणि

·      तीन देशांची टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत यजमान दक्षिण आफ्रिकेकडून अंतिम सामन्यात भारताचा पराभव 

****

राज्य विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला, एका जागेवर भारतीय जनता पक्षानं, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात मतमोजणी सुरु असून, महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांचा सहा हजार ९३७ मतांनी विजय झाला. काळे यांना २३ हजार ५८०, तर भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना १६ हाजर ६४३ मतं मिळाली. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या विक्रम काळे यांचा हा सलग चौथा विजय आहे.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. त्यांना १६ हजार ७०० मतं मिळाली. त्यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांना पराभूत केलं.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजय मिळवला. त्यांना २० हजार ६४८ मतं मिळाली. जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची १६ हजार ७२६ मतं आवश्यक होती. विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना १० हजार ९९७ मतं मिळाली.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांचा २९ हजार ४६५ मतांनी पराभव केला. सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरी अखेर ६८ हजार ९९९, तर शुभांगी पाटील यांना ३० हजार ५३४ मतं मिळाली.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात मतमोजणी अद्यापही सुरु असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याठिकाणी ४७ हजार १०१ मतांचा कोटा निश्चित झाला असून, सध्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची गणना सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ५७७, तर भाजपचे डॉ. रणजीत पाटील यांना ४१ हजार २२८ मतं मिळाली.

दरम्यान, या मतमोजणीत अनेक मतदारांनी केवळ दुसऱ्या पसंतीचं मत दिल्यानं सहा हजार मतं बाद झाली आहेत.

****

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जलयुक्त शिवार आणि वॉटरग्रीड या दोन्ही योजना महत्वाच्या असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. याच उद्देशानं जलसंधारणाकडून ग्रामसमृध्दीकडे नेणारा जलतारा प्रकल्प सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जालना जिल्ह्यातल्या वाटूर इथं आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेनं आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात जलतारा प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी काल ते बोलत होते. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला राज्य सरकार प्राधान्य देत असल्याचं सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले.....

‘‘मराठवाडा विदर्भ या ठिकाणी आपल्याला माहित आहे आत्महत्याग्रस्त हा सगळा भाग आहे. आणि म्हणून आत्महत्या कमी करणं हे या सरकारचं प्राधान्य आहे. आणि म्हणून शेतकरी हा आपला मायबाप आहे. अन्नदाता आहे. तो जगला पाहिजे, वाचला पाहिजे ही भूमिका आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून अतिशय महत्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रीड आम्ही सुरु केलं. ते ही मागच्या काळामध्ये दुर्दैवाने बंद झालं. आपलं सरकार आल्यानंतर मी आणि देवेंद्रजी आम्ही दोघंचं होतो मंत्रिमंडळामध्ये आम्ही पहिला निर्णय घेतला मराठवाडा वॉटरग्रीडचा आणि त्याला देखील प्राधान्य दिलं जाईल.’’

जालना जिल्ह्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प असून, त्याचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली. जलतारा अभियानामुळे सिंचनक्षेत्रात क्रांती घडेल, असा विश्वास श्री श्री रवीशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. 

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या इसारवाडीमध्ये, ४३ कोटी ८० लाख रुपये खर्च करुन, साडे बाविस हेक्टर्स क्षेत्रात लिंबूवर्गीय फळ समूह आणि उत्कृष्टता केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याचं, फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनामंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितलं. काल मुंबईत एका बैठकीत ते बोलत होते. यामध्ये साडे चार हेक्टर क्षेत्रामध्ये उत्कृष्टता केंद्र स्थापन केलं जाईल, तर १८ हेक्टरमध्ये लिंबूवर्गीय फळ समूह स्थापन करण्यात येणार असल्याचं, ते म्हणाले. त्याचबरोबर इसारवाडीतील सध्याच्या बीज गुणन केंद्राचं, फळ रोपवाटिकेत रूपांतर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. फळ पिकाची जातीवंत रोग आणि कीडमुक्त उच्च दर्जाची कलमं पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यासाठी, उच्च तंत्रज्ञानावर आधारित अशी ही रोपवाटिका असेल.  लिंबूवर्गीय फळ समूहामध्ये मोसंबीसाठीचे रंगपूर लाइम, न्यूसेलर, काटोल गोल्ड, फुले ही मातृवृक्ष असणार आहेत.

दरम्यान, भुमरे यांनी काल ग्रामरोजगार सेवकांच्या समस्यांविषयी बैठक घेतली. राज्यातल्या ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ, पूर्ण वेळ काम या बरोबरच इतर समस्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल, यासाठी इतर राज्यांच्या कार्य पद्धतीचा अभ्यास करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून, महाविकास आघाडीच्या आज होणार्या बैठकीत यावर निर्णय होईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. प्रदेश काँग्रेस संसदीय मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून, याठिकाणी निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून सहा उमेदवार इच्छूक आहेत, ही नावं पक्षश्रेष्टीकडे पाठवली जातील आणि त्याचा निर्णय घेतला जाईल असं पटोले यांनी बैठकीनंतर सांगितलं.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री म्हणून प्रथमच राज्याचा २०२३ चा  अर्थसंकल्प सादर  करणार आहेत. या अर्थसंकल्पासाठी त्यांनी राज्यातल्या जनतेकडून काही अभिनव संकल्पना मागवल्या आहेत. या सूचना नागरिकांना बी आय टी डॉट एल वाय स्लॅश महा बजेट 23, या संकेतस्थळावर पाठवता येतील.

****

राज्यातल्या बाल सुधारगृहांमध्ये कौशल्यपूर्ण शिक्षणाचं केंद्र सुरू करणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि महिला आणि बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. मुंबईतल्या डोंगरी, उमरखाडी इथं कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. बालकांना शिक्षणासोबतच आवश्यक कौशल्य विकसित होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि महिला आणि बालविकास विभाग प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले.

****

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून वर्धा इथं प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्याक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांच्यासह ज्येष्ठ हिंदी कवी आणि समीक्षक डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडी निघणार असून, अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर...

“विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्ध्यामध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलनस्थळाला महात्मा गांधी साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाच्या प्रवेशद्वारावर गांधीजींचे चरख्यावर सूतकताई करतानाचे कटआऊट आकर्षन ठरत आहे. वर्ध्यातील स्वावलंबी विद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर संमेलनाची त्यारीसाठी विविध समित्या अहोरात्र झटत आहे. वेगवेगळे सहा सभामंडपे तयार करण्यात आले असून ग्रंथप्रदर्शनाला पुस्तकाच्या आकाराचे प्रवेशद्वार निर्माण करण्यात आले आहे. वर्धा शहरात येणारे साहित्यप्रेमींच्या, निवासाची व्यवस्था हॉटेल्स आणी इतर ठीक़ाणी करण्यात आली. मात्र ही व्यवस्था फुल्ल झाल्याने वर्धेकरानीं आता पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी  हाथ पुढे केले आहे.’’

दरम्यान, साहित्य संमेलनातल्या भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रदर्शनीचं आणि ग.त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचाचं उद्घाटन काल साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते करण्यात आलं. ग्रंथ प्रदर्शन साहित्य प्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र असल्याचं सासणे म्हणाले. या साहित्य नगरीत ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीसाठी तीनशे दालनांची उभारणी करण्यात आली आहे.

****

जल जीवन योजनेत नव्या वस्त्यांचा समावेश करण्याची मागणी उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातली अनेक खेडी, वस्त्या आजही नळाद्वारे स्वच्छ पेयजल मिळण्यापासून वंचित आहेत. केंद्र सरकार केवळ आकडेवारीचा खेळ करुन जनतेचे मुलभुत प्रश्न सोडवण्यामध्ये यश आल्याचं भासवत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. जलस्वराज आणि भारत निर्माण राष्ट्रीय पेय जल योजनेसारखा, जल जीवन योजनेचा बोजवारा होऊ नये अशा उपाय योजना सरकारनं आखाव्यात, तसंच प्रत्येक गावात या योजनेला सौर उर्जा बसवणं बंधनकारक करावं अशी सूचना राजेनिंबाळकर यांनी केली.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं पोलिसांनी एक कोटी १४ लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त करुन, नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे. औंढा नागनाथ इथं ग्रामीण रुग्णालय परिसरात गस्तीवेळी पोलिसांनी ही कारवाई केली. काही जण अपापसात भांडत असल्याचं दिसल्यानंतर, केलेल्या चौकशीमध्ये, खऱ्या नोटा घेऊन बनावट नोटा देणारी टोळी पोलिसांच्या तावडीत सापडली. ताब्यात घेतलेल्या आरोपींमधे लातूर, औरंगाबाद, नांदेड, खामगाव इथल्या तसंच बाहेरच्या राज्यांतल्या आरोपींचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातले जवळपास ८०० अभियंते आणि जनमित्रांशी त्यांनी काल संवाद साधला. ग्राहकांना सुरळीत विद्युत सेवा देतानाच वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. ग्राहकांना गतिमान सेवा आणि सुरळीत विद्युत पुरवठा करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावं, कृषी पंपाच्या प्रलंबित वीज जोडण्या देण्याबाबत राज्य शासनानं निर्देश दिलेले आहेत, त्यामुळे ३१ मार्च २०२२ पर्यंत जे ग्राहक पैसे भरून प्रलंबित आहेत, त्यांना तातडीनं वीज जोडण्या देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. 

****

महिलांची तीन देशांची टी-ट्वेंटी क्रिकेट मालिका यजमान दक्षिण आफ्रिकेनं जिंकली आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी भारतीय संघाचा पाच खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने निर्धारीत २० षटकांत चार बाद १०९ धावा केल्या. हर्लीनं देओल हिनं सर्वाधिक ४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं अठरा षटकांत पाच खेळाडुंच्या बदल्यात हे आव्हान पार केलं. त्यांच्या क्लो ट्रायन हिनं नाबाद ५७ धावा केल्या. भारताच्या स्नेह राणानं दोन बळी घेतले. ट्रायन ही सामन्यातील तर भारताची दीप्ती शर्मा मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे.

****

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत भोपाळमधे झालेल्या नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळेनं मुलींच्या दहा मीटर रायफल प्रकारात रौप्यपदक, तर स्वराज भोंडवेनं मुलांच्या २५ मीटर पिस्तूल रॅपिड फायर प्रकारात कांस्यपदक पटकावलं.

टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या तनिषा कोटेचानं मुलींच्या एकेरीत अंतिम फेरी गाठत, पदक निश्चित केलं आहे. इंदूरमधे काल झालेल्या उपांत्य फेरीतल्या चुरशीच्या लढतीत तनिषानं हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्तीचा चार - तीन असा पराभव केला. एकेरीच्या अंतिम फेरीत तनिषाची लढत दिल्लीच्या लक्षिता नारंगशी होणार आहे. तनिषानं याआधी या स्पर्धेतल्या दुहेरीत रिशा मीरचंदानी हिच्या साथीनं रौप्य पदक पटकावलं आहे.

बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या नाईशा कौरनं अवघ्या ३५ मिनिटात अंतिम फेरी गाठली. तिनं गटातल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात गार्गीचा पराभव करत पदार्पणातच पदकाची संधी मिळवली आहे.

मुलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या मोदी याला उत्तर प्रदेशाच्या दिव्यांश श्रीवास्तवनं पराभूत केलं. मात्र त्याला कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी मिळणार आहे.‌

जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या सारा राऊळ आणि रिया केळकर, तसंच मुलांमध्ये आर्यन दवंडे आणि मानस मनकवळे यांनी वैयक्तिक सर्वसाधारण विभागात अंतिम फेरीकडे आगेकूच केली.

मुष्टीयुद्ध स्पर्धेत महाराष्ट्राच्या अन्वर शेख आणि उस्मान अन्सारी यांनी उपांत्य फेरी धडक मारत दोन पदकं निश्चित केली.

बास्केटबॉलमधे, सलग दोन पराभवामुळे आव्हान संपुष्टात आलेल्या महाराष्ट्राच्या मुलींनी अखेरच्या साखळी सामन्यात राजस्थानवर ८९-५८ असा विजय मिळवला.

****

No comments:

Post a Comment