Wednesday, 1 March 2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.03.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०१ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ३५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यानुसार आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत एक हजार १०३ रुपयांवर पोहोचली आहे. तर, मुंबईत एलपीजीचे दर एक हजार १०२ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत.

***

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. आज शिंदे गटाच्या बाजूनं नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद होणार आहे.

***

G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत सुरु होत आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सदस्य राष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री काल दिल्लीत दाखल झाले. यामध्ये ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री मौरो व्हिएरा, मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री अॅलन गानू आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे शेर्पा रिचर्ड मार्क सॅमन्स यांचा समावेश आहे. या बैठकीमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्यासह अनेक मान्यवर जागतिक आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय बाबींवर आपले विचार मांडणार आहेत.

***

उन्हाळ्यात होणाऱ्या उष्णतेशी संबंधित आजारांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी राष्ट्रीय कृती आराखडा जारी केला आहे. सर्व राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सर्व जिल्ह्यांमध्ये मार्गदर्शक तत्त्वं जाहीर करायलाही सांगितलं आहे.

***

मिशन चांद्रयान - ३ अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं सीई-20 क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. पूर्वनिर्धारित २५ सेकंद कालावधीसाठी ही चाचणी घेण्यात आली. चाचणी दरम्यान सर्व मानकं समाधानकारक आढळल्याचं इसरोकडून सांगण्यात आलं.

***

पूर्ण देशभरात फाईव्ह जी सेवा पुरवण्याचं उद्दिष्ट पुढच्या वर्षाअखेर साध्य होईल, असं सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. मार्चअखेरीस दोनशे शहरांमध्ये ही सेवा पुरवण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं होतं, मात्र हे लक्ष्य वेळेआधीच पूर्ण झालं असून सध्या देशातल्या तीनशे सत्त्याऐंशी शहरांमध्ये फाईव्ह जी सेवा सुरू झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

 

//************//

No comments:

Post a Comment