▼

Monday, 20 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.02.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 20 February 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २० फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.

****

शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्य बाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र आजच्या कामकाजाच्या यादीत ठाकरे गटाच्या याचिकेचा समावेश नसून, उद्याच्या यादीत समावेशासाठी ठाकरे गटाला पुन्हा विनंती करावी लागणार आहे.

दरम्यान, राज्यातल्या संत्तासंघर्षासंदर्भात ठाकरे आणि शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर देखील उद्यापासून सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे पुन्हा सुनावणी सुरु होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या १६ सदस्यांना विधानसभेच्या उपाध्यक्षांनी बजावलेली अपात्रतेची नोटीस, राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाचारण करणं, विधानसभा अध्यक्षांची निवड, शिवसेनेच्या मुख्य प्रतोदाची निवड अशा ठाकरे आणि शिंदे गटानं एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिकांचा यात समावेश आहे.

***

पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटानं आज विधीमंडळात शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्याचं वृत्त आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार यावेळी उपस्थित होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

***

भाजप आणि शिंदे गटाचं लोकसभेसाठी समीकरण ठरलेलं असून, योग्य वेळी ते जाहीर करू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएतून खासदार निवडून येतील हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करू नये, असं फडणवीस यांनी नमूद केलं.

***

रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्रात २०२३ - २४ या वर्षात रेल्वेविकासासाठी सुमारे १३ हजार ५३९ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचा अमृत स्टेशन म्हणून तर विविध स्थानकांचा ४ हजार ९६२ कोटी रुपये खर्चून पुनर्विकास केला जाणार आहे. औरंगाबाद तसंच जालना रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी अनुक्रमे ३९० आणि १७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

अमृत स्थानकांमध्ये औरंगाबाद, जालना, लातूर, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, आणि अहमदनगरसह भोकर, गंगाखेड, धर्माबाद, हिमायत नगर, मानवत रोड, मुदखेड, परळी वैजनाथ, परतूर, पुर्णा, रोटेगाव, सेलू, उमरी, किनवट, आदी स्थानकांचा समावेश आहे.

***

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. कोविड नंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमधून दोन लाख ६० हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यंदाच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय मंडळाने रद्द केला असून, परीक्षेच्या नियोजित वेळेनंतर विद्यार्थ्यांना अतिरिक्त दहा मिनिटं देण्यात येणार आहेत. परीक्षेचं साहित्य केंद्रांना वितरीत झालं असून, तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षेला विद्यार्थ्यांनी सामोरं जावं, असं आवाहन शिक्षण मंडळाचे औरंगाबाद विभागीय सचिव व्ही व्ही जोशी यांनी केलं आहे.

***

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यातली १३ विद्यापीठं आणि अनुदानित महाविद्यालयांतल्या कर्मचाऱ्यांना सापत्न वागूणक दिली जात असल्याच्या विरोधात हा बेमुदत संप करण्याचा निर्धार कर्मचारी महासंघानं केला असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिली आहे.

***

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा शेवटचा साखळी सामना आयर्लंडसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेत भारत आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकून ग्रूप बी मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

***

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी के. एल. राहुल तसंच जसप्रित बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. राहुलला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. इंदूर आणि अहमदाबाद इथं हे सामने खेळले जाणार आहेत.

***

राज्यभरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्यानं आज आणि उद्या कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यंदा उन्हाळा लवकर आला असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी केलं आहे.

***

औरंगाबाद शहरात बांधकामासाठी लागणाऱ्या विटांच्या वाहतुकीवर शहर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. विटांची वाहतूक आता पहाटे चार ते सकाळी साडे सात या साडेतीन तासांतच करता येणार आहे.

//*************//

 

No comments:

Post a Comment